जागरूकता महत्त्वाचीच | पुढारी

जागरूकता महत्त्वाचीच

शाळा, कॉलेज, नोकरी, उद्योगाच्या ठिकाणी किंवा अगदी पोलिस खात्यातसुद्धा स्त्री सुरक्षित नाही, हे आता काही उदाहरणांनी सिद्ध केलेय; पण म्हणून तिने स्वत:ला पुन्हा पूर्वीच्या काळातील स्त्रियांसारखे चार भिंतीच्या आत कोंडून घ्यायचे का? स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे तरी घेतले पाहिजेत किंवा स्वत: प्रत्येकवेळी जागरूक असले पाहिजे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जग आहे… स्त्री अवकाशाला गवसणी घालू शकते… अंतराळ सफरीत महिलांचे वर्चस्व…! या गोष्टी कितीही खर्‍या आणि जगासमोर स्त्री शक्तीचा जागर करणार्‍या असतील तर आजही स्त्री सुरक्षित आहे का, हा मोठा प्रश्न आहे. लहान बालिकेपासून ते वृद्धत्वाकडे झुकलेली महिला सुरक्षित नाही. शाळा, कॉलेज, नोकरी, उद्योगाच्या ठिकाणी किंवा अगदी पोलिस खात्यातसुद्धा स्त्री सुरक्षित नाही, हे आता काही उदाहरणांनी सिद्ध केलेय; पण म्हणून तिने स्वत:ला पुन्हा पूर्वीच्या काळातील स्त्रियांसारखे चार भिंतीच्या आत कोंडून घ्यायचे का? स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे तरी घेतले पाहिजेत किंवा स्वत: प्रत्येकवेळी जागरूक असले पाहिजे. नेहमी सावध आणि जागरूकतेसाठी काही गोष्टी पाळल्या तर होणारे अनर्थ टाळता येतील.

१. तुम्ही जिथे नोकरी करता तिथे प्रथम तुमचे वर्तनच योग्य असले पाहिजे. तुमच्या कोणत्याही बोलण्यातून किंवा बॉडी लँग्वेजमधून पुरुष सहकार्‍यांना किंवा बॉसला तुम्ही काही चुकीचे वागता आहात किंवा थोडा उथळपणा होतोय, असे दिसता कामा नये.

संबंधित बातम्या

२. तुमचा जास्तीत जास्त वेळ नोकरी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी जातो. त्यामुळे तुम्ही स्वत: पुरुष आणि महिला सहकार्‍यांशी सहकार्‍याची भावना ठेवून वागा. रोजचे एकत्र काम करणे असल्यामुळे कटूता टाळून काम करण्याचा कल ठेवा.

३. काही कंपन्या कर्मचार्‍यांना ने-आण करण्यासाठी कंपनीची बस, कारची सोय करतात. अशा कार आणि बसमधून जाताना आपले पुरुष किंवा महिला सहकार्‍यांशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध असावेत. जेणेकरून ऐनवेळी ते तुमच्या मदतीसाठी येतील.

४. कंपनीच्या बसमधून एकटीने प्रवास करणे टाळा. ने-आण करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून खून वगैरे अशा कितीतरी घटना मेट्रोसिटीत घडल्याच्या पहायला मिळतात.

५. शाळा, कॉलेजही या गोष्टीतून सुटलेले नाही. शाळा, कॉलेजमध्ये काही शिक्षक, प्राध्यापकही वरील वृत्तीचे असतात. त्यामुळे अशा लोकांशी चार हात लांबच राहणे उत्तम.

६. तुम्ही तुमच्या कॉलेजमधील मित्रमंडळींबरोबर फिरायला, पार्टीला जाणार असाल तर तुमाच्या घरच्यांना ते ठिकाण, ज्यांच्याकडे जाणार आहात त्यांचे फोन नंबर देऊन ठेवा.

७. ऐनवेळी तुम्ही अडचणीत सापडलाय. मोबाईल आहे; पण सांगणे अवघड आहे. तेव्हा अचानक तुम्हाला तुमच्या घरातील किंवा मित्र, मैत्रिणींचा फोन आला तर तुम्ही संकटात आहात याची जाणीव करून देणारी काही वाक्ये फोनवर बोला.

८. एका बलात्कार प्रकरणात मुलीला आईचा फोन आला. तेव्हा त्या नराधमांनी तिला बोलण्यास फोन दिला; पण काही सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. पण ऐन वेळी तिला बोलण्यास काही सुचले नाही आणि पुढे तिच्याबाबत दुर्दैवी घटना घडली. आईला तिच्या आवाजावरूनही ती संकटात आहे, हे कळले असते. त्यामुळे काही कोड लँग्वेज ठरवून ठेवा. ज्या तुम्हाला, आईला किंवा मित्र-मैत्रिणींना माहीत असतील.

ही काही थोड्या प्रमाणातील जागरूकता ठेवली तर तुमच्या बाबतीत होणारे अनर्थ टाळता येतील. (जागर)

Back to top button