

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा
भरधाव वेगातील मोटार पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या भीषण अपघातात गाडीतील एक महिला ठार झाली. ही घटना राजुरी (जुन्नर) शिवारातील पुलावर घडली. या अपघातात भीमाबाई बाजीराव नांगरे (वय-७५ रा. गोरेगाव ता. पारनेर जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले. चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील नांगरे कुटुंबीय रविवारी दुपारी चारच्या सुमारस आळेफाटा येथे जात होते. दरम्यान मोटार वरील ( एम एच ०४ जीयू ९९०१ ) चालकाचे नियंत्रण सुटल्याने राजुरी जवळील पुलावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात चालकासह चौघे गंभीर जखमी झाले.
जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार दरम्यान भीमाबाई बाजीराव नांगरे (वय-७५) यांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मोटारीचा समोरून चक्काचूर झाली. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.