Goa Election : अद्ययावतीकरणात अडकला निवडणूक आयोगाचा कारभार | पुढारी

Goa Election : अद्ययावतीकरणात अडकला निवडणूक आयोगाचा कारभार

पणजी, पुढारी वृत्तसेवा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्यास 21 तारखेपासून सुरुवात झाली. त्यात सर्व उमेदवारांनी शेवटच्या दोन दिवसांत 27 व 28 रोजी अर्ज भरण्यावर भर दिला. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाकडून दिवसभरात किती अर्ज भरले, याची राज्यातील एकूण आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाकडून रात्री उशिरा उपलब्ध झाली. मात्र उमेदवारी अर्जांची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाकडून मिळू शकत नाही. त्यामुळे अद्ययावतीकरणाचा ढिंडोरा पिटणार्‍या आयोगाच्या कारभारात शिथिलपणा दिसून येतो. त्याला विविध कारणे असल्याचेही सांगितले जाते.

राज्यात 40 मतदारसंघ

राज्यात 40 मतदारसंघ असून, साधारणतः चारशे ते पाचशे अर्ज दाखल केले जातील. त्यात काही डमी अर्जही उमेदवार दाखल करतात. यापूर्वीच्या निवडणुकांवेळी दिवसभरात अर्ज किती दाखल झाले याची सर्व माहिती निवडणूक खात्याकडे सायंकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध होत असत. परंतु आता रात्री उशिरापर्यंत ती माहिती त्यांच्याकडे येत नाही. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात माध्यमांना माहितीसाठी असलेल्या अधिकार्‍यांकडेच ही माहिती उपलब्ध नसेल तर ते तरी कोठून देणार. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या येणार्‍या कॉलचा त्रास सहन करावा लागत होता. दोन दिवसांत अनेकजण दहा-पंधरा मिनिटांनी येथील कर्मचार्‍यांना एकूण अर्जांची मिळाली का संख्या, म्हणून विचारणा करीत होते. परंतु तेही नाइलाजाने अजून आली नाही, म्हणून सांगत होते.

तसचे, अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याबरोबर जोडल्या जाणार्‍या प्रतिज्ञापत्रावरील सर्व माहिती निवडणूक खात्याकडील संगणकांवर नोंद केली जाते. ती सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला येते. तेथे ती माहिती तपासल्यानंतर पुढे निवडणूक आयोगाकडे पाठविले जाती. हा सर्व घटनाक्रम ऑनलाईनद्वारे चालत असल्याने त्यात काही तांत्रिक अडचणीही येतात. एका बाजूला निवडणूक आयोग आपल्या कामाविषयी अद्ययावतीकरणाचा ढिंडोरा पिटत आहे. दुसरीकडे अशा काही गोष्टींसाठी लागणारा वेळ पाहता, आयोगातील कामकाजाविषयी प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत.

राज्यात एकूण 587 अर्ज दाखल

राज्यातील 40 मतदारसंघांतून दोन दिवसांत एकूण 587 अर्ज भरले गेले आहेत. त्यात भाजप, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड, मगोप-तृणमूल युती, शिवसेना-राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, रिव्होल्युशनरी गोवन्स आणि अपक्ष अशा पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
दुसर्‍या दिवशी सकाळी यादी दि. 27 रोजी अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना 28 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता यादी मिळाली.

हे ही वाचलं का 

Back to top button