

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सासष्टीतील लोकांचे धिरयो प्रेम जगजाहीर आहे. बंदी असतानासुद्धा सासष्टीत उघडपणे बैल किंवा रेड्यांच्या झुंजी लावल्या जातात. सोमवारी मात्र या धिरयो प्रेमींनी अमानुषतेच्या सर्व सीमा ओलांडून कहर केला. वार्कात बैलांच्या झुंजी आयोजित केली होती. त्यात एक बैल गंभीर जखमी झाला; पण उपस्थित उजो, उजो असा जल्लोष करून तांडव करीत होते. मनोरंजन म्हणून मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ करणार्या या घटनेमुळे धिरयोचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी अनेकवेळा धिरयोच्या वेळी बैल किंवा रेडे जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. पोलिस यंत्रणेचा दुर्लक्षपणा या अवैध प्रकारांसाठी कारणीभूत ठरला आहे.
सविस्तर माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास वार्का येथील मैदानावर धिरयोचे अयोजन करण्यात आले होते. या झुंजीतील एक बैल वार्का येथील, तर दुसरा बैल बाणावली येथील होता. लाखो रुपयांचा सट्टा या धिरयोवर लागला होता. सायंकाळी धिरयोचे आयोजन करताना आयोजकांनी आवश्यक ती काळजी घेतल्याचे चित्र होते. त्यामुळेच झुंज सुरू होऊन अर्धा तास ओलांडला तरी पोलिस घटनास्थळी पोचले नव्हते. सुमारे आठशे लोकांचा जमाव या धिरयोला उपस्थित होते. धिरयो सुरू असताना एका बैलाचे शिंग दुसर्या प्रतिस्पर्धी बैलाच्या मानेत घुसले. शिंग काढून स्वतःचा जीव वाचवण्याकरिता प्रतिकार करणे थांबवले होते, बैलाच्या मानेतून रक्ताचा स्राव थांबत नव्हता, तरिही आयोजकांनी ही झुंज थांबवली नाही. बर्याच वेळानंतर तो जखमी बैल खाली पडला. या घटनेचे पडसाद सासष्टीत उमटले असून, प्राण्यांचा छळ बंद करावा अशी मागणी प्राणीप्रेमी करू लागले आहेत.
धिरयोच्या नावावर सुरू असलेल्या या क्रूरतेवर बंदी असतानाही धिरयोचे दिवसाढवळ्या आयोजन होऊ लागल्याने बाणावलीत कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. एकूण वीस लाखांचा सट्टा या धिरयोवर लागला होता. या लढतीतील फ्लाईंग जट बैलाचा मालक अमेरिकेत कामाला आहे. अमेरिकेत बसून तो त्या बैलावर सट्टा लावत असल्याची माहिती पुढे आली आहे. या लढतीत त्याचाच बैल जिंकला आहे. कोलवा पोलिसांत संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत या घटनेची कोणतीही नोंद पोलिस स्थानकात झाली नसल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचलंत का?