नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गिरणीत ग्राहकांच्या पिठात घाण करणार्या मांजराची तक्रार मालकाकडे करणे एकास त्रासदायक ठरले. मांजरीच्या मालकाने व त्याच्या कुटुंबीयांनी गिरणीमालकाचे नुकसान करण्याच्या हेतूने सातपूर पोलिसांकडे खोट्या तक्रारी केल्या. त्याचप्रमाणे गिरणीत शिरून रोकड चोरली, वीजचोरी केली. याबाबत पोलिसांनी तक्रारींची दखल न घेतल्याने गिरणीमालकाने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर गिरणीमालकाची फिर्याद घेण्याचे आदेश न्यायालयाने सातपूर पोलिसांना दिले. त्यानुसार पाच वर्षांनी सातपूर पोलिस ठाण्यात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रशांत भोसले (रा. प्रबुद्धनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार 17 मार्च ते 5 मे 2018 या कालावधीत हा प्रकार घडला होता. भोसले यांच्या गिरणीत ग्राहकांच्या पिठात एका पाळीव मांजरीने घाण केल्यामुळे भोसले हे प्रदीप विश्वनाथ पवार (35) यांना सांगण्यास गेले. त्यावेळी प्रदीप यांच्यासह इतर संशयितांनी संगनमत करून प्रशांत यांना त्रास दिला. संशयितांनी प्रशांत यांच्याविरोधात त्रास देण्याच्या उद्देशाने सातपूर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्याचप्रमाणे संशयितांनी प्रशांत यांच्या गिरणीत शिरून गल्ल्यातील रोकड चोरून नेली. तर गिरणीच्या वीजमीटरमध्ये छेडछाड करून संशयितांनी वीजचोरीही केली. याबाबत प्रशांत यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली. न्यायालयाने याबाबत चौकशी करून सातपूर पोलिसांना संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार सातपूर पोलिस ठाण्यात सुमारे चार वर्षांनंतर प्रदीप पवारसह जनाबाई पवार (32), अनिल पवार (35), विश्वनाथ पवार (55), गणेश पवार (28), भानुदास पवार (60), शोभा पवार (32), विलास पवार (48), मंजुळा पवार (35), बाबासाहेब पवार (35), ज्ञानदेव धोत्रे (45, सर्व रा. महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर) यांच्यासह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.