सावज आणि शिकार | पुढारी | पुढारी

सावज आणि शिकार | पुढारी

रात्रभर सोनूनं रडून धिंगाणा घातला होता.  कारणही तसंच होतं.  काल सकाळी कामावर गेलेली तिची आई रात्र उलटून गेली तरी परत आली नव्हती. चार वर्षांच्या सोनूनं रडून आजीला भंडावून सोडलं  होतं.  आधीच लेक परत न आल्यानं रत्नमालाबाई काळजीनं मेटाकुटीस आल्या होत्या. त्यात या पोरीचं रडगाणं…  

सकाळ झाली तरी रेश्मा कामावरून आलीच नव्हती.  रत्नमालाबाईनं चूळ भरली. चहा घेतला. तेवढ्यात शेजारच्या बंड्यानं निरोप दिला, ‘आजी, तुम्हाला पोलिसांनी बोलवलंय.’ तसं रत्नमालाबाईचं काळीज चर्रऽऽरऽ झालं. ‘पोरीचं तरी काय बरेवाईट नसेल ना झालं?’ तिने घोटभर पाणी घशात ओतलं.  घाईघाईत सोनूला काखेत मारून ती चालू लागली.  कशाकडंच  तिचं ध्यानं  नव्हतं.  वाटेत  बंड्या  तिला  नाना  प्रश्न  विचारत होता.  

अर्ध्या तासात ती पोलिस स्टेशनला पोहोचेली. पोलिस स्टेशनला  प्रवेश करताच  तिला घाम फुटला. काय झालं असेल पोरीचं? या विचाराच्या तंद्रीत असतानाच तिला  साहेबांनी आत बोलावले. ती घाबरतच आत शिरली. समोरच्या खुर्चीवर बसवतच एका शिपायाने विचारले, ‘आजी,  तुमची मुलगी कुठे आहे?’

‘साहेब, काल रेश्मा कामावर गेली ती परत आलीच नाही होऽ’  पोलिसांनी सापडलेला एक मृतदेह दाखविला. त्या मृतदेहाच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा झाला होता. चेहरा ओळखू येत नव्हता. मात्र कपडे, गळ्यातील  ताईत,  मंगळसूत्र रेश्माचंच होतं. रत्नमालाबाईनी हंबरडा फोडला. सोबतच्या सोनंनही भोकाड पसरलं.  पोलिसांनी दोघींना शांत केले न् मग मृतदेह विच्छेदनासाठी पाठविला. 

आता मृतदेहाची ओळख पटल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला. ती कुठे कामावर होती, याबाबत ती राहत असलेल्या गल्लीत कोणालाही माहिती नव्हती. ती मुळात काय काम करते हेच कुणाला माहीत नव्हते. पोलिसांनी बर्‍याच ठिकाणी चौकशी केली. मात्र, रेश्मा काम करणारे ठिकाणच मिळत नव्हते. मग शवविच्छेदन अहवाल आला.  त्यामध्ये ‘उंचावरून पडून डोक्यात मार लागून मृत्यू’ असा उल्लेख होता. त्यामुळे ‘एखाद्या उंच इमारतीमधून ती खाली कोसळली असावी’ असा अंदाज बांधून तपास सुरू  केला.  

पोलिसांनी तिचा मृतदेह जिथे सापडला तिथे पुन्हा चौकशी केली. मृतदेह सापडला ते ठिकाण न् जवळपास असणार्‍या उंच इमारतीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. मृतदेह सापडला त्या बाजूच्या इमारतीची झडती घेतली.  मात्र, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र एका इमारतमध्ये कोणीच राहत नव्हते. तेथे त्यांना शंका आली. मग त्या बंद घराच्या मालकाला बोलावण्यात आले. त्याने ‘आपण येथे राहत नाही, शिवाय चार महिन्यांत आपण या घराकडे गेलोच नसल्याचे’ सांगितले.  पोलिसांनी घराची बारकाईने चौकशी सुरू केली. अगदी कोपरा न्  कोपरा  धुंडाळला; पण काहीच ठोस मिळत नव्हते.

पोलिसांनी शेजारच्या बागेतसुद्धा शोध घेतला; मात्र काहीच मिळत नव्हते. शंका नको म्हणून पुन्हा बारकाईने तपास करत असताना पोलिसांना पलंगावर दोन लांब केस पडलेले आढळून आले. ते पोलिसांनी तपासासाठी लॅबला पाठविले.  ते केस न् रेश्माच्या केसांचा डीएनए जुळला. त्यामुळे तपासाला गती आली. शिवाय रेश्माचा खून होण्यापूर्वी तिचे कोणाशीतरी शारीरिक संबंध झाले होते. त्यामुळे खुनी हा तिच्या परिचयाचा असावा, असा अंदाज बांधला गेला. पुन्हा रेशमाच्या आईकडे तपास केला.  तेव्हा  रेश्मा नवर्‍यापासून बरीच वर्षे विभक्‍त राहत होती हे कळाले. शिवाय तिला नटण्याची खूप आवड होती. तिचे अनेक मित्र होते. मग त्या सर्वांना पोलिसांनी चौकशीसाठी उचलले.

तिच्या मित्रांना पोलिसांनी चांगलेच बदडून काढले. मात्र, प्रत्येकजण तिच्या रिलेशनमध्ये होतो; मात्र पैशाची तिची हाव भयानक होती. तिच्या सोबतच्या एका रात्रीत ती दोन हजार रुपये मागायची. त्यामुळे तिचे अनेक मित्र कंगाल झाले होते. अशीही माहिती मिळाली. पोलिसांनी तिचा खरा जो नवरा  कोकणात होता, त्याला ताब्यात घेतले. त्यालाही पोलिसांनी सोलून काढले. मात्र, ‘मी  सध्या दुसरे लग्न करून सुखात आहे. मला या प्रकरणात ओढू नका’ म्हणून तो विनवणी करू लागला. 

आता रेश्माचा मृत्यू होऊन सात दिवस झाले तरी खुनी सापडत नव्हता. रेश्मा तरुणांना नादाला लावून त्याना कंगाल करत होती. तिने नवर्‍याला सोडून हौसेसाठी मुंबईचा मार्ग निवडला होता. त्याला तीन वर्षे झाली होती. या तीन वर्षांत अनेकांचे संसार तिने उद्ध्वस्त केले होते. साहजिकच तिच्या अशा शत्रूंची संख्या जास्त होती.  रेश्मा तरुणांना नादाला लावून त्यांना जाळ्यात अडकवून शिकार करत होती. 

मुंबईत पोलिसांनी आपल्या खबर्‍यांना कामाला लावले होते. लॉज, हॉटेल अशा ठिकाणी रेश्मा जात असल्याचे आढळून आले. मात्र, दरवेळी  सावज वेगळेच असायचे. मात्र येथे तिला कोणीतरी बिलंदर  शिकारी  भेटला होता. त्यानेच तिची शिकार केली होती. खून होऊन पंधरा  दिवस उलटले  होते. गुन्हेगारानं कोणताच पुरावा मागे ठेवला नव्हता. पोलिसांनी  पुन्हा  घरमालक  व त्यांच्या घरातील सगळ्यांना पोलिस  स्टेशनला बोलावून घेतले. त्याच्या  दोन  तरुण  मुलांची वेगवेगळ्या बाजूंंनी चौकशी केली. मात्र, कोणताच धागा पोलिसांना मिळाला नाही. पोलिस वैतागून गेले होते. 

शेवटी घरमालकाला पोलिसी पाहुणचार दिला. मात्र, तिथेही पोलिसाना हाती  निराशा आली. घराची किल्ली घरमालकाकडेच असताना दरवाजा उघडलाच कसा? दरवाजा उघडणाराच खुनी होता. मात्र, तपासात पोलिसांच्या हातून काहीतरी निसटत होते. पोलिसांनी तपासाचा मार्ग बदलला. 

आता थंडीही जोर धरत होती. जिथे रेश्माचा खून झाला तेथून  रिक्षा  बसस्थानकापर्यंत पहाटेची शेकोटी शेकत पोलिसांनी भल्या सकाळी तपास सुरू केला. रात्री येणार्‍या रिक्षावाल्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली.  थंडीचा जोर वाढतच होता. सोनू आईच्या आठवणीतून आता सावरत  होती. मात्र खुनी सापडत नसल्याने रत्नमालाबाई पोलिस स्थानकात खेटे घालत होत्या. 

एका पहाटे शेकोटीजवळ हवालदार ठोंबरेंना एक तळीराम भेटला. थंडीत कुडकुडत दोघांच्या गप्पा रंगल्या. त्याचवेळी  रेश्माचा फोटो ठोंबरेनी त्याला दाखविला.  ‘ये  माल मिलेगा क्या? अगर मिलेगा तो तुमको दो पेग. बोलो… ’ त्याबरोबर त्याने फोटो पाहिला. ‘पंधरा दिन से दिखाई नही दी है. जब एक रात अंगद के साथ गई थी तबसे.’ हवालदार ठोबंरेंनी त्याची कॉलर पकडली. त्याला पोलिस स्टेशनला आणले. तळीरामाची थंडी केव्हाच पळून गेली होती आणि प्यालेलीही उतरली होती. पोलिसांनी अंगदला शोधून ठोकतच आणले. चांगलीच धुलाई केली. ‘होय साहेब, मीच मारलं त्या सालीला…

‘त्या रात्री मी आठ वाजता दुकान बंद करून घरी येत होतो. नाक्यावर आल्यानंतर माझ्याकडे तिने लिफ्ट मागितली. मी तिला गाडीवर घेतली. गाडीवर बसताच तिने लैंगिक चाळे सुरू केले. मीही विरघळलो. तिला घेऊन मी माझ्या बंद असणार्‍या पाहुण्याच्या बंगल्यावर घेऊन आलो. एका डुप्‍लिकेट चावीने दरवाजा उघडला. आम्ही दोन तास मजा केली. मी जायला निघालो, तर तिने अचानक दहा हजार रुपये मागितले. अन्यथा बलात्काराच्या केसची धमकी दिली. मी गांगरलो. मग वाद घालत आम्ही टेरेसवर आलो. ती ऐकेचना. मग मी रागाने तिला दिली फेकून…’औटघटकेच्या मोहात अडकून अंगद जेलमध्ये अडकून पडला. 

Back to top button