सिंहायन आत्मचरित्र : पत्रमहर्षींची जन्मशताब्दी | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : पत्रमहर्षींची जन्मशताब्दी

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव
मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

‘बडे नसीबवाले होते हैं वह,
जिनके सरपर पिता का हाथ होता है।
उनकी सारी जिद पुरी हो जाती है,
क्योंकि उनके साथ पिता होता है।’

हिंदी भाषेतील एका अज्ञात कवीच्या या काव्यपंक्ती सर्वज्ञातच आहेत. कारण त्या मानवी जीवनातील चिरंतन सत्य सांगतात. पित्याचं छत्र हे पुत्रासाठी किती अनिवार्य असतं, हेच त्यातून प्रतीत होतं. पुत्राच्या डोक्यावर जर पित्याचा वरदहस्त असेल, तर त्याला काहीही अप्राप्य नसतं, याचंच सुंदर विवेचन वरील काव्यपंक्तीतून केलेलं आहे.

माझ्यावरही माझ्या आबांचं नेहमी असंच कृपाछत्र राहिलं. त्यांनीही माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली. ‘पुढारी’च्या विस्तारीकरणापासून ते जीवनाच्या विस्थापीकरणापर्यंत ते पहाडासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांची आभाळमाया लाभली, म्हणूनच मी जीवनाच्या आकाशात उंच झेपावू शकलो. मी ‘पुढारी’चा केलेला प्रचंड विकास आणि विस्तार पाहून त्यांचं मन समाधानानं आणि आनंदानं फुलून येत होतं. त्यांनी त्यांच्या जीवनात ग्रीष्म भोगला होता. शिशिर सोसला होता, परंतु जीवनातला बसंत बहार मात्र ते आताच अनुभवत होते. आबांना ‘पुढारी’च्या यशाची कमान पाहून फार समाधान वाटत होते. त्यांना त्यांच्या प्रस्थानाची चाहूल लागली होती. त्यामुळे त्यांनी पुढारी ऑफिसमध्ये येऊन सर्वांशी चर्चा केली व मार्गदर्शन केले आणि त्यांनी 20 मे 1987 रोजी सर्वांचा निरोप घेऊन महाप्रस्थान केले. त्यांची पोकळी माझ्या आयुष्यात कायमच भासत राहिली. त्यांच्या जाण्यानं माझं केवळ छत्रच हरवलं नाही, तर माझी प्रेरणा, माझी स्फूर्ती आणि माझी जिद्द यांनाही धक्का लागला.

काही काळ तरी मी सैरभैर झालो. कुठल्याही दुःखावर काळ हेच उत्तम औषध असतं, असं म्हटलं जातं. परंतु, काळाचं औषधही माझ्या दुःखावर फुंकर घालू शकलं नाही आणि त्यामुळेच त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा प्रस्ताव घेऊन जेव्हा त्यांची मित्रमंडळी आणि चाहतेमंडळी माझ्याकडे आली; तेव्हा दुःख, वेदना, विरह, हर्ष अशा असंख्य व्यामिश्र भावनांनी माझा ऊर भरून आला.
आबांचा जन्म 4 मे 1908 चा. त्यामुळे 2008 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. आबांची जन्मशताब्दी भव्य प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय कोल्हापुरातील विविध क्षेत्रांमधल्या कार्यकर्त्यांनी आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी घेतला. सगळं तर त्यांनीच ठरवलं. आता मला ‘मम’ म्हणण्यावाचून पर्यायच उरला नव्हता. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली तेव्हाच्या महापौर सई खराडे, खा. सदाशिवराव मंडलिक, निवेदिता माने आणि हसन मुश्रीफ यांच्या समवेतच जन्मशताब्दी समिती स्थापन करण्यात आली.

अवघ्या आठवड्यातच सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येऊन 4 मे 2008 रोजी प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहाने हा सोहळा संपन्न झाला. आबांच्या त्यांच्या हयातीत झालेल्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. आबांच्या अजातशत्रू स्वभावाचा तो दाखलाच होता. त्याची प्रचिती आम्हाला त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानंही आल्यावाचून राहिली नाही. आताही त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यावेळी व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. तसेच ठिकठिकाणी उभारलेल्या कमानी आणि लावलेले होर्डिंग्ज यांनी सारी करवीरनगरी सजली होती. कोल्हापूर जणू ‘पुढारी’मयच होऊ गेलं होतं.

‘आजी सोनियाचा दिनु। वर्षे अमृताचा घनु॥’

आमच्यासाठी तर हा दिवस ज्ञानेशांच्या या ओवीप्रमाणेच ‘अमृताचा घनु’ घेऊन आला होता. कोल्हापूरसमवेतच सांगली, सातारा आणि बेळगावसह महाराष्ट्राच्या विविध भागातून लोकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. सोहळ्यासाठी भव्य घुमटांसह उभारलेला विशाल मंडप लोकांनी भरगच्च भरला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह अनेक मंत्री तसेच भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते व्यासपीठावर विराजमान झाले होते. बाबासाहेब कुपेकर यांनी या ऐतिहासिक सोहळ्याचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. यावेळी आबांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, “पुढारी म्हणजे पुढार्‍यांचा पुढारी आहे. आबांनी आपल्या वृत्तपत्राचं नाव ‘पुढारी’ ठेवलं, यातच त्यांचं द्रष्टेपण दिसून येतं. त्यामुळेच ‘पुढारी’ हे केवळ एक वृत्तपत्र राहिलं नाही, तर तो एक विचारमंच बनला. आता तर पुणेकरांनीही ‘पुढारी’ला डोक्यावर घेतलेलं आहे.”

असे सांगतानाच शिवाजी विद्यापीठात ग. गो. जाधव अध्यासन स्थापण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आणि उपस्थितांनी त्या घोषणेला टाळ्यांच्या कडकडाटानं दाद दिली. यावेळी सर्वच वक्त्यांनी आबांच्या कार्याचा मुक्तकंठानं गौरव केला. तसेच विलासराव, गोपीनाथ मुंडे आणि पतंगराव कदम यांच्या राजकीय जुगलबंदीनं सोहळ्याला चांगलीच रंगत आली. या अविस्मरणीय सोहळ्यानं आबांच्या स्मृतींना आणि त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. आबांविषयी लोकांच्या मनात असलेली आदराची भावना, खरं तर वर्णनातीतच होती.
आबांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्याचा मोह आपल्या भारतीय टपाल खात्यालाही आवरता आला नाही. आजपर्यंत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यापर्यंत असंख्य विभूतींची टपाल तिकिटं काढणार्‍या भारतीय टपाल खात्यानं, आबांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचं टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. पाच रुपये किमतीचं हे तिकीट अतिशय आकर्षक पद्धतीनं छापण्यात आलं होतं. तर अशी एकूण तीन लाख तिकिटं छापण्यात आली होती.

18 नोव्हेंबर 2009 रोजी राष्ट्रपती भवनात, भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातील आलिशान हॉलमध्ये हा भावस्पर्शी आणि शानदार कार्यक्रम संपन्न झाला. मराठी पत्रकारितेचा इतिहासातील जणू हा एक सुवर्णदिनच होता. “माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग,” अशा शब्दांत प्रास्ताविकाची सुरुवात करून मी माझ्या भावना व्यक्त करताना म्हणालो, “पुढारीकार डॉ. ग. गो. जाधव यांनी स्वातंत्र्य लढ्यापासूनच पत्रकारिता हे समाजसुधारणेचं साधन म्हणून वापरलं होतं. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या विभूतींचा सहवास त्यांना लाभला. ज्या मूल्यांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्याच मूल्यांचा सुगंध या टपाल तिकिटाद्वारे देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचल्याशिवाय राहणार नाही.”
साहजिकच माझ्या मनोगताचं स्वागत दमदार टाळ्यांनी झालं.

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही आपल्या भाषणात आबांचा अतिशय मनोज्ञ शब्दांत गौरव केला. त्या म्हणाल्या,
“पुढारी या मराठीतील अग्रगण्य दैनिकाचे संस्थापक संपादक कै. डॉ. ग. गो. जाधव हे महान समाजसेवक आणि थोर समाजसुधारक होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते निकटवर्ती होते. त्यांच्या स्मरणार्थ आज टपाल तिकिटाचं प्रकाशन होत आहे. हा त्यांचा अतिशय उचित असा गौरव आहे.” त्याचप्रमाणे आबांच्या कर्तृत्वाचे पैलू स्पष्ट करताना मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले,
“पुढारीकारांवरील टपाल तिकीट हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. त्यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेले. त्यांनी मराठी पत्रकारिता एका नव्या उंचीवर नेली. महाराष्ट्राच्या समाज जीवनातील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. विधायक आणि समतोल पत्रकारितेचा मानदंड त्यांनी निर्माण केला.”

इतकेच नव्हे, तर या कार्यक्रमासाठी मंत्रिमंडळाची बैठकही पुढे ढकलल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच राज्याच्या मंत्रिमंडळाला आबांच्या टपाल तिकीट अनावरणाचं किती महत्त्व होतं, हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. याप्रसंगी केंद्रीय टपाल आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री गुरुदास कामत यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यांनी आबांच्या पत्रकारितेतील कर्तृत्वाचा गौरव अत्यंत सुंदर शब्दांत केला. ते म्हणाले, “ देशाच्या जडणघडणीत कै. ग. गो. जाधव यांचं मोलाचं योगदान आहे. वृत्तपत्र क्षेत्रावर त्यांनी आपला खोलवर ठसा उमटवला. पहिल्या दिवसापासूनच ‘पुढारी’ लोकप्रिय ठरला, तो त्यांच्या निःस्पृह पत्रकारितेमुळेच. ‘पुढारी’ची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच गेली. राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांनी प्रथमपासूनच ‘पुढारी’ अग्रभागी ठेवला. ती परंपरा आजही कायम आहे.”

यावेळी सौ. गीतादेवी जाधव यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना चांदीची अंबाबाईची मूर्ती भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. या प्रसंगाचं औचित्य साधून डॉ. योगेश आणि सौ. स्मिता यांच्यासह सर्व जाधव कुटुंबीय उपस्थित होते. कारण जाधव कुटुंबीयांसाठी हा सोहळा दसरा-दिवाळीपेक्षाही आनंदाचा जणू सणच होता. त्यामुळे तो संस्मरणीय ठरला. राष्ट्रपतींनी या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे त्या चहापानाला त्या पूर्णवेळ उपस्थित होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, पतंगराव कदम तसेच कर्नाटकचे माजी मंत्री आणि माझे नातलग जी. आर. शिंदिया यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते. हेलन केलर ही जगप्रसिद्ध विधिज्ञ आणि समाजसेविका. तिचं एक विधान प्रसिद्ध आहे. ती म्हणते, ‘Alone we can do so little, together we can do so much.’

आबांनीही हाच द़ृष्टिकोन बाळगला होता. त्यामुळेच त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विविध माणसं भेटत गेली. मैत्री जुळत गेली. चाहत्यांची मांदियाळी जमत गेली. काफिला पुढे पुढे जात राहिला. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात उमटलं होतं.
शिवाजी विद्यापीठानं जानेवारी 2017 पासून पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन सुरू केलं. एखाद्या संपादकाच्या नावानं विद्यापीठात सुरू होणारं हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पहिलेच अध्यासन होय! आबांचं पत्रकारितेतील आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन, त्यांच्या नावे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात अध्यासन व्हावे, अशी संकल्पना तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मांडली. तोच धागा पकडून, आबांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शिवाजी विद्यापीठात पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावे अध्यासन सुरू करण्याची घोषणा केली. त्याला अनुसरून कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी 3 मे 2008 रोजी मुख्यमंत्री देशमुख यांच्याकडे अध्यासनाचा प्रस्ताव पाठवून दिला. त्यानंतरच्या येणार्‍या प्रत्येक कुलगुरूंनी या प्रस्तावाचा पाठपुरावा केला. परंतु, शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात या प्रस्तावाला चालना मिळाली! आणि 24 जानेवारी 2016 रोजी राज्य सरकारच्या धर्मादाय देणगी निधीतून या अध्यासनासाठी 50 लाख रुपयांचा निधी विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आला. यासंदर्भातील राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे पत्र, 21 एप्रिल 2016 रोजी विद्यापीठाला मिळालं. त्यानंतर 19 ऑगस्ट 2017 रोजी शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे पत्र पाठवून अध्यासनासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर पदे मंजूर करण्यासाठी विनंती केली.

राज्य सरकारनं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अध्यासनाला निधी देण्याचं मान्य केलं. त्यानुसार 23 मार्च 2018 रोजी अध्यासनासाठी एक कोटी रुपये मंजूर करून ते विद्यापीठाकडे वर्ग करण्यात आले. तसेच मार्च 2020 मध्येही जिल्हा नियोजन समितीकडून अध्यासनासाठी आणखी 75 लाखांचा निधी देण्यात आला. या निधीतून विद्यापीठ कॅम्पस्मध्ये अध्यासनासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात येत आहे. शिवाय अध्यासनाचं काम सुरळीतपणे चालण्यासाठी विद्यापीठाच्या वतीनं एक सल्लागार समितीही स्थापन करण्यात आली आहे.

या सल्लागार समितीची पहिली बैठक 22 डिसेंबर 2018 रोजी विद्यापीठात पार पडली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, अध्यासनाच्या वतीनं 2018 पासून ‘पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम’ हा नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते अध्यासनाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. हा समारंभ 22 फेब्रुवारी 2019 रोजी पार पडला. अध्यासनाच्या बाबतीत इथं एक निरीक्षण नोंदवणं महत्त्वाचं वाटतं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपल्या कार्यक्रमात अध्यासनाची घोषणा केली. परंतु, पुढे मात्र काहीच हालचाल झाली नाही. अध्यासनाच्या कामाला खरी गती मिळाली ती राज्यात युतीचं सरकार येऊन, मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आल्यानंतरच.

अध्यासनाच्या सल्लागार समितीची दुसरी बैठक 13 जून 2019 रोजी झाली. तीत अध्यासनाच्या वतीनं अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाहीही झाली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी अध्यासनामार्फत कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. तसेच अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी लिहिलेला ‘पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव यांची पत्रकारिता’ हा ग्रंथ अध्यासनामार्फत प्रकाशित करण्यात आला आहे.

तसेच आबांनी लिहिलेल्या अग्रलेखांचं संकलन करण्यात आलं असून, हा संपादित ग्रंथही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याशिवाय कै. डॉ. ग. गो. जाधव स्मृती व्याख्यानमालेंतर्गत अनेक महनीय व्यक्तींची व्याख्यानं वेळोवेळी सादर करण्यात येत असतात. ही व्याख्यानं म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी एक मेजवानीच असते. आता त्या सर्व व्याख्यानांचा एक ग्रंथ तयार करण्यात आला असून, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते तो प्रकाशितही करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळातर्फे ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ ही ग्रंथमालिका चालवलेली आहे. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे हे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. त्यांनी स्वतःच आबांचे चरित्र लिहून ते साहित्य संस्कृती मंडळाला सादर केलं. त्यावेळी प्रसिद्ध लेखक बाबा भांड हे मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी चर्चा करून 2020 मध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आला. या ग्रंथात तसे आबांचं अल्पचरित्रच रेखाटण्यात आलेलं आहे. तथापि तेवढं तरी ते येणं आवश्यक होतंच. परंतु, आता आबांचं आणि आईंचं सविस्तर मोठं चरित्र यावं, असं मला मनापासून वाटतं. आबा आणि आई यांच्या योगदानाची सुरुवात अगदी घर आणि नातेवाईकांपासून सुरू होऊन ती विविध सामाजिक चळवळीपर्यंत विस्तृत होत जाते. त्यांच्या सार्‍या आठवणी या ना त्या कारणांनी लोक जपून ठेवतात. वेळप्रसंगी सांगत असतात. खरं तर हीच त्या उभयतांच्या कार्याची पोचपावती असते. आबांनी तर अनेकांना घडवलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासह अनेक पिढ्या घडल्या. मोठ्या झाल्या. आबा त्या सर्वांनाच गुरुस्थानी होते.गॉर्डन बी. हिंकले हे प्रसिद्ध ख्रिश्चन ‘The happiest people I Know are those who lose themselves in the service of others.’ आबांच्या बाबतीत हे विधान तंतोतंत लागू पडतं.

Back to top button