बहाद्दर सांगलीत, सांगितलं जर्मनीत डॉक्टर आणि मुंबईच्या वकील महिलेला गंडवले १५ लाखाला! | पुढारी

बहाद्दर सांगलीत, सांगितलं जर्मनीत डॉक्टर आणि मुंबईच्या वकील महिलेला गंडवले १५ लाखाला!

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यातील एका बहाद्दराने जर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका वकील महिलेची १५ लाखा रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वैभव सुरेश शिंदे (वय २९, लेंगरे, ता. खानापूर) याला विटा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मागिल वर्षी (२०२०) मे महिन्यात कोरोना महामारीमुळे जगभरात हाहाकार माजवला होता. भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश लोक हे इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे जगाशी संपर्कात होते. याच काळात लेंगरे येथील वैभव शिंदे यानेही फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भरत जाधव या नावाने खोटे अकाउंट काढले. तसेच कुठल्या तरी मॉडेल तरुणाचा फोटो लावून मुंबईतील एका महिला वकीलाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. विशेष म्हणजे या दोन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वैभव शिंदे याने त्याच्या प्रोफाईलमध्ये तो जर्मनी या देशात डॉक्टर व्यवसाय करत असल्याची खोटी माहिती दिली होती. त्यामुळे या वकील महिलेने त्याच्याशी पटकन मैत्री केली. 

त्यानंतर त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. कधी हिंदी, कधी मराठीत चॅटकरून वैभव शिंदे याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वैभवने आपला मोबाईल क्रमांक महिला वकिलाशी चॅटद्वारे शेअर केला. त्यानंतर व्हाट्सअपच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले. व्हॉटस अॅप द्वारे मसेजेस, फोन कॉल करुन आणखी विश्वास संपादन केला. तसेच अनेक वेळा तिच्याशी त्याने भावनिक गप्पा मारल्याने सलगी वाढत गेली. 

मात्र यादरम्यान वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिला वकिलाकडून वैभव शिंदेने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ९२ हजार रुपये घेतले. ही रक्कम महिला वकिलांकडून घेताना त्याने आपली आई कोरोनाने आजारी आहे. आपले वडील आजारी आहेत. चुलते वारलेत, बहिणीच्या नव-याची प्रकृती गंभीर आहे. आपण भारतात येण्यासाठी निघतोय परंतु आपले कोणीतरी पाकीट मारले आहे. त्यात क्रेडिट कार्डस, डेबिट कार्डस होती. तिकडे आल्यानंतर तुमची रक्कम बँकेच्या माध्यमातून ट्रान्सफर करतो अशा बतावण्या त्याने केल्या. 

परिणामी या सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटल्याने आपण पैसे दिले असे संबंधित महिला वकीलाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अखेरीस ७ जूनला वैभव शिंदे याने अचानक सोशल मीडियावरची आपली भारत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंटस डीॲक्टिव्हेट केली. 

आपली फसवणूक झाल्याचे कळताच वकील महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. तसेच या संबंधित भरत जाधव म्हणजेच वैभव शिंदे याचा मोबाईल क्रमांक जो त्याने व्हॉट्सऍपसाठी वापरला होता तो क्रमांक दिला. त्यावरून संबंधित नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तत्काळ या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. शिवाय दोघांमधील संभाषणाचे आणि वैभव शिंदे यांना वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. त्यावरून वैभव शिंदे याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम कायदा ४२०, ४६५,४१७, ४१९, तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६, ६६ ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे. 

सांगली : आजपासून सर्व व्यवहार सुरू

सांगली : अलकूड एम गावात बिबट्याचे दर्शन

Back to top button