पणजी, पुढारी वृत्तसेवा; दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा केवळ पुत्र म्हणून उमेदवारी हवी असती तर मागील वेळी आणखी एक पर्रीकर नको म्हणून मागील दाराने उमेदवारी नाकारण्याचा जो प्रकार केला तेव्हाच त्याला विरोध केला असता. दिवंगत पर्रीकर यांच्यासोबत 1994 पासून असलेले कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत. पर्रीकर यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती चारित्र्यहीन, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली नसावी यासाठी उमेदवारी भाजपकडे मागत आहे.
याच निष्ठावान कार्यकर्त्यांनी भाजप पणजीत रुजवला, फुलवला आहे. ते पूर्वी भाईंसोबत होते आता माझ्यासोबत आहेत. आज जे काही राज्यातील राजकारणात चालले आहे ते सहन करण्यापलीकडील आहे. मला ते स्वीकारार्ह नाही. केवळ जिंकून येण्याची क्षमता तपासली जाते, निष्ठेला काहीच किंमत नाही, अशी खंत उत्पल पर्रीकर यांनी व्यक्त केली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यास पर्रीकर यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघात उमेदवारी देणार हे सहन करण्यापलीकडे आहे. आम्ही काय गप्प घरी बसायचे. हे केवळ पणजीपुरतेच नाही. जे काही राजकारणात सुरू आहे ते पचनी पडणारे नाही. त्यात बदल झाला पाहिजे, असे त्यांनी सुनावले.
पणजीत भाजपने बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे की नाही याबाबत मला माहिती नाही. मी पणजीवासीयांना भेटत आलो आहे. पूर्वी या भेटी खासगी असत. आता निवडणूक जाहीर झाल्याने जाहीरपणे भेट घेत आहे. केवळ पर्रीकर यांचा पुत्र म्हणून उत्पल यांच्या नावाचा विचार होणार नाही, असे भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी म्हटले होते.
त्याबाबत उत्पल यांना गुरुवारी विचारले असता ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्याइतपत मी मोठा नाही.
हेही वाचलंत का?