गोवा : प्रत्यक्ष शिक्षणास आजपासून प्रारंभ | पुढारी

गोवा : प्रत्यक्ष शिक्षणास आजपासून प्रारंभ

पणजी : पुढारी वृत्तसेवा; राज्यातील सरकारी व खासगी मिळून सुमारे 1300 शाळा सोमवारी, दि. 21 पासून सुरू होत आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे बंद असलेल्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या कोरोना नियमावलीनुसार शाळा सुरू करण्यास मंजुरी दिल्याने विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीत शाळा सुरू होणार आहेत.

20 मार्च 2020 पासून देशासोबत राज्यांमध्ये कोरोना महामारीचे संकट सुरू झाले. त्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शिक्षण खात्याने शाळा बंद ठेवल्या होत्या. या बंद काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिक्षक शाळेमध्ये येऊन हे वर्ग घेत. विद्यार्थी स्मार्टफोनवर त्या वगार्ंना उपस्थिती लावत होते.

मात्र, नेटवर्क समस्यामुळे ऑनलाईन शिक्षण लाभदायी ठरत नव्हते. महामारी सतत दुसर्‍या वर्षी सुरू राहिल्यामुळे 2021 वर्षाच्या सर्व वर्गांच्या इतर परीक्षांसह अंतिम परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या लागल्या होत्या. 2021 मध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित सापडू लागले. तसेच बाधितांच्या मृत्यू संख्याही झपाट्याने वाढली.

परिणामी शाळा सलग दुसर्‍या वर्षीही बंदच राहिल्या. सध्या कोरोना नियंत्रणात आहे. सर्व व्यवहार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहेत. त्यामुळे आता शाळा सुरू व्हाव्यात, अशी मागणी पालकांनी लावून धरली होती. इतर राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून शेवटी शिक्षण खात्याने दोन दिवसांपूर्वी पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग 21 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे जाहीर केले. महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्यास यापूर्वीच परवानगी दिलेली आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच 50 टक्के उपस्थितीत शाळा सुरू होत आहेत.

केंद्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन

शिक्षण संचालक भूषण सावईकर म्हणाले की, केंद्र सरकारने शाळांसाठी नियमावली यापूर्वी जाहीर केली आहे. त्याचे पालन करूनच शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. ग्रामीण भागांतील काही शाळा यापूर्वीच सुरू झालेल्या असल्या तरी व नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के उपस्थितीत यापूर्वीच बोलावले होते. मात्र, सोमवारपासून पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होत आहेत. केंद्राच्या नियमावलीनुसार 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घ्यावयाचा आहे.

पालकांकडून मान्यता पत्र

शाळा सुरू होत आहेत. त्यासाठी शाळांनी पालकांकडून एक पत्र सही करून घेणे सुरू केले आहे. यात आपणास कोरोना महामारीची माहिती आहे. माझे मूल सदृढ आहे. कोरोना नियमांचे पालन आम्ही नेहमी करतो, असा आशय पालकांच्या मान्यता पत्रात नमूद आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button