

पुढारी ऑनलाईन डेस्क
ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) डाउन झाल्याच्या तक्रारी काही यूजर्संनी नोंदवल्या आहेत. YouTube ॲप, वेबसाइटसह व्हिडिओ अपलोड करताना समस्या जाणवत असल्याचे काही यूजर्संचे म्हणणे आहे. यूट्यूब डाउन झाल्याच्या तक्रारी सोमवारी दुपारी १.३० PM पासून DownDetector ॲपवर नोंदवल्या गेल्या. तर ४.१५ पर्यंत या तक्रारी वाढत गेल्या.
DownDetector वरील माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२ टक्के यूजर्संनी व्हिडिओ अपलोड करताना समस्या येत असल्याची नोंद केली आहे. २३ टक्के यूजर्संना YouTub App वर तर १५ टक्के यूजर्संना YouTube वेबसाइटवर समस्या जाणवली. सध्या नेमकी काय समस्या काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्व प्रकारच्या सेवांसह समस्या आणि आउटेजचा रिअलटाइम नोंद घेणारा डाउनडिटेक्टर हा एक प्लॅटफॉर्म आहे. त्यावर यूजर्संनी यूट्यूब डाउन झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.
YouTube वरील काही यूजर्संनी त्यांच्या फीडवरील व्हिडिओंसह येत असलेल्या समस्यांबद्दल X वर पोस्ट केल्या आहेत. एका यूजर्सने म्हटले आहे की, जेव्हा मी YouTube शॉर्ट अपलोड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो YouTube स्टुडिओ किंवा माझ्या चॅनलवर दिसत नाही. कृपया YouTube याचे निराकरण करावे.
गेल्या शुक्रवारी मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प (Microsoft Global Outage) झाल्या होत्या. याचा फटका विमान, आरोग्य सेवा, शिपिंग, औद्योगिक अस्थापने, शेअर बाजार, बँका आणि युजर्संना बसला. सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेटमध्ये झालेल्या चुकीमुळे जगभरात हे आउटेज झाले होते.