प्रसाद पाटील, पुढारी वृत्तसेवा : शेती व्यवसायाचे आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण होत असले तरी शेती कामासाठी आणि ग्रामीण भागात वाहतुकीसाठी आणि ग्रामीण भागात वाहतुकीसाठी आजही बैलशक्तीचा प्रामुख्याने वापर केला जातो. त्यामुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री देशभरात मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणूनच नागपूरच्या महाराष्ट्र पशू आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाने बैलजोडीची निवड करताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.
बैलजोडीची निवड करताना ती आपल्या शेतीचा प्रकार आणि त्यात बैलांमार्फत करण्यात येणारी कामे याचा विचार करावयास हवा. नांगरणी किंवा जड ओझे वाहण्याकरिता, दमणी, छकडासाठी बैल शुद्ध जातीचे असणे चांगले असते. जड ओझे वाहण्याकिरता गीर, काँक्रेज, देवणी, कंधारी आणि ओंगोल जाती प्रसिद्ध आहेत. मध्यम कामाकरिता खिल्लार, गवळाऊ, हरयाणा, नागोरी आणि जलद वाहतुकीकरिता अमृतमहल, हालीकर ही गुरे उपयुक्त आहेत.
शेतीची जमीन समपातळीत आणि मोठी असेल तर भारी किंवा वजनदार बैलजोडी निवडावी. रेताळ जमिनीकरिता आणि डोंगराळ भागातील लहान शेतांकरिता हलकी बैलजोडी दिसायला चांगली दिसते. तसेच बैल शक्यतो कमी वयाचे, उत्साही, सारख्या उंचीचे आणि शांत स्वभावाचे असल्यास ते दीर्घकाळ काम देऊ शकतात. बैलांचे डोळे मोठे आणि पाणीदार असावे. जबडा मजबूत असावा. पाठ शक्यतो सपाट आणि रुंद असावी. बैलाच्या समोर उभे राहून पाहिल्यास छातीचा घेर मोठा असावा आणि समोरील दोन्ही पाय मजबूत असावे. मागे उभे राहून पाहिल्यास छातीचा घेर मोठा असावा आणि मागील पाय पण समांतर असावे. बाजूने पहिल्यास फासळ्या लांब, रुंद आणि घेरदार असाव्यात. नाकपुड्या मोठ्या आणि रुंद असाव्यात, मान मजबूत असावी.
बैलाची काम करण्याची क्षमता त्याच्या स्नायूंची वाढ आणि वजनावर अवलंबून असते. बैलांना दररोज संथ आणि सतत 10 तास काम करावे लागत असेल तर बैलांची ओढण्याची ताकद त्याच्या शरीराच्या वजनाच्या 1/8 ते 1 10 असावी. म्हणजेच बैलाचे वजन 400 किलो असेल तर ओढण्याची ताकद 40 किलो असावी. थोड्या वेळेकरिता बैल सामान्य ओढीच्या 10 पट जोमाने म्हणजे स्वत:च्या वजनाइतक्या ताकदीने ओढू शकतो.
बैलांमधील सामान्य दोष : बैलांचे निरीक्षण करताना त्यांच्यामध्ये खालील दोष नाहीत याची खात्री करावी.
1) शिंगाच्या बुडाजवळील भेरूड
2) मानेच्या वरील भागात जुवांमुळे झालेली गाठ
3) पायांच्या खुरांमधील दोष
4) कोणत्याही एका पायाने बैल तिरपा उभा राहणे
5) मागील पायांमध्ये रिगणी असणे
6) मागील किंवा पुढील पायाचे कोणतेही हाड तुटून जोडल्याची खूण असणे
7) नेहमीच्या तुलनेत बैलांची पाठ जास्त खाली किंवा वर वाकलेली असणे
8) चालतांना किंवा पळतांना बैल लंगडणे
9) शेपटीला उद्री लागणे
10) पोटाला हर्निया असणे
11) डोळ्यांमध्ये अंधत्व असणे