Supreme Court's YouTube | हॅक झालेले YouTube चॅनल बंद करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय
पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अधिकृत YouTube चॅनल संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल आज (दि.२० सप्टेंबर) सकाळी हॅक झाले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने YouTube चॅनल बंद करून यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती स्वत: सर्वोच्च न्यायालयाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून चॅनल बंद निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “सर्व संबंधितांना कळविण्यात येत आहे की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल काढून टाकण्यात आले आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवरील सेवा लवकरच पुन्हा सुरू केल्या जातील,” असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या YouTube वर क्रिप्टोकरन्सीचा प्रचार
'बार ॲण्ड बेंच'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब (YouTube) चॅनल हॅक झाले. या चॅनेलवर अमेरिकेतील कंपनी रिपल लॅब्सने विकसित केलेल्या XRP या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची दखल घेत ठोस पाऊले उचलली आहेत.
Supreme Court's YouTube channel | 2 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स होते
सर्वोच्च न्यायालयाच्या या यूट्यूब चॅनेलवर (YouTube) सर्वोच्च न्यायालय घटनापीठांसमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हितसंबंध असलेल्या प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असते. अलीकडेच, कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार आणि खून खटल्यावरील सुओ मोटू खटल्याच्या सुनावणीचे YouTube वर थेट प्रसारण करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचे अधिकृत YouTube चॅनलचे 2 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स असल्याचेही वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

