Goa politics : मगोप- तृणमूलचा होणार ब्रेकअप?; नाट्यमय घडामोडींना वेग, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई
पणजी : पुढारी वृत्तसेवा
Goa politics : गोव्यातील एका नाट्यमय राजकीय घडामोडीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तृणमूल काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे ही राजकीय खेळी आकाराला आणल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या माहितीला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अधिकृत दुजोरा मात्र दिलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पणजीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, फडणवीस आणि मगोपच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपचे नेते दिल्लीत उमेदवारी निश्चित करण्यापूर्वी मगोपच्या नेत्यांकडून युती करण्याची हमी घेण्यात आली आहे.
तृणमूल काँग्रेससोबतच्या युतीमुळे मगोपला तोटा होणार हे मगोपच्या नेत्यांच्या लक्षात आले, तर मगोपला सोबत घेतले नाही, तर मतविभागणीचा तोटा होईल हे भाजप नेत्यांनी जाणले.
यापूर्वी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप- मगोप युतीसाठी प्रयत्न केले होते. आता फडणवीस यांनी त्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मात्र याविषयी बोलणे टाळले.
ही युती झाली तर…
ही युती झाली तर मये मतदारसंघात भाजपमधून मगोपत गेलेले माजी आमदार प्रवीण झांटये, पेडणे मतदारसंघात मगोपतून भाजपमध्ये गेलेले प्रवीण आर्लेकर यांचे काय ह़ोणार हा प्रश्न निर्माण होणार आहे. ही युती झाल्यास काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार रवी नाईक यांची मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होणार नाही.
युती झाली नव्हती कारण …
मगोपने भाजपकडे सात जागांची मागणी पूर्वी केली होती. त्यात मांद्रे मतदारसंघाचा समावेश होता. भाजप मांद्रे मतदारसंघ सोडण्यास तयार नव्हता. फोंडा मतदारसंघ मगोप सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे युती झाली नाही आणि मगोपने तृणमूल काँग्रेसशी युती केली.
तृणमूलशी युती झाल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ…
मगोप-तृणमूल युती नंतर पेडण्यातील संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर व मयेतील संभाव्य उमेदवार प्रेमेंद्र शेट यांनी मगोपची साथ सोडली आहे. आर्लेकर यांनी तृणमूल सोबतच्या युतीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे कारण जाहीरपणे पुढे केले आहे.
Goa politics : गतीने लग्न, गतीने घटस्फोटही
गोव्याच्या राजकीय अवकाशामध्ये प्रचंड गतीने लग्न होताहेत आणि तेवढ्याच गतीने घटस्फोटही. यांची-यांची युती झाली, त्यांची-त्यांची युती झाली म्हणेपर्यंत ब्रेकअपचीही बातमी आलेली असते. राजकीय पक्षांबाबत जसे हे होत आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेत्यांबाबतही होत आहे. काही दिवसांनंतर पक्ष बदललेले जात आहेत.
हे ही वाचा :

