पणजी, पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात मोठा गाजावाजा करून प्रवेश केलेल्या तृणमूल काँग्रेसला राजधानी पणजी मतदारसंघात उमेदवार मिळू शकलेला नाही. त्यामुळे तृणमूलची 31 जागा लढवण्याची घोषणा हवेतच विरली आहे. पणजीत भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना मदत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने उमेदवार उभा केला नसल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
पश्चिम बंगालमधून गोव्याच्या राजकारणात थेट अवतीर्ण झालेल्या तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी निवडणूक लढण्यापूर्वीच तलवार म्यान केली आहे. फातोर्ड्यातून त्यांना उमेदवारी जाहीर केली होती; त्यांनी तेथून लढण्यास नकार देत ते रिंगणातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे एकप्रकारे तृणमूलवर नामुष्कीच ओढवली आहे.
तसेच, अॅड. सेउला वाझ यांना आता तृणमूलने उमेदवारी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फालेरो तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा मतदारसंघ नावेली; परंतु पक्षाने त्यांना फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. हा निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेतले नव्हते, अशी खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. फालेरो यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, बाणावलीचे उमेदवार चर्चिल आलेमाव व इतर उपस्थित होते. माझा अनुभव पाहता राज्य पातळीवर काम करणे, सर्व उमेदवारांच्या यशासाठी गोव्यात प्रचार करणे हे माझे कर्तव्य आहे. मला फातोड्यार्र्च्या एका जागेपुरते मर्यादित ठेवायचे नव्हते म्हणून मी पक्षाला विनंती करून आपल्या जागी दुसरा उमेदवार द्यावा,अशी त्यांनी बतावणी केली.
आपण का निवडणूक लढवणार नाही, असा प्रश्न त्यांना विचारला. यावर 'मला राज्यभर प्रचार करावयाचा आहे. त्यामुळे निवडणूक लढवणे शक्य नाही', असे छापील उत्तर त्यांनी दिले. आपल्याला उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी पक्षाने विचारले नव्हते काय, असा प्रश्न त्यांना विचारला. यावर 'विचारले होते' असे सांगून अधिक बोलणे त्यांनी टाळले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि लुईझिन फोलेरो यांचे जमत नाही. तृणमूलची जागतिक कंपनीसारखी राजकीय कार्यपद्धत गोव्यात चालणार नाही, असे लुईझिनसह अनेकांनी पक्षास सांगून पाहिले. परंतु फरक पडला नाही. तृणमूलच्या नेत्या महुआ मोईत्रा गोव्यातील कामकाज पाहतात. सर्व सूत्रे त्यांच्याकडे आहेत.
तसेच, लुईझिन यांच्यासह गोव्यातील स्थानिक नेत्यांना 'पिक्चर'मध्ये फारसे स्थान नाही. काय, कधी, कोठे आणि कसे बोलायचे ते एखादे नाटक, चित्रपटाप्रमाणे संहिता तयार करून लिहिले जाते. त्यामुळे घुसमट होते, असे अनेकांनी खासगीत सांगितलेले आहे. त्यामुळे तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच, महिन्या दोन महिन्यांत त्यांचे आऊटगोईंग सुरू झाले.
माजी आमदार, निवृत्त पोलिस अधिकारी लवू मामलेदार यांनी तृणमूलला रामराम केला. दोन महिन्यांच्या आतच ही घटना घडली. त्यानंतर दक्षिणेतील काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आठ-दहा दिवसांतच तृणमूलला 'टाटा… बाय… बाय' केला. तृणमूलमध्ये जाणे माझी गंभीर चूक होती, जनतेने मला माफ करावे, असे आर्जवही त्यांनी केलेे. काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते अॅड. यतीश नाईक यांनी तृणमूलची कार्यपद्धती तत्त्वहीन असल्याचे सांगितले. त्यांनी तृणमूलचा राजीनामा दिला. कळंगुट किनारपट्टीतील वजनदार नेते जोसेफ सिक्वेरा यांनी पंधरा दिवसांच्या आत तृणमूलला रामराम ठोकून भाजपवासी होणे पसंत केले. मडगावच्या माजी उपनगराध्यक्ष डोरिस टेक्सेरा यांनी तसेच म्हापशाचे माजी नगरसेवक तुषार टोपले यांनीही पक्ष सोडणे पसंत केले. ही यादी राज्यभर ओळखल्या जाणार्या प्रमुख लोकांची आहे.
तृणमूलचे कार्याध्यक्ष म्हणून किरण कांदोळकर यांचे नाव जाहीर झालेले. पत्रकार परिषदेत ते सहज बोलून गेले की मी कार्याध्यक्ष असल्याचे मलाच माहिती नाही. कार्यपद्धतीचा हा एक नमुना. यावर पत्रकार काही खोदून विचारू लागल्यावर 'मी जरा प्रचारात बिझी होतो.' असे काहीबाही सांगून सावरण्याचा प्रयत्न केला.
पक्षाचे प्रवक्ते म्हणून ट्रोजन डिमेलो काम पाहतात. भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात काम करून ते आता टीएमसीच्या वळचणीला येऊन थांबले आहेत. ते कधीही कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. दाम करी काम, असे त्यांच्याबाबत बोलले जाते.'दाम आणि तृणमूल' या समीकरणाची गोवेकरांना आता चांगलीच ओळख झाली आहे.
फातोर्डा मतदारसंघातील निवडणूक लढविण्याची सक्ती केल्यास राजीनामा देऊ, असा इशारा लुईझिन फालेरो यांनी दिला होता. अन्य एका शक्यतेनुसार लुईझिन यांनी स्वत:च हा इशारा सर्वदूर पोहोचेल याची काळजी घेतली होती. लुईझिन यांनी खरेच राजीनामा दिला असता तर पक्षाची गोव्यासह राष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली असती. त्यामुळे पक्षाने 'पॅचवर्क' करून फातोर्ड्यातील उमेदवार तातडीने बदलला.
हे ही वाचलं का