घरीच बनवा मॉश्‍चरायझर | पुढारी | पुढारी

घरीच बनवा मॉश्‍चरायझर | पुढारी

स्वाती देसाई

कोणत्याही ऋतूत  त्वचा मऊसुत राहण्यासाठी तिचे पोषण होणे आवश्यक असते. उन्हाळा असो किवा पावसाळा त्वचेचे पोषण आवश्यक असते. पावसाळ्यात कमी प्रमाणात का होईना पण मॉश्‍चरायझरची आवश्यकता असतेच. मॉश्‍चरायझरमुळे त्वचा मुलायम होतेच पण त्वचेवरील सुरकुत्याही नष्ट होतात. चांगल्या त्वचेसाठी मॉश्‍चरायझरचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. मात्र बाजारातील या मॉश्‍चरायझरच्या किंमती इतक्या जास्त असतात की सातत्याने ते विकत घेणे अवघडच आहे. शिवाय ती टिकून राहाण्यासाठी विशिष्ट प्रकारची प्रिझर्व्हेटिव्ह घातलेली असतात. त्याचा दूरगामी परिणाम त्वचेवर होत असतो. 

खात्रीशीर चांगल्या पद्धतीचे मॉश्‍चरायझर आपण घरच्या घरी बनवू शकतो. आणि ते फ्रीजमध्ये साठवणूक करून ठेवू शकतो. जशी गरज लागेल तसे ते वापरता येते. 

संबंधित बातम्या

लव्हेंडर तेल आणि नारळाचे तेल –  अर्धा कप नारळ तेलात 1 टेबलस्पून व्हिटामीन ई तेल आणि लव्हेंडर इसेन्शिअल तेलाचे काही थेंब टाकावेत. हे लावल्याने स्नायूंना आराम मिळेलच परंतु चेहर्‍यावरील डागसुद्धा दूर होतात. 

मिल्की स्प्रे – एका स्प्रे बॉटलमध्ये दूध भरा. त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब मिसळा. त्वचा ताजीतवानी रहावी तसेच आरोग्यदायी रहावी यासाठी हे मिश्रण दिवसातून तीनवेळा चेहर्‍याला लावावे. 

कोरफड जेल – 1 कप कोरफडीचे जेल, एक चमचा व्हिटामीन ई तेल, 2 चमचे बदामाचे तेल हे सर्व मिळून मिश्रण तयार करा. गरज वाटल्यास आपल्या आवडीचे इन्सेन्शिअल तेल त्यात मिसळा. 

शिया बटर – शिया बटर हे उत्तम मॉश्‍चरायझर आहे. यामुळे त्वचेवरील घाण, धूळ साफ करण्याचे गुण आहेत. त्वचेला लावताना मात्र योग्य प्रमाणात लावले पाहिजे नाहीतर चेहरा तेलकट, चिकट होतो. 

पिअर क्रीम – ताजे पेअर किंवा नाश्पतीचा रस आणि हेवी क्रीम दोन्ही समप्रमाणात एकत्र मिसळावेत. हे मिश्रण मॉश्‍चरायझर सारखे लावावे. हे मॉश्‍चरायझर कायमच फ्रीजमध्ये ठेवावे अन्यथा त्यातील क्रीम खराब होण्याचा धोका असतो. 

ग्लिसरीन आणि गुलाबपणी – 2 चमचे ग्लिसरिन आणि 1 चमचा गुलाबपाणी एकत्र करावे. त्या मिश्रणाचा वापर मॉश्‍चरायझरसारखा करावा. सर्व प्रकारच्या त्वचेला याचा फायदा होतो. 

अव्हाकॅडो फेस मास्क – 1 कप अव्हाकॅडोचा गर त्यात 1 चमचा मध, 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा कप दही मिसळून ते चांगले एकत्र करा. हा मास्क चेहर्‍याला लावण्यापूर्वी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावे. त्वचेवर उत्तम परिणाम पाहण्यासाठी आठवड्यातून एकदा हा मास्क चेहर्‍याला लावावा. 

ग्रीन टी मॉश्‍चरायझर – 1 कप ग्रीन टी तयार करावा. थंड झाला की 2 चमचे चहा त्यात 2 चमचे ग्लिसरीन घालून त्यात 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. मेकअप करण्यापूर्वी हेच मॉश्‍चरायझर चेहर्‍याला लावावे. 

बदाम तेल मॉश्‍चरायझर- एका पॅनमध्ये 1 चमचा पेट्रोलियम जेली गरम करून घ्यावी. ती विरघळल्यावर त्यात 2 चमचे  बदाम तेल घालावे आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळावा. त्वचेसाठी हे मॉश्‍चरायझर सर्वात चांगले असते. 

 

Back to top button