लसूण शेती : लसूण लागवडीचे तंत्र | पुढारी

लसूण शेती : लसूण लागवडीचे तंत्र

विलास कदम, पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात लसणाची (लसूण शेती) लागवड जास्त केली जाते. देशभरत होणार्‍या एकूण लागवडीपैकी 90 टक्के लागवड नोव्हेंबरमध्ये होते. नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या दोन तीन महिन्यांमध्ये थंडी चांगली पडली, तर पिकाच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. रात्रीचे तापमान कमी असते आणि याच काळात पिकाची वाढ होत राहते.

दिवसाच्या तापमानात वाढ होत असली; तरी हवेतील आर्द्रता कमी झालेली असते. त्यामुळे लसूण पिकाची वाढ जोमाने होते. साधारणत:, एप्रिल महिन्यात लसणाचे पीक काढणीला येते. या काळात तापमान वाढलेले असते. त्यामुळे लसणाच्या लागवडीकरिता महाराष्ट्रात नोव्हेंबर ते एप्रिल हाच कालावधी सर्वोत्तम समजला जातो.

लसणाकरिता मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम प्रकारे निचरा होणारी जमीन आवश्यक असते. लागवड करण्यापूर्वी उभी-आडवी नांगरणी करून जमिनीतील ढेकळे फाडून घ्यावी लागतात. ढेकळे फोडून घेतल्यावर वखरणी करून घ्यावी लागते. वखरणी केल्यानंतर हेक्टरी 20 ते 15 टन एवढ्या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत जमिनीत घालावे लागते. सपाट वाफ्यामध्ये 15 बाय 10 सेंटिमीटर एवढ्या अंतरावर मोठ्या आकाराच्या पाकळ्या लावून लागवड करावी लागते. हेक्टरी सहा क्‍विंटल पाकळ्यांची जरुरी भासते.

गोदावरी, श्‍वेता, फुले बसवंत, यमुना सफेद यासारख्या सुधारित जातींची लागवड करता येते. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या प्रमाणात खताची मात्रा द्यावी.

दर आठ ते बारा दिवसांनी पाणी देणे आवश्यक असते. जमिनीचा मगदूर पाहून पाण्याचे प्रमाण कमी-अधिक करता येते. लसणाला दररोजच्या आहारात महत्त्वाचे स्थान असल्याने या पिकाची मागणी कमी होत नाही. अलीकडे लसणातील औषधी गुणधर्म लक्षात घेऊन अनेक औषध कंपन्यांनी याचा वापर करणे सुरू केले आहे. त्यामुळे या क्षेत्राकडूनही लसणाला मोठी मागणी आहे. लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत टाकण्याने जमिनीचा पोत चांगला सुधारतो.

लागवड करताना 150 किलो दाणेदार सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश, 15 किलो गंधक, 5 किलो सूक्ष्म अन्‍नद्रव्य हे खत पाभरीने आडवे-उभे टाकणे फायदेशीर ठरते. खताचे हे प्रमाण एक एकर जमिनीकरिता आहे.  जमिनीच्या उताराला आडवी रानबांधणी करावी. गोदावरी, फुले बसवंत, श्‍वेता, भीमा ओंकार, एनआरसी 316, 38 आणि 50 या सुधारित वाणांची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. लागवड करण्यापूर्वी बियाण्याला ट्रायकोडमी, पीएसबी, झोटोबॅक्टर या जीवाणू संर्वधनाची बीज प्रक्रिया करणे आवश्यक ठरते.

लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी तणनाशकाद्वारे तणनियंत्रण, गरजेनुसार जैविक वा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आवश्यक ठरते. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊ शकते. त्याचबरोबर बीजोत्पादनातून बियाणेही तयार करता येते. या बियाण्यालाही चांगला भाव मिळतो. शिवाय, ते बियाणे पुन्हा वापरताही येते.

कांदा किंवा अन्य भाज्यांपेक्षा लसणाचा (लसूण शेती) लागवड खर्च अधिक आहे. याचे कारण अन्य भाजीपाल्यापेक्षा लसणाचे बियाणे महाग आहे. त्याचबरोबर लागवड आणि पीक काढण्यासाठी मजूरही अधिक प्रमाणात लागतात. लागवडीपासून 135 ते 150 दिवसांत पीक तयार होते. अन्य पिकांशी तुलना करता, हा कालावधी अधिक आहे. पिकाच्या वाढीच्या काळात थंड आणि काहीसे दमट हवामान असते. लसणाचे गड्डे वाढत असता, काढणीवेळी कोरडे हवामान आवश्यक असते. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन हे पीक घेतल्यास त्यातून चांगले उत्पन्‍न मिळू शकते.

Back to top button