तिचा ही व्हावा सन्मान | पुढारी | पुढारी

तिचा ही व्हावा सन्मान | पुढारी

मानसी सत्तीकर

आपल्या घरातली मोलकरणी ही पण एक स्त्री असते, असे काही जणांना बहुतेक विसरायला होतं. एखाद्या वेळी तिच्या हातून भांड्यांना खरकटे तसेच राहते किंवा कपडे धुताना एका कपड्याचा रंग दुसर्‍या कपड्यालाही लागू शकतो. झाडताना कधीतरी कचरा मागे तसाच राहतो व पुसताना फरशीवरचा डाग पूर्णपणे निघालेला नसतो. स्वयंपाकातही थोडे तेल-तिखट, मिठाचा अंदाज कधीतरी चुकू शकतो. तीही एक माणूसच आहे व तीही चुकू शकते, नाही का? आणि हे कधीतरीच तिच्या हातून होत असते त्यामुळे तेव्हा तिच्यावर ओरडणे कितपत योग्य?

ती मुळात गरिबीतून आपल्या मुलांचे शिक्षण व दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून दुसर्‍या घरची धुणी-भांडी झाडूपोछा व स्वयंपाकाची कामे करीत नवर्‍याला हातभार लावत असते. बरं, हे सगळे ती स्वतःचे घर, सणवार, येणारे-जाणारे हे सगळे सांभाळून करीत असते. तिची खरी किंमत कळते जेव्हा ती सुट्टीवर असते तेव्हाच. घराचं जणू काही घरपण हरवतं, इतकं की एका दिवसातच जणू काही घराचा नकाशा बदलतो. एक दिवस भांडी , झाडूपोछा करता करता नाकीनऊ येतात की ऑफिसमधून आल्यावर आपण तिला  तिच्या कष्टाचा महिनाभराचा पगार देत असतो, तो ती सुट्टीवर असताना एकाच वेळेच्या जेवणावर हॉटेलमध्ये जाऊन खर्च करतो, बरोबर ना!

संबंधित बातम्या

मग आता बघा, ती रोज स्वतःच्या कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून कितीतरी घरची कामे करीत असते आणि अशा वेळी एखाद्या वेळी तिच्याकडून थोडीफार अस्वच्छता झाली तर आपण तिच्यावर कसे रागवतो, याचा आढावा घ्यायला हवा. तिलाही एक स्त्री म्हणून कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळताना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होत असणारच. तेव्हा आपणही एक स्त्री म्हणून तिला समजून घ्यायला हवे.

बर्‍याच घरात असेही द़ृश्य आढळते. मोलकरीण ही घरातली एक व्यक्ती असल्यासारखे तिला बरोबरीने चहा-पाणी, ताजे अन्न, घरात बनलेला स्पेशल पदार्थ दिला जातो. तिची सुख-दुःखे ऐकली जाऊन, तिची अडचण समजावून घेतली जाते. वेळप्रसंगी पैसाअडका यांनी मदतही केली जाते. बर्‍याचदा ओघात तिच्याशी आपल्याही सुख-दु:खांची वाटणी केली जाते. ही रोजच आपल्या घरात येत असल्याने घराला स्वच्छतेमुळे घरपण असते हे विसरता कामा नये. आयुष्यामध्ये सर्वांना सन्मानाची अपेक्षा असते.

Back to top button