

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : पर्ये मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या विरोधात त्यांचेच पुत्र विश्वजित राणे भाजपच्या उमेदवारीवर लढतील, हे मंगळवारी स्पष्ट झाले. पर्येतून आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी जाहीर केल्याच्या तासाभरातच त्यांचे पुत्र विश्वजित यांनी आपण पर्येतून भाजपच्या उमेदवारीवर लढणार असल्याचे जाहीर केले.
निवडणूक लढवून रणांगणात पराभूत होण्यापेक्षा वडिलांनी सन्मानाने बाजूला व्हावे, अशी विनंती करत आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे ते निवडणूक लढवू, असे सांगत आहेत. गेली वीस वर्षे मीच त्यांना निवडून आणत होतो, असा दावाही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला आहे.
गेली पाच दशके सलगपणे विधानसभेत असलेले ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे या विधानसभा निवडणुकीपासून राजकीय निवृत्ती स्वीकारणार काय, या प्रश्नाचे उत्तर अखेर मंगळवारी मिळाले. या विषयावर बाळगलेले मौन राणे यांनी सोडले असून, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांनी मला निवडणुकीला उभे राहा, असा आग्रह केला आणि मी निवडणुकीला उभा राहणार आहे, असे विधान केले आहे. यामुळे पर्ये मतदारसंघातून राणे हेच पुन्हा एकदा निवडणूक लढवतील हे स्पष्ट झाले आहे.
पर्ये विधानसभा मतदारसंघात राणे यांचे पुत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी डॉ. दिव्या सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने पर्ये मतदारसंघात सक्रिय झाल्या होत्या. प्रतापसिंह राणे काँग्रेसचे आमदार असल्याने डॉ. दिव्या या भाजपच्या उमेदवारीवर त्या मतदारसंघातून लढतील काय याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
मध्यंतरी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासोबत राणे यांच्या निवासस्थानी गेले होते. फडवणीस यांनी आता केवळ राणे यांचा आशीर्वाद मिळायचा बाकी आहे, असे वक्तव्य रवी नाईक यांच्या भाजप प्रवेशावेळी फोंडा येथे केले होते. त्यामुळे राणे हे राज्यपालपद स्वीकारणार काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर राणे यांनी राज्यपाल पदात आपल्याला रस नाही. शेती करेन, असे स्पष्ट केले होते. मात्र निवडणूक लढवण्याविषयी गूढ कायम ठेवले होते.
राणे म्हणाले, की आपण वाळपई मतदारसंघात हस्तक्षेप केलेला नाही. पर्ये मतदारसंघात कोणी हस्तक्षेप करत असेल तर माझ्या काँग्रेस पक्षासाठी मतदान करा, असे आवाहन वाळपईतील जनतेला करावे लागेल. फडणवीस यांच्या घरी येण्याविषयी बोलताना ते म्हणाले, घरी कोणी आले तर जेऊखाऊ घालणे हा शिष्टाचार आहे. त्यामुळे मी पक्षांतराचा निर्णय घेतला असा होत नाही. 50 वर्षांत मी अनेकांना पक्षांतर करताना पाहिले आहे. त्यामुळे पक्षांतराविषयी मला आश्चर्य वाटत नाही. कार्यकर्त्यांच्या आग्रह हा मीच याखेपेला निवडणूक लढवावी, असा आहे. मी काँग्रेसमध्ये असल्याने काँग्रेसकडूनच लढणार. मला उमेदवारी द्यावी की नाही हा पक्षाचा निर्णय असेल.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले,आम्हीच युवकांना संधी दिली पाहिजे, असे म्हणत असू तर त्यांनी निवडणूक लढवता कामा नये. ते व मी निवडणुकीला उभे राहिलो तर कार्यकर्ते दुखावले जातील. काँग्रेसचे सरकार येणार नसल्याने प्रतापसिंह राणे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. एक आधारवड म्हणून आम्ही त्यांना मानतो. वयोमानानुसार त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. मीही आणखीन वीस वर्षे सक्रिय राहू शकतो. तेव्हा मी सन्मानपूर्वक निवृत्त होणार.
पक्षश्रेष्ठींच्या दबावाखाली येऊन निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आरोग्यानुसार निर्णय घेतला पाहिजे. ते आता या वयात फिरू शकतील काय याचा विचार करू त्यांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांना वडील म्हणून मी फार मानतो. मात्र भाजपला पर्येतून विजय मिळवून देण्यासाठी मलाच तेथे निवडणूक लढवावी लागणार आहे. मी त्यांना विनंती केली आहे आता निवडणुकीच्या माध्यमातून विषय पुढे न्यावा लागेल. मी पर्येतून 10 हजार मतांनी विजयी होईन
…तर माझा नाईलाज
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे म्हणाले, मी पणजीला स्थायिक झालेलो नाही. माझ्या घरासमोरील रस्त्यापलीकडे सत्तरी सुरू होते. दररोज सकाळी सत्तरीवासिय मला भेटण्यासाठी येतात. त्यांच्याशी, प्रमुख कार्यकर्त्यांशी नित्य संवाद आहे. त्यामुळे माझा युवकांशी संपर्क आता राहिलेला नाही, या दाव्यात काही तथ्य नाही. माझ्या विरोधात विश्वजित लढणार असतील तर माझा नाईलाज आहे.
83 हे निवडणूक लढवण्याचे वय नव्हे
आरोग्यमंत्री विश्वजित राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, युवकांना आता संधी दिली पाहिजे. या वयात त्यांनी निवडणूक लढवू नये. मी भाजपचा पर्ये मतदारसंघातील उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली हे सांगताना वाईट वाटत आहे. पर्येतील युवक व महिला मला निवडून देतील, असे मला वाटते. 83 हे निवडणूक लढवण्याचे वय नव्हे, त्यांनी आता राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे.