ब्लॉग : डार्क सोशल, फेसबुक आणि काळीकभिन्न मनोवृत्ती… | पुढारी

ब्लॉग : डार्क सोशल, फेसबुक आणि काळीकभिन्न मनोवृत्ती…

चर्चा तर खूप झाली… फेसबुकबद्दल… व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल… गोपनीयतेबद्दल… काहीनी फेसबुक अकाऊंट डिलिटही केले… तर काहींनी फेसबुक अकाऊंट डिलिट करा असा मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी फेसबुक पोस्टचाच वापर केला… मित्रांमध्ये… ऑफिसमध्ये… सोशल मीडियामध्ये… आणि काही घरांमध्येही चहाचे कप रिते करत यावर पुष्कळ गप्पा झाल्या आणि परत सगळे सोशल मीडियाकडे वळले. खरंतर यापेक्षा वेगळं आणखी काही होईल, अशी अपेक्षाही नव्हती. आणि हे सगळं माहिती असल्यामुळेच तिकडे मार्क झकरबर्ग बिनदिक्कतपणे माफीवर माफी मागून निवांत होता. पडद्याच्या अल्याड हे सगळं सुरू असताना पल्याड या सगळ्याच्या निर्मितीमागे गुंतलेल्यांमध्ये वेगळ्याच प्रश्नावर मंथन सुरू आहे. डार्क सोशल ट्रॅफिक कशा पद्धतीने मोजता येईल आणि त्याला डायरेक्ट ट्रॅफिकमधून कसं वेगळं काढता येईल, हा विषय गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन विश्वात चर्चेत आहे. डार्क सोशल हा वेब अॅनालिटिक्सपुढील मोठा प्रश्न आहे. याच अॅनालिटिक्सच्या आधारवर वेबविश्वात अनेक डावपेच रचले जातात आणि ते यशस्वीही केले जातात. पण डार्क सोशलमुळे अॅनालिटिक्सच्या पायालाच धक्का बसू शकेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

फेसबुकवर आपण काय काय करतो, यावर जशी काही यंत्रणा लक्ष ठेवून असते. अगदी त्यासारखंच ऑनलाईन विश्वात किंवा वेबसाईटच्या विश्वात कोण काय करतंय, तो कुठून आलाय, तो कुठला ब्राऊझर वापरतो, किती वेळ कोणत्या साईटवर असतो, तो स्त्री आहे की पुरुष, कोणत्या देशात कोणत्या शहरात राहतो, कोणते विषय वाचतो, कुठल्या पानावरून बाऊन्स होऊन निघून जातो, हे सगळं जाणून घेण्याचं काम अॅनालिटिक्सच्या माध्यमातून सगळेच करत असतात. अगदी आपण ज्यांना विश्वासार्ह वगैरे समजत असतो, अशा वेबसाईटही हे करत असतातच. आणि याच अॅनालिटिक्सच्या आधारावर पुढील स्ट्रॅटेजी ठरत असते आणि ती अंमलात आणली जात असते. त्यामुळे उगाच फेसबुक डिलिट केले म्हणजे आपली गोपनीयता वाचली वगैरे मुर्खांच्या स्वर्गात राहण्यात काहीच हाशील नाही एवढंच समजून घेतले पाहिजे. तर मुद्दा डार्क सोशलचा. आपण अनेकवेळा वेगवेगळ्या लिंक्स एकमेकांना फॉरवर्ड करत असतो. कधी कधी त्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केल्या जातात तर कधीकधी मेसेंजरच्या माध्यमातून पाठवल्या जातात. आता या लिंकवर कोणी क्लीक केले आणि तो संबंधित वेबसाईटवर गेला तर अॅनालिटिक्समध्ये सध्या तरी ते डायरेक्ट ट्रॅफिक दाखवले जाते. जे वास्तविक तसे नाही. कारण हा युझर एकतर रेफरल किंवा सोशल या दोन प्रकारच्या ट्रॅफिकच्या माध्यमातून वेबसाईटवर आलाय. त्यामुळे त्याला डायरेक्टली साईटवर आलेला युझर समजणं म्हणजे पुढचं सगळं नियोजन चुकवून ठेवण्यासारखं आहे. त्यामुळे अशा युझरला किवा वाचकाला कोणत्या गटात ठेवायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्याला आपण डायरेक्ट ट्रॅफिक म्हणतो. ज्यात वाचक थेट ब्राऊझरमध्ये संबंधित डोमेन नेम किंवा युआरएल टाईप करून आलेला असतो. ते ट्रॅफिक गेल्या काही वर्षांमध्ये कमी कमी होत चालले आहे. त्त्यात डार्क सोशल पद्धतीने येणारे ट्रॅफिक डायरेक्ट ट्रॅफिकमध्ये मोजणे म्हणजे आपल्याच हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. म्हणून तर डार्क सोशल वेबविश्वात कळीचा मुद्दा आहे.

फेसबुक डेटा लीक प्रकरणावरून जे काही घडलं ते तर आपण सगळ्यांनीच बघितलं. वास्तविक यापूर्वीही झकरबर्गने वेगवेगळ्या निमित्तानं कंपनीकडून झालेल्या चुका मान्य केल्या होत्याच आणि भविष्यात आणखी सुधारणा करण्याचे आश्वासनही दिले होते. पण चुकांचे ठिकाण आणि निमित्त बदलत गेलंय. पण त्या होण्याचं काही थांबलेलं नाही. नव्याने कोणते ना कोणते प्रकरण पुढे येते आणि परत झकरबर्ग माफी मागून रिकामा होता. पण त्यालाही हे सगळं थांबवणं किंवा थोपवून धरणं एका मर्यादेपलीकडे शक्य नाही, हे वास्तव जाणून घेतलं पाहिजे. कारण एवढा मोठा डोलारा सांभाळण्यासाठी लागणारा पैसा येणार कुठून हे जोपर्यंत समजून घेत नाही, तोपर्यंत झकरबर्गची अपरिहार्यता लक्षात येणार नाही. दोनच दिवसांपूर्वी वाचलं की कर्नाटकमधील निवडणुकीत कोणी फेसबुकचा गैरवापर करून अपप्रचार करू नये, यासाठी कंपनीने एका त्रयस्थ कंपनीबरोबर करार केला असून, त्यामाध्यमातून खोट्या पोस्टचे वितरण रोखण्यावर लक्ष दिले जाणार आहे. आता मुळात खोटी पोस्ट ही संकल्पनाच गोंधळलेली आहे आणि हे उघड केल्यामुळे तर परिस्थिती आणखी अवघड होऊ शकते. कारण वरवर खोटी असणारी माहितीही वेगळ्या रुपात मांडून ती खरी ठरवता येऊ शकते. बरं त्यातूनही त्या त्रयस्थ कंपनीने अगदी संशोधन करून शोधून काढले की ती पोस्ट खोटी होती तरी हे सगळं लक्षात येईपर्यंत त्या पोस्टने जे काही साध्य करायचे आहे ते साध्य केलेले असेल. मग नंतर तिचे वितरण रोखून हातात काहीच पडणार नाही, एवढं निश्चित. फेसबुकला खरंच या सगळ्यावर उपाय द्यायचा असता तर निवडणुकीच्या काळात कोणत्याही पेजवरून कुठलीच पोस्ट पैसे लावून बूस्ट करता येणार नाही किंवा शेअर करता येणार नाही, अशा स्वरुपाचा काही निर्णय घ्यायला हवा होता. पण  बिझनेस कोण सोडणार, याचा विचार करून फेसबुकने थातूर मातूर मलमपट्टी करण्यापलीकडे काहीच केलेले नाही. फेसबुक ही काही धर्मादाय कंपनी नाही.

त्याचबरोबर सगळं फुकट देणारी कोणतीच वेबसाईट जनकल्याणासाठी काहीच चालवत नसते. पैसा तर सगळ्यांनाच कमवायचा असतो. फक्त तो थेट वाचक किंवा युझर किंवा ग्राहकाकडून मागितला जात नाही. तर त्याची माहिती विकून किंवा त्या माहितीच्या आधारे स्ट्रॅटेजी आखून कमावला जातो. एखादा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर तुम्ही ऑनलाईन आल्यानंतर साधारणपणे १०० पेक्षा अधिक वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला ट्रॅक करत असतात. आणि मग तुमच्या मनातलं ओळखल्याप्रमाणे वेगवेगळ्या जाहिराती किंवा मजकूर तुमच्या पुढ्यात ठेवत असतात.   हे सगळं गेली काही वर्षे निर्धोकपणे सुरू आहे. आणि फुकटच हवं असेल तर पुढेही सुरूच राहणार आहे. फेसबुक आणि इतर कंपन्या मुख्यतः पैसे कमावण्यासाठीच ट्रॅकिंगचा वापर करत असतात. त्याव्यतिरिक्त इतरही उद्देश असतात. पण पैसा हा त्याच मोलाची भूमिका निभावतो. पण आपल्यापैकी अनेकजणही कुठलाच मागचा पुढचा विचार न करता नको त्या पोस्ट शेअर करून स्वतःच्या काळ्याकभिन्न मनोवृत्तीचे दर्शन घडवत असतातच की. त्यांच्याबद्दल काय बोलणार… त्यांना कसं रोखणार हा सुद्धा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहेच की. आपण काय करतोय, आपल्या कृतीमुळे समाजात दुही निर्माण होऊ शकते, सर्वसामान्यांना नाहक बळी पडावे लागू शकते, याचा कोणताच विचार न करता स्वतःला सुशिक्षित समजणारे काही लोक निव्वळ वेड्यासारखे वागतात. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या चुकांच काय, त्यावर कोण उपाय शोधणार हे सुद्धा डेटा लीक इतकेच किबहुना जास्तच महत्त्वाचे आहे. 

– विश्वनाथ गरुड

wishwanathhere@gmail.com

Back to top button