Goa polls : भाजपच्या ३४ उमेदवारांची यादी जाहीर, मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना पणजीतून तिकीट नाकारलं! - पुढारी

Goa polls : भाजपच्या ३४ उमेदवारांची यादी जाहीर, मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना पणजीतून तिकीट नाकारलं!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळीतून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर मडगावमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे. दरम्यान, पणजी मतदारसंघातून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट देण्यात आले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारी देण्यात आलेली नाही.

भाजपच्या उमेदवारांची घोषणा आज दिल्लीत भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

भाजपने उमेदवारी न दिल्यास आपण काय करणार, असे अनेकवेळा उत्पल यांना विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी अपक्ष का होईना; पण निवडणूक लढण्याचा ठाम निर्धार असल्याचे बोलून दाखविले होते. ‘आता माघार नाही’ अशा शब्दात त्यांनी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, यावर फडणवीस यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ”आम्ही उत्पल पर्रीकर यांना पर्याय दिला होता, पण त्यांनी पहिला पर्याय नाकारला. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी आता दिलेला पर्याय मान्य करायला हवा’, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्याआधी फडणवीस यांनी काँग्रेससह तृणमूल आणि आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला. गोव्यात भाजप सरकारनं विकास केला. पण काँग्रेस सरकारच्या काळात गोव्यात भ्रष्टाचार झाला. रेटून खोटं बोलणं हा ‘आप’चा धंदा आहे. तर तृणमूल काँग्रेसला आधीच गोव्यातील जनतेनं नाकारलंय, अशा शब्दांत त्यांनी विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले. ते दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपने गोव्यात स्थैर्य आणले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण केले आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न नाही, असा दावा फडणवीस यांनी केला.

गोव्यात सर्वांधिक घोटाळे काँग्रेस सरकारच्या काळात झाले. काँग्रेसमुळे गोव्याची प्रतिमा पूर्णपणे डागाळली, असा आरोप त्यांनी केला आहे. तर ‘आप’ हा खोटे बोलून उभा राहिलेला पक्ष आहे. हे काम त्यांनी मागील निवडणुकीतही केले. यामुळे गोव्यातील जनतेने त्यांना नाकारले, असेही फडणवीस म्हणाले.

तृणमूल काँग्रेस गोव्यात सुटकेस घेऊन आली आहे. त्याआधारावरच हा पक्ष गोव्यात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. तृणमूल काँग्रेसनं गोव्यात उमेदवारांचा ‘सेल’ सुरु केला आहे, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला आहे.

Back to top button