भेंडीची लागवड : फायदेशीर पर्याय भेंडीचा  | पुढारी

भेंडीची लागवड : फायदेशीर पर्याय भेंडीचा 

सतीश जाधव, पुढारी ऑनलाईन : हमखास उत्पन्‍न देणारे पीक म्हणून भेंडीची ओळख आहे. राज्यात भेंडीची लागवड 5,500 हेक्टरहून अधिक क्षेत्रात केली जाते, असा अंदाज आहे. बहुतेक सर्व जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमी-जास्त प्रमाणात केली जाते. सातारा, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये भेंडीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भेंडीमध्ये दोन टक्के प्रोटिन्स, 1.2 टक्के फायबर, .4 टक्के मॅग्‍नेशियम, कार्बोहायड्रेडस् 6.4 टक्के, कॅल्शियम .7 टक्के असते.

आरोग्यासाठी भेंडी नियमित खाणे उपयुक्‍त ठरते. भेंडीकरिता मध्यम काळ्या किंवा पोयट्याची जमीन लागते. अशा जमिनीमध्ये भेंडी पिकाची वाढ चांगली होते. हलकी जमीन घेतल्यास त्यात पिकाची वाढ चांगली होत नाही. त्यामुळे उत्पादन कमी मिळते. उत्पादन चांगले येण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा. या पिकाची लागवड करण्यासाठी जुलैचा पहिला आठवडा हा खरीप हंगामात चांगला ठरतो. उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करायची असेल, तर जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात केली पाहिजे. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी आणि हेक्टरी 20 टन एवढे शेणखत मिसळावे.

फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्काअभय, अर्काअनामिका या जातींची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीसाठी हेक्टरी 15 किलो एवढे बियाणे आवश्यक असते. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्याला 25 ग्रॅम झोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळवणार्‍या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. 30 सेंटिमीटर बाय 15 सेंटिमीटर या अंतराने लागवड करावी. माती परीक्षणानुसार खताची मात्रा द्यावी लागते. त्यानुसार हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश या प्रमाणात खत द्यावे लागते. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे लागते. दर पंधरा दिवसांनी खुरपणी करावी लागते.

ज्या जमिनीत भेंडी लागवड करणार असाल त्या जमिनीचा सामू 6 ते 7 दरम्यान असला पाहिजे. भेंडीच्या पिकाला दमट आणि उष्ण हवामान मानवते, असा अनुभव आहे. या पिकाची पेरणी तापमान कसे आहे हे पाहूनच करावी लागते. 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असेल; तर बियांची उगवण चांगली होत नाही. तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाला; तर फुलांची गळ होते. 20 ते 40 अंश सेल्सिअस यादरम्यानच्या तापमानात भेंडीचे पीक चांगले येते.

वातावरणात खूप दमटपणा असेल; तर भेंडीवर भुरी रोग पडतो. ज्या ठिकाणी थंडी अधिक असते अशा ठिकाणी रब्बीमध्ये हे पीक घेता येत नाही. मात्र, कोकणात समुद्रकिनार्‍याजवळ असणार्‍या भागात हिवाळा सुरू होण्यापूर्वी पेरणी केल्यास भेंडीचे पीक घेता येते. उन्हाळ्यातील वातावरण भेंडीच्या वाढीला उपयुक्‍त ठरते.

उष्ण हवामानामुळे भेंडीचे उत्पादन चांगले येते. भेंडीच्या लागवडीसाठी अनेक जाती उपलब्ध आहेत. काही संकरित वाणही बाजारात उपलब्ध आहेत. अर्काअनामिका ही जात बंगळूर येथील ‘आयआयएचआर’मध्ये विकसित करण्यात आली आहे. ही जात शेतकर्‍यांमध्ये मोठी लोकप्रिय ठरली आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. या जातीच्या झाडांना येणारी फळे गर्द हिरव्या रंगाची असतात आणि गुळगुळीत, लांब असतात. देठ लांब असल्याने काढणीही लवकर होते.

पुसा सावणी व अन्य जातींपेक्षा अर्काअनामिका या जातीतून अधिक उत्पादन मिळते. खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामांत या जातीची लागवड करता येते. परभणी क्रांती ही जातही खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामांत लागवडीस योग्य आहे. परभणी क्रांतीची फळे आठ ते दहा सेंटिमीटर लांबीची असतात. अर्काअभय या जातीच्या भेंडीला फांद्या फुटतात आणि दोन बहार मिळतात. अर्काअभयची भेंडी अर्काअनामिकाप्रमाणेच गर्द हिरव्या रंगाची गुळगुळीत आणि लांब असते. दिल्‍लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पुसा सावणी ही जात विकसित करण्यात आली आहे.

या जातीची भेंडी दहा ते पंधरा सेंटिमीटर लांब असते. या जातीच्या भेंडीवर काटेरी लव असते. झाडांचे खोड देठ आणि पाण्याच्या खालच्या बाजूला हिरवा रंग असतो. त्यावर तांबूस छटा दिसून येतात. खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामात य जातीची भेंडी घेता येते. पुसा सावणीची फुले पिवळ्या रंगाची असतात. फुलाच्या प्रत्येक पाकळीवर देठाजवळील भागावर जांभळ्या रंगाचा ठिपका असतो. या जातीतून एकरी चार ते पाच टन उत्पादन मिळते. वरील जातींखेरीज बाजारात भेंडीच्या काही संकरित जातीही उपलब्ध आहेत. सातारा जिल्ह्यात फलटण या भागात शेतकरी या पद्धतीने भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. ही भेंडी निर्यातीसाठी वापरली जाते. भेंडीसाठी रासायनिक खतांचा वापर करू नये, असा सल्‍ला तज्ज्ञांकडून दिला जातो. रासायनिक खताचे प्रमाण कमी-जास्त झाल्यास भेंडीवर रोगाचा प्रादुर्भाव होतो.

जमिनीच्या मगदुराप्रमाणे भेंडीला पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते. उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकून राहावा, याकरिता वाळलेल्या गवताचे किंवा भाताच्या पेंडाचे अच्छादन दोन ओळींमध्ये घालावे. या अच्छादनामुळे जमिनीत तण माजत नाही आणि पाण्याचीही बचत होण्यास मदत होते. भेंडीवर मावा, तुडतुडे यासारखी कीड पडते. फांद्या व फळे पोकरणारी अळी, पांढरी माशी ही कीडही भेंडीवर आढळून येते. लोहाचे प्रमाण कमी झाल्यानंतर भेंडीच्या पानाच्या शिरा जाळीदार हिरव्या होतात. भेंडीच्या पिकाची अशा रोगांपासून आणि किडींपासून काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

Back to top button