अन्‍नपूर्णा : मसाला खिचडी | पुढारी | पुढारी

अन्‍नपूर्णा : मसाला खिचडी | पुढारी

बरेचवेळा रात्री जेवायला काय करायचे, हा प्रश्‍न असतो.  पूर्वीपासून आपल्याकडे रात्रीच्या जेवणाला भाताचा काही तरी प्रकार करायचा, अशी पद्धत आहे. त्यात फोडणीचा भात, मुगाच्या डाळीची खिचडी, नुसताच आमटी-भात असे हलके पदार्थ करायची पद्धत आहे.  परंतु, अलीकडे सर्वांना थोडे चमचमीत पदार्थ आवडतात. त्यासाठीच नेहमीच्या डाळ-तांदळाच्या खिचडीत थोडा बदल करून ही मसाला खिचडी तयार झाली आहे.

साहित्य : सुवासिक तांदूळ एक वाटी, मूगडाळ छिलटा अर्धी वाटी, एक मोठा चमचा मसुराची डाळ, एक मोठा चमचा तुरीची डाळ, एक मोठा चमचा पिवळी मुगाची डाळ, अर्धा टी स्पून मेथी दाणे, चार लाल मिरच्या, दोन हिरव्या मिरच्या, सात ते आठ लसूण पाकळ्या, ओलं खोबरं पाव वाटी, कोथिंबीर पाव वाटी, हळद, हिंग प्रत्येकी अर्धा टी स्पून, जिरे, मोहरी, कढीपत्ता फोडणीसाठी तेल दोन टी स्पून, साजूक तूप तीन चमचे, मीठ चवीनुसार, गरम  मसाला पावडर एक चमचा. 

कृती : सर्व डाळी, तांदूळ एकत्र करून धुवून घ्या. कुकरमध्ये तेल, तूप तापवा त्यात जिरे, मोहरी, मेथी दाणे, लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद, गरम मसाला घाला. धुतलेले तांदूळ घाला. छान परतून घ्या. हिरव्या मिरच्या, लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर वाटून घाला. सर्व छान एकजीव करा. पाच वाट्या गरम पाणी घाला. मीठ घाला. एक करून कुकरचे झाकण लावा. तीन शिट्ट्या द्या. खिचडीवर तूप घालून सोबत तळलेले पापड, सांडगी मिरची द्या!

संबंधित बातम्या

कांचीपुरम इडली

साहित्य :

1 फुलपात्र जाड रवा, 2 टेबल स्पून आंबट दही, चवीपुरतं मीठ, आलं, मिरचीचा ठेचा, गाजर, मटार, कोथिंबीर, दोन चिमूट प्रत्येकी खाण्याचा सोडा व इनो, फोडणी.

कृती :

सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात हळद, हिंग, जिरं, मोहरी, उडीद डाळ व कढीलिंबाची पानं घालून मस्त फोडणी करून घ्यावी. फोडणीचा खमंग वास दरवळल्यावर त्यातच बारीक चिरून गाजर व मटार दाणे जरा मायक्रोवेव्हमध्ये किंचित वाफवून घालावे. नंतर रवा, दही, आलं-मिरचीचा ठेचा असं वर सांगितलेलं सर्व साहित्य आणि मीठ टाकून ते चांगलं एकजीव करावं. एकजीव झालेलं हे मिश्रण इडली पात्राला तेल लावून त्यात घालून मस्त वाफविणे. साधारणपणे 20 मिनिटात या इडल्या खाण्यासाठी तयार होतात. 

आप्पे

साहित्य :


पाव किलो रवा, दोन कांदे, एक टोमॅटो, कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, खायचा सोडा, ताक, चवीपुरतं मीठ, हिंग, कढीपत्ता, मोहरी व तेल 

कृती :

प्रथम रवा ताकामध्ये एक तास भिजत ठेवा. एक तासानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, खायचा सोडा घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. दुसरीकडे मंद आचेवर फोडणीच्या भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग घालून फोडणी तयार करा व ती फोडणी रव्याच्या मिश्रणावर घाला. पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करा. आता आप्पे पात्राच्या प्रत्येक साच्यात थोडंसं तेल लावून मिश्रण चमच्याने आप्पे पात्रात सोडा. आप्प्यांना लालसर रंग येताच ते परतणं आणि नंतर दुसरी बाजू भाजल्यानंतर आप्पे पात्रातून सुरीच्या सहाय्याने काढून घ्या आणि खोबर्‍याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Back to top button