कलाईडोस्कोप : पावसाळा आणि मूड डिसॉर्डर | पुढारी

कलाईडोस्कोप : पावसाळा आणि मूड डिसॉर्डर

मागच्या लेखात आपण या ऋतूमध्ये होणारे काही हवेहवेसे मानसिक बदल बघितले. पण त्याचसोबत बर्‍याचदा, काही इतर बदलही मानसिक स्वास्थ्यावर होताना दिसतात. त्यातही, स्त्रिया याच्या जास्त बळी, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्याचे साधे कारण, म्हणजे त्यांच्या शरीराची संरचना, त्यात प्रत्येक महिन्यात असणारी स्थित्यंतरे. हे नकारात्मक बदल काय असतात ते पाहूया. 

बर्‍याचदा या ऋतूमध्ये उत्साह न वाटणे, सतत एक विचित्र आळशी अवस्था असावी तसे काहीही करावेसे न वाटणे. आधीच असलेले कित्येक मानसिक त्रास किंवा आजार बळावणे. जसे नैराश्य, भीती, मूड डिसोर्डर्स, सततची चिंता काळजी, धडधड इत्यादी. 

त्याचसोबत बर्‍याचदा हातात घेतलेली कामे अपूर्णच राहतात किंवा त्यात फार उत्साह वाटत नाही, असेही वाटते. कित्येकदा अकारण चिडचिड, किंवा भरून येऊन अकारण रडायला येणे, किंवा एकटे रहावेसे वाटणे असेही होते. 

संबंधित बातम्या

याचाच पुढचा भाग म्हणजे कामजीवनावर होणारा परिणाम, ज्यात संपूर्ण इच्छा मालवू शकते, किंवा निरुत्साह जाणवू शकतो. कधी-कधी स्वतःच होणारे हे बदल इतके पटापट असतात, की त्यातून कित्येक शंका निर्माण होतात. शिवाय हे मला काय होतंय? का होतंय? सगळ्यांनाच होत असावं का? असे मूलभूत प्रश्‍न सुद्धा समोर उभे राहतात. याचे कारण न कळण्याने त्या विशिष्ट स्थितीमधून बाहेर आल्यानंतर काही काळासाठी पुढे आपण नेमकं काय वागलो? त्याने जोडीदार किंवा आजूबाजूची इतर मंडळी दुखावली असतील का, असे विचारही त्रास देऊ शकतात. अशा वेळेस, जोडीदाराने समजूतदारपणा दाखवून, या स्थितीत समजून घेणे, आधार देणे गरजेचे आहे. विशेषतः ज्या स्त्रियांना इतर काही मानसिक आजार असतील, आणि ते बळवण्याची शक्यता असेल तर अशा वेळेस तर नक्‍कीच! याशिवाय त्यांच्या ऋतुचक्राचे भान ठेवून किंवा त्या वयाच्या कोणत्या टप्प्यात आहेत याचा विचार करूनही, हळुवारपणे त्यांना या स्थितीतून बाहेर काढता येईल! परंतु ही केवळ काही कलासाठीची स्थिती असे न राहता, हळुहळु स्वभाव, विचारतला बदल असे जाणवत असेल, तर मात्र वेळ न दवडता तज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम!

Back to top button