

टेकन्यूज: यूट्यूबने (YouTube) भारतात एक नवं फीचर‘Hype’ अधिकृतपणे लॉन्च केलं आहे. या फीचरच्या मदतीने सबस्क्रायबर्सची संख्या ५ लाखांपेक्षा कमी असलेल्या क्रिएटर्सना त्यांच्या व्हिडिओंचं प्रमोशन करता येणार आहे. ‘Hype’ फीचरमुळे त्यांचे व्हिडिओ लीडरबोर्डवर झळकतील आणि अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतील.
YouTube च्या माहितीनुसार, नव्या व्हिडिओंना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही अनेक क्रिएटर्ससाठी मोठी अडचण असते. हे लक्षात घेऊनच YouTube ने 'Hype' नावाचं फीचर आणलं आहे. हे व्हिडिओवरील Like बटणाच्या खालोखाल दिसेल.
प्रेक्षक व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्या ७ दिवसांपर्यंतच Hype करू शकतात.
प्रत्येक युजर आठवड्यात ३ वेळा फ्री Hype करू शकतो.
जितक्या वेळा Hype केलं जाईल, तितक्या वेळा व्हिडिओचा लीडरबोर्डवर रँक वाढतो.
Hype मिळालेल्या व्हिडिओंना पॉइंट्स दिले जातात आणि हे व्हिडिओ देशातील टॉप १०० Hype व्हिडिओंच्या यादीत दाखवले जातात. ही यादी YouTube च्या Explore सेक्शनमध्ये पाहता येते. टॉप रँकिंग व्हिडिओंना YouTube च्या होमपेजवरही स्थान मिळू शकतं.
यूट्यूबच्या (YouTube) मते, हे फीचर खासकरून छोट्या क्रिएटर्ससाठी वरदान ठरणार आहे. ज्यांचे सबस्क्रायबर्स कमी आहेत, त्यांना अधिक बोनस पॉइंट्स मिळतील. त्यामुळे त्यांच्या कंटेंटचा पसार मोठ्या प्रमाणात होईल आणि या फीचरचा वापर करून नवीन प्रेक्षक जोडण्यासही याची मदत होईल.
हे फीचर यूट्यूबने (YouTube) २०२४ मध्ये जागतिक पातळीवर लॉन्च केलं होतं. सुरुवातीला तुर्की, तैवान आणि ब्राझीलमध्ये टेस्ट करण्यात आलं. अवघ्या ४ आठवड्यांत ५० लाखांहून अधिक वेळा Hype फीचरचा वापर झाला.
Hype व्यतिरिक्त, YouTube ने AI आधारित ऑटो डबिंग, डिजिटल गिफ्ट्स, आणि इंटरअॅक्टिव टूल्स देखील रोलआउट केले आहेत, जे क्रिएटर्संना अधिक प्रभावी पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतील.