नाण्यांच्या दागिन्यांचा खणखणाट | पुढारी

नाण्यांच्या दागिन्यांचा खणखणाट

नाण्यांचे दागिने वापरण्याचा कल फार पूर्वीपासूनचा आहे. हे दागिने तुम्ही साडीबरोबर घाला किंवा पाश्चात्त्य प्रकारच्या कपड्यांबरोबर घाला, ते तुम्हाला काळाबरोबर ठेवतात आणि बाणेदारपणा समोर आणतात.

पारंपारिक दागिने हे नेहमीच आकर्षणाचा विषय राहिले आहेत. पारंपरिक वेशभूषेबरोबर ते अंगावर घातले जातात, तेव्हा ते कपड्यांच्याच नव्हे ते ल्यायलेल्या माणसाच्या दिसण्यातही बदल घडवतात. पारंपरिक दागिने बनवताना त्यात रत्ने, नाणी आणि इतरही मौल्यवान वस्तू मौल्यवान किंवा खोट्या धातूत बसवले जातात.

नाण्यांचा शोध लागल्यापासूनच नाण्यांचे दागिने तयार केले जातात. प्राचीन उत्खननात याचे पुरावे सापडतात. हजारो वर्षांपासून हे दागिने वापरले जात असल्याचा पुरावा यात सापडतो. हे दागिने आजच्या काळातही आपली लोकप्रियता टिकवून आहेत. हे दागिने वापरायला सोपे असतात. सध्या ते टेंपल ज्वेलरी प्रकारात बनवले जातात. यातील काही प्रकार पाहूया.

संबंधित बातम्या

नाण्यांचा भला मोठा नेकलेस

हा नेकलेस लग्नात किंवा पारंपरिक पद्धतीच्या कौटुंबिक कार्यक्रमात वापरू शकता. तुमच्या आवडीचा लेहंगा किंवा साडीवर घालू शकता. कोणत्याही भारतीय प्रकारच्या कपड्यावर हे दागिने शोभून दिसतील. कांजीवरम सिल्क साडीवर हे दागिने खूपच उठून दिसतील. तुमच्या आवडीच्या अनारकली कुडत्यावर नाण्याचे फक्त कानातले घालूनही छान दिसू शकता.

टेम्पल ज्वेलरीमध्ये गळ्याभोवती बसणारा नाण्यांचा दागिना सध्या बराच प्रचलित आहे. नाण्यांचे हे दागिने तुम्ही पाश्चात्त्य पद्धतीच्या कपड्यांवरही वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला देशी- विदेशी असा एकत्रित परिणाम साधता येईल. गळ्यात घातलेले एका नाण्याचे पदकही तुम्हाला हजारो वर्षांच्या परंपरेचा भाग बनवू शकते.

झुमके किंवा कर्णफुले हा तर परंपरेचा भागच आहे. नाण्यांची कर्णफुले तुमच्या पोशाखाला वेगळाच आयाम देतील. मोठ्या जरीकाठाच्या साड्या किंवा पारंपरिक जरतारी पोशाखांवर ही कर्णफुले नक्कीच उठून दिसतील. तुम्हाला तुमच्या दिसण्यात वेगळेपणा आणण्यासाठी पाश्चात्त्य पद्धतीच्या गाऊनवर तुम्ही ही कर्णफुले घालू शकता. याप्रकारे फॅशनच्या दुनियेत तुम्ही एक नवा पायंडा पाडू शकता. पारंपरिक किंवा चालू काळातील कोणत्याही प्रकारच्या कपड्यांवर हे वैशिष्ट्य आहे.

चंद्रबाळी

टेम्पल ज्वेलरी चंद्रबाळी प्रकाराशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पारंपरिकपणा हवा असेल तर जडाऊ, बारीक कलाकुसर केलेल्या बाळी किंवा कर्णभूषण किंवा डूल घातल्याशिवाय पर्याय नाही. पारंपरिक पोशाखाबरोबर चंद्रबाळी हा अगदी योग्य दागिना आहे असेच म्हणायला हवे. चंद्रबाळी पारंपरिक पोशाखावर घातल्या जातातच; पण पाश्चात्त्य पद्धतीच्या पोशाखावरही वापरल्या जातात. कृत्रिम खडे, रत्ने यांनी जडवलेल्या या बाळ्या तुमच्या पोशाखाला पारंपरिक लूक देतात. या बाळी तुम्ही नेकलेसबरोबर घातल्यात तर तुमच्या दिसण्याला चार चांद लागतील. ही बाळी तयार करायला प्रामुख्याने लाल आणि हिरव्या रंगाच्या खड्यांचा वापर केला जातो.

नव्या प्रकारचे डुल किंवा बाळ्याही नाण्यांपासून बनवल्या जातात. नव्या- जुन्याच्या मिश्रणाने या बाळ्या बनवल्या जातात. कोणत्याही प्रकारच्या पोशाखावर तुम्ही त्या वापरू शकता. दोन वेगवेगळ्या रंगांच्या धातूच्या रिंगा एकत्र करून तुम्ही एक वेगळाच प्रकार वाररू शकता.

नाण्यांचे हातातले कडे हादेखील एकदम अनोखा दागिना आहे. यामुळे तुम्ही स्वतःला सुंदर पारंपरिक पद्धतीने सादर करू शकता. या कड्याबरोबर तुम्ही बांगड्याही घालू शकता किंवा फक्त कडे घालू शकता. कोणत्याही पोशाखावर ते सहज जमून येईल.
हातातले कडे असू शकते तर पायातले कडे का नको? पूर्वी लोक अतिशय जड कडे वापरत; पण आधुनिक काळात मात्र हलक्या वजनाचे पायातले कडे जास्त लोकप्रिय आहे.

नाण्यांचे दागिने वापरण्याचा कल फार पूर्वीपासूनचा आहे. हे दागिने तुम्ही साडीबरोबर घाला किंवा पाश्चात्त्य प्रकारच्या कपड्यांबरोबर घाला, ते तुम्हाला काळाबरोबर ठेवतात आणि बाणेदारपणा समोर आणतात. एका नाण्याने बनवलेला दागिना असो किंवा अगणित नाण्यांनी बनवलेला, हे दोन्ही प्रकार वेगळा लूक देतात. गळ्यातला साधा दागिना असो की, मोठ्या नाण्याचे कानातले झुमके तुमचे व्यक्तिमत्त्व उठावदार करतील.
– मेघना ठक्कर

Back to top button