नाटक झाले जन्माचे! | पुढारी | पुढारी

नाटक झाले जन्माचे! | पुढारी

डी. एच. पाटील, म्हाकवे

मुंबईच्या उपनगरात त्या दिवशी कमालीची गर्दी होती. आठवडी सुट्टी आणि भरलेला बाजार यामुळे रस्ते माणसांनी फुलून  गेले होते. व्यापारी मंडळी गिर्‍हाईकांना आकर्षित करण्यासाठी आरोळी ठोकत होते. बाजारातील आरोळी ऐकून नलूला आपल्या खेड्यातील बाजाराची आठवण झाली. खेड्यातल्या बाजारात ती अशीच जायची. 

बाजारात फेरफटका मारून तिने भाजीपाला खरेदी केला अन् ती आपल्या उपनगरात आपल्या घराकडे चालू लागली. डोंगरीपाड्याकडे वस्ती विरळ होती. ती चालू लागली. दोन्ही हातांमध्ये बाजारांच्या पिशव्या घेऊन ती चालत होती. रिक्षाने जाणे तिला परवडणारे नव्हते. 

नाल्याच्या जवळ आली तसा कुत्र्यांचा घोळका कशाचे तरी लचके तोडताना तिला दिसला. तिला तिथे माणसासारखा चेहरा दिसला. ती पुढे गेली अन् हादरलीच. एका पुरुषाच्या मृतदेहाचे लचके कुत्री तोडत होती. तिने लागलीच पोलिसांना फोन केला. खेड्यातली असली तरी ती पदवीधर होती. जागरूक नागरिक होती. 

पोलिसांना खबर मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. फौजदार शमशाद बेग यांनी पूर्ण घटनास्थळाची पाहणी केली. निवड झाल्यानंतर बेग यांची पहिलीच केस होती. उत्सुकतेने प्रत्येक गोष्टीची त्या तपासणी करत होत्या. रितसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली मात्र तिथे त्यांना काहीच सापडले नाही. एव्हाना बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिस मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ओळख पटत नव्हती. आख्खा डोंगरीपाडा पालथा घातला. मात्र ओळखीचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे इतरत्र खून करून हा मृतदेह इथे टाकला असावा, अशी शंका पोलिसांना आली. पोलिसांनी नजीकच्या उपनगरातही ओळख परेड घेतली. मात्र तिथेही पोलिसांना काहीच हाती लागले नाही.

दोन दिवस होऊनही मृताची ओळख पटत नव्हती. पोलिसांचे खबरेही कामाला लागले होते. मुंबईमधील कोणत्याही पोलिस स्टेशनला संबंधित वर्णनाचा व वयाचा तरुण बेपत्ता नव्हता. फौजदार बेग यांच्यासमोर आव्हान उभे राहिले होते. पोलिसांनी तिसर्‍या दिवशी वृत्तपत्रात बातमी दिली आणि मग  पोलिस काही माहिती मिळते का याची वाट पाहू लागले. 

तिसर्‍या दिवशी एक माणूस हातात पेपर घेऊनच पोलिसात हजर झाला. पोलिसांनी त्याला मॅडमच्या समोर उभा केला. ‘बोला, काय काम आहे?’ 

‘मॅडम, या फोटोतील व्यक्‍तीबद्दल बोलायचेे होते.’ त्याबरोबर फौजदार बेग सावध झाल्या. ‘बोला काय माहिती आहे’ नगराचे नाव कळताच पोलिसांनी वेळ लावला नाही. 

डोंगरीनगरात पोलिस गल्‍लोगल्‍ली फिरू लागले. एका गल्‍लीत मात्र त्याची ओळख पटली. अशोक शिंदे नावाचा तरुण होता. तो डोंगरीनगरात पत्नीसह राहत होता. पोलिस त्याच्या घरी पोहोचले. त्याची पत्नी समोर आली. पोलिस पाहून बाई घाबरली. ‘अशोक कुठे आहे’ विचारताच ‘गावाकडे गेला आहे. भात कापणीचे काम सुरू आहे,’ असे ती बोलू लागली. मात्र, तिला ‘नवर्‍याचा खून झालाय’ म्हणताच ती रडू लागली. घरात ती एकटीच होती. फौजदार बेग यांनी तिच्या मुलाबाळांविषयी विचारताच ‘17 वर्षे होऊनही तिला मूल झालेले नव्हते,’ असे समजले. 

पोलिसांनी तिच्या कोकणातील गावी चौकशी केली; मात्र तो गावी गेलाच नव्हता. त्यामुळे वाटेतच अशोकचा कोणीतरी काटा काढला होता. पोलिसांनी अशोकची पूर्ण कुंडली काढली. तो दारूचा व्यसनी होता. मात्र सहसा कुणाच्या भानगडीत पडणारा नव्हता. मूल नसल्याने तो दारूच्या आहारी गेला होता. त्याच्या घरी त्याचा मित्र विश्‍वास बर्‍याचदा येत होता. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र चौकशीत तो दोषी न आढळल्याने सोडून देण्यात आले. 

पोलिसांनी गल्‍लीत अशोकविषयी चौकशी केली. मात्र नवरा-बायको दोघेही साधे असल्याचे दिसून आले. खून करण्याचे कारणच  स्पष्ट होत नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी रोहिणी मात्र छानचौकीत राहत होती. तिच्यामध्ये हा बदल का झाला होता? हे गौडबंगाल होते. तिचे वागणेही खटकणारे नव्हते. पोलिसांनी पाच दिवसानंतर पुन्हा घटनास्थळाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. पोलिस नाल्यामध्ये घाणीत हात घालून पाहणी करत होते. नाल्यामध्ये काहीच पोलिसांना सापडले नाही. मात्र जवळच कागदाचे फाटलेले चार तुकडे सापडले. ते पोलिसांनी जुळवून पाहिले. ते एका दशावतारी नाटकाच्या स्क्रीप्टचे नाव होते. आता फौजदार बेग यांच्या लक्षात आले. एकतर खुनी नाटकात काम करणारा असावा किंवा लेखक तरी असावा. 

फौजदार बेग यांनी उपनगरात असणार्‍या नाटक कंपन्या-स्टुडिओ यामध्ये चौकशी सुरू केली. मात्र अशोक शिंदेचा नाटकाशी काहीच संबंध नसल्याचे आढळून आले. पोलिसांना पेच पडला. अशोकचा नाटकाशी काहीच संबंध नसताना नाटकाचे स्क्रीप्टचे पान तिथे कसे पडले? पोलिस अगदी गोंधळून गेले होते. नाटक कंपन्यांच्या चौकशीमधून काहीच बाहेर येत नव्हते. मात्र मृत अशोकच्या बायकोला रोहिणीला नाटक पाहण्याचे भयंकर वेड होते, असे त्यांना आढळून आले. 

अशोकच्या बायकोला पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले. मात्र, ‘मी माझ्या नवर्‍याला का मारू?’ असा तिचा प्रश्‍न होता. पोलिस बळाचा वापर करत होते. पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम होती. अशोक शिंदे पडेल ते काम करण्यासाठी बाहेर जायचा. घरची परिस्थिती चांगली नसताना तिला नाटक पाहणे परवडणारे नव्हते. मात्र नाटकाचे तिकीट देणार्‍याशी तिचे काही संबंध असावेत हा अंदाज पोलिसांनी बांधला.

उपनगरातल्या प्रत्येक नाटक कंपनीमध्ये पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. अशोकचा फोटो दाखवीत असताना प्रत्येकाच्या चेहर्‍यावरील भाव फौजदार बेग न्याहाळीत होत्या. एके ठिकाणी नरेश नावाचा नाटकातील नट थोडासा गडबडला. पोलिसांनी त्याला चौकीत आणला. चौकीत आणून दोन दिवस ठोकला. 

“होय, मॅडम मीच मारलं अशोकला. मला नाटकाची आवड, त्यामध्ये लेखकही मीच. स्क्रीप्ट मीच लिहायचो. अशोकची बायको नाटकाला यायची. त्यामधून माझी तिची ओळख झाली. तिला मूल नव्हते. ते मला समजले. त्यामुळे भावनिकद‍ृष्ट्या मी तिला जाळ्यात ओढले. नाटकाचे वेड अन् मुलाची लालसा यामध्ये ती मोहरली. मग आमचे शारीरिक संबंध सुरू झाले. मी तिला नाटकाला मोफत प्रवेश द्यायचो. नाटक संपल्यानंतर आम्ही दोघे माझ्या खोलीवर भेटायचो. मात्र आमचे संबंध अशोकला समजले. तो दारूच्या आहारी गेला होता. तिला मारहाण करू लागला.’

‘त्या दिवशी तो भात कापणीसाठी कोकणात जाणार हे मला समजले. मी त्याचा पाठलाग केला. मुंबईतून बाहेर पडताच त्याला गाठला. गळा आवळला अन् दुसर्‍या डोंगरीपाड्यात नेऊन टाकला अन् पुन्हा मुंबईत येऊन नाटकात काम सुरू केले.’

‘हो, मात्र नाटकाच्या एका स्क्रीप्टचे एक पान नाल्याजवळच पडले अन् आम्ही अंदाज केला. खुनी नाटकाशी संबंधित आहे. आता बस नाटक लिहीत जेलमध्ये.’ नरेशवर खटला सुरू होऊन त्याला जन्मठेप झाली.

Back to top button