गोवा : प्रतापसिंह राणे उमेदवारी नाकारणार

प्रतापसिंह राणे
प्रतापसिंह राणे
Published on
Updated on

पणजी ; अवित बगळे : पर्ये विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह राणे यांच्याविरोधात त्यांचेच पुत्र विश्वजित राणे हे भाजपचे उमेदवार अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. 'पन्‍नास वर्षे विधानसभेत आहे; आता बस्स झाले. निवृत्त होईन,' असे सांगत राणे यांनी मी काँग्रेसकडे उमेदवारी मागितलीच नसल्याचे दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले. आपण पर्ये मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे त्यांनी जाहीर केल्याच्या 48 तासांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसने उमेदवारीच्या पहिल्या यादीत राणे यांना स्थान दिले नव्हते. त्यांनी निवडणूक लढवण्याविषयी सूचक उद‍्गार काढल्यावर लगेच दुसर्‍या दिवशी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने राणे यांची पर्ये मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी तसे पत्रक जारी केले.

पहिल्या यादीतील उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पक्षाचाच राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अन्य एक उमेदवार सुधीर कांदोळकर हेही 'अद्याप आपण काँग्रेसमध्ये', असे सूचक उद‍्गार काढत आहेत.त्यातच राणे यांनी उमेदवारी नाकारली तर काँग्रेसकडे निवडणूक लढवण्यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत वगळता अन्य ज्येष्ठ नेताच शिल्लक राहणार नाही.

राणे यांनी 1972 मध्ये मगोचे आमदार म्हणून विधानसभेत पहिल्यांदा पाऊल ठेवले. ते महसूलमंत्री झाले. 1987 मध्ये घटकराज्य अस्तित्वात येईपर्यंत वाळपई मतदारसंघाचे ते एका वेळेसाठी मगोचे व नंतर सलगपणे काँग्रेसचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होते. घटक राज्यानंतर ते पर्ये मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत होते.

अलीकडेच त्यांच्या निवासस्थानी भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह भेट दिली होती.तेव्हापासून राणे हे राजकीय निवृत्ती घेतील, अशी चर्चा सुरू झाली होती. याचदरम्यान त्यांना राज्यपाल पदही दिले जाईल, अशी माहिती सामाईक झाली होती; मात्र आपण शेती करेन, राज्यपालपदी जाणार नाही, असा खुलासाही राणे यांनी केला होता. राणे यांनी विधानसभेतही आपले कृषी क्षेत्रावरील प्रेम अनेकदा दाखवून दिले होते.

यामुळे ते त्या क्षेत्राकडे वळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. बाबू नायक विरुद्ध विल्फे्र ड डिसोझा यांच्यातील राजकीय वादामुळे राणे यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सभापती अशी सार्वजनिक राजकीय जीवनातील सर्व पदे गेल्या 50 वर्षात त्यांनी भूषविली आहेत.

काँग्रेसला पर्येत प्रथमच उमेदवार शोधावा लागणार

सहावेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या राणेंनी पर्येतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यावर भाजपमध्ये असलेले त्यांचे पुत्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. 84 हे वय निवडणूक लढवण्याचे नसून त्यांनी आता सन्मानाने राजकीय निवृत्ती घ्यावी, असे आवाहनही विश्वजित यांनी केले होते. राणे यांच्या या वादाचा फायदा घेत घाईघाईने काँग्रेसने राणे यांची एकट्याची उमेदवारी जाहीर केली होती. राणे यांनी आता निवृत्तीची भाषा बोलणे सुरू केल्याने काँग्रेसला पर्येत प्रथमच उमेदवार शोधावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news