ऑनलाईन शिक्षण माध्यम प्रभावी...! | पुढारी | पुढारी

ऑनलाईन शिक्षण माध्यम प्रभावी...! | पुढारी

कोरोनाशी दोन हात करून वावरत असताना कधीही न थांबणारी शिक्षण प्रक्रिया अचानक थांबली आणि या थांबलेल्या शिक्षण प्रक्रियेत कधीकाळी खूप अवजड वाटणारी ऑनलाईन शिक्षणाची कवाडे, कोरोना काळात अचानक उघडली गेली. किंबहुना उघडणे भाग पडले असावे म्हणायला हरकत नाही…! मात्र, प्रत्येक संकाटातून काहीतरी सकारात्मक गोष्टी घ्याव्यात, ज्या की मानवजातीच्या हिताच्या आहेत, त्यातील एक गोष्ट कोरोना काळात घडली. ती म्हणजे ऑनलाईन शिक्षण! 

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दुरावलेल्या संवादातून ऑनलाईन शिक्षण पद्धतीने एका दुव्याचे काम केले आहे. शिक्षक विद्यार्थी जोडले गेलेच मात्र संवाद साधला गेला, विचारांची देवाणघेवाण झाली. व्हॉट्सॲप, झूम अशा अनेक विविध माध्यमातून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली. शिक्षक शिकवू लागले, विद्यार्थीही शिकू लागले आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षण सुरू राहिले. म्हणून पूर्णपणे बंद न राहता ऑनलाईन सुरू झालेले हे साधन प्रभावीच म्हणावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत शैक्षणिक संस्था तसेच शिक्षक आणि पालकांनादेखील काळजी होती. मात्र, ऑनलाईन शिक्षण पद्धतीने सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालनही झाले आणी एकाचवेळी बऱ्याच विद्यार्थ्यांना अध्ययन करणे शक्य झाले. 

मात्र, या व्यतिरिक्त ऑनलाईन शिक्षण पद्धतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मात्र कोंडी झाली. प्रचंड तळमळ असूनही कमी प्रमाणाच्या नेटवर्किंगमुळे तासिकांना मुकावे लागले, हे पण विसरून चालणार नाही. मात्र या विद्यार्थ्यांनी जिद्दीने ज्या ठिकाणी नेटवर्क येईल, त्या लांबच्या ठिकाणी जाऊन आपल्या तासिका पूर्ण केल्या आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीने आपला फायदा करुन घेतला.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीची सध्याच्या परिस्थितीची यशस्वी वाटचाल बघता भविष्यात ऑनलाईन शिक्षणाची मागणी आणखी जोर धरेल. आणी विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांशी यामाध्यमातून कधीही कोठेही जोडले जाऊ शकतील, हे मात्र नक्की! 

– राजाभाऊ देविदासराव वायाळ, सहशिक्षक, यशोदीप विद्या मंदिर, खुलताबाद जि. औरंगाबाद. 

 

Back to top button