इंडिकेटर | पुढारी | पुढारी

इंडिकेटर | पुढारी

सुनील कदम, कोल्हापूर

औरंगाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात इंद्रजित नावाचे एक कापसाचे मोठे व्यापारी होते. स्थानिक बाजारपेठेतून कापसाची खरेदी करायची आणि गुजरातमधील सुरतसारख्या शहरात त्याची विक्री करायची, असा त्यांचा व्यापार होता. कापसाची वाहतूक करण्यासाठी त्यांच्या स्वत:च्या मालकीचा ट्रक होता आणि बहुतेकवेळा इंद्रजित हे स्वत: या ट्रकमधूनच प्रवास करायचे. नाशिकमार्गे गुजरातला जाणार्‍या मार्गावरून सहसा त्यांचा व्यापार चालायचा. रात्री-बेरात्रीच्या वेळेस अनेकवेळा या मार्गावरून जाणार्‍या वाहनांना अडवून वाटमार्‍या आणि दरोड्यासारखे प्रकार चालायचे. त्यामुळे इंद्रजित हे नेहमी सावध असायचे. शिवाय त्यांच्यासोबत त्यांचा नेहमीचा आणि अत्यंत विश्‍वासू असा नासीर नावाचा ड्रायव्हर असायचा. त्यामुळे ते तसे निर्धास्त असायचे.

16 सप्टेंबर 1999 रोजी असेच इंद्रजित हे आपल्या ट्रकमधून सुरतहून औरंगाबादकडे निघाले होते. कापसाच्या व्यापारातून आलेले पाच-सहा लाख रुपये त्यांच्याकडे होते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नेहमीप्रमाणे त्यांनी ते पैसे स्वत:च्या बॅगेत न ठेवता ट्रकच्या टूलबॉक्समध्ये ठेवले होते आणि ट्रकच्या केबिनमध्ये ते झोपले होते तर नासीर हा गाडी चालवत होता. नाशिक जिल्ह्यातील सटाणा-ताहराबाद रोडवरून त्यांची गाडी जात असताना पहाटे तीन-चार वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार इसमांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. थोड्यावेळाने त्यांनी गाडीच्या समोरच्या काचेवर दगडफेक करून चालकाला ट्रक थांबविणे भाग पाडले. ट्रक थांबताच चारही चोरटे ट्रकच्या केबिनमध्ये चढले आणि त्यांनी नासीर व इंद्रजित यांच्या गळ्याला चाकू लावून ‘टूलबॉक्सकी चाबी कहाँ हैं,’ असे दरडावले. त्याबरोबर घाबरलेल्या इंद्रजित यांनी ताबडतोब आपल्या बॅगेतील टूलबॉक्सची चावी त्यांच्या हवाली केली. चोरट्यांनी लगेच टूलबॉक्स उघडून त्यात ठेवलेली पाच-सहा लाख रुपयांची रक्‍कम हस्तगत केली. त्यानंतर चोरट्यांनी मालक इंद्रजित आणि चालक नासीर यांच्या डोळ्यात चटणीपूड टाकून त्यांना मारहाण करून नंतर पोबारा केला.

डोळ्यात चटणीपूड टाकल्याने आणि बेदम मारहाण झाल्यामुळे इंद्रजित त्याच ठिकाणी तासभर तळमळत पडले होते. त्यानंतर डोळ्याचा दाह शांत झाल्यावर त्यांनी त्या मार्गावरून जाणारे एक वाहन थांबवून त्यात बसून ताबडतोब सटाणा पोलिस ठाणे गाठून घटनेची खबर दिली. त्यावेळी  शेखर हे मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना पहिल्या झटक्यात अशी शंका आली की चोरट्यांनी इंद्रजित यांना बेदम मारहाण केली असताना त्यामानाने चालक नासीर याला मारहाण झालेली दिसत नाही. आणखी एका गोष्टीची त्यांना शंका आली, इंद्रजित हे नेहमी व्यापारातून आलेली लाखो रुपयांची रक्‍कम नेहमी स्वत:जवळच्या बॅगेत न ठेवता टूलबॉक्समध्ये ठेवतात, ही गोष्ट केवळ त्यांना आणि त्यांचा चालक नासीर या दोघांनाच माहीत होती. असे असताना चोरट्यांनी ट्रकमध्ये शिरल्याबरोबर नेमकी टूलबॉक्सचीच चावी कशी काय मागितली? याचा अर्थ चालक नासीर हा चोरट्यांना सामील असावा अशी त्यांना शंका आली. त्या अनुषंगाने पोलिसांनी नासीरकडे सखोल चौकशी केली, पण त्याने ताकास तूर लागू दिला नाही.

या पाहणी दरम्यानच पोलिसांना ट्रकजवळ मोटारसायकलच्या इंडिकेटरची एक फुटलेली काच आढळून आली होती. त्याठिकाणी झालेल्या झटापटीच्यावेळी चोरट्यांच्या एका मोटारसायकलचा इंडिकेटर फुटून ती काच तिथे पडली होती. 

पोलिस अधिकारी शेखर यांना राहून राहून शंका येत होती की निश्‍चितच या चोरीमध्ये चालक नासीर याचा हात असलाच पाहिजे, त्यानेच आपल्या काही साथीदारांच्या मदतीने हा सगळा बनाव घडवून आणला असावा.  त्या अनुषंगाने पोलिसांनी इंद्रजित यांच्याकडे नासीर याच्याबाबत चौकशी केली असता तो औरंगाबाद जिल्ह्यातील खंडाळा या छोट्याशा गावातील असल्याची माहिती मिळाली. केवळ एवढ्या माहितीच्या, आलेल्या शंकेच्या आणि घटनास्थळी सापडलेल्या इंडिकेटरच्या काचेच्या तुकड्याच्या आधारे शेखर यांनी पोलिसांची दोन पथके नासीर याच्या खंडाळा गावी तपासासाठी धाडली. त्या गावात इंडिकेटर फुटलेली एखादी मोटारसायकल दिसते काय, याचा बारकाईने शोध घेण्याचे आदेश त्यांनी तपास पथकाला दिले होते.

पोलिसांच्या सुदैवाने एका घरासमोर इंडिकेटर फुटलेली मोटारसायकल मिळून आली. पोलिसांनी सोबत आणलेला काचेचा तुकडा त्याठिकाणी जुळवून पाहिला असता तो तंतोतंत जुळला. त्यावरून पोलिसांची खात्री पटली की रात्रीच्या गुन्ह्यातील आरोपींचीच ही गाडी आहे. गाडीमालकाचा शोध घेता शेख मामू नावाच्या एका इसमाची ती गाडी असल्याचे स्पष्ट झाले. लागलीच पोलिस मामूच्या घरात घुसले तर रात्री केलेल्या ‘पुण्यकर्मामुळे’ दमलेला मामू जवळपास दीड लाखाचं डबोलं उशाला घेऊन निवांत झोपला होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळताच मामूने पटापट आपल्या साथीदारांची नावे सांगून टाकली. 

पोलिसांनी लागलीच त्याच गावातील चाँद, करीम आणि अकबर या साथीदारांनाही जेरबंद केले आणि त्यांनी लंपास केलेली सगळी रक्‍कमही हस्तगत केली. या सगळ्यांना घेऊन पोलिस पथक जेव्हा सटाणा पोलिस ठाण्यात आले तेव्हा भीतीने चालक नासीरची बोबडीच वळली आणि त्याने पोलिसांच्या पायावर लोळण घेतली आणि आपल्या पापाची कबुली देऊन टाकली. चालक नासीर आणि त्याच्या साथीदारांनी झटपट श्रीमंतीच्या मोहापायी हा गुन्हा केला होता. पण पोलिसांनी अत्यंत युद्धपातळीवर केलेल्या कारवाईमुळे चोवीस तासांच्या आत चोरट्यांच्या झटपट श्रीमंतीच्या स्वप्नांना सुरूंग लागला होता.

अवघ्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावला. मात्र संशय हाच या सगळ्या यशाला कारणीभूत ठरला, हे मान्यच करावे लागेल. चोरट्यांनी चालक नासीर याला मारहाण न करणे, चोरट्यांनी गाडीत शिरल्यावर नेमकी टूलबॉक्सची चावी मागणे या कारणावरून पोलिसांना नेमका नासीरचा संशय आला आणि या प्रकरणात गावातीलच त्याच्या काही साथीदारांचाही सहभाग असावा अशी शंका आली.  

एका फुटक्या इंडिकेटरच्या काचेच्या तुकड्यावरून आणि संशयाच्या सुतावरून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. इंडिकेटरनेच पोलिसांना तपासाची योग्य दिशा दाखविली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यावरून कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळाबाबतच्या संशयाला किती महत्त्वाचे स्थान आहे, ते समजण्यास हरकत नाही.

Back to top button