सिंहायन आत्मचरित्र : दूध दराचा लढा | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : दूध दराचा लढा

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

दूध हे पूर्णान्न आहे. आज सारी मानवजात गायीच्या नि म्हशीच्या दुधावरच उदरनिर्वाह करते आहे. त्यानं पंचपक्वान्नं जरी खाल्ली, तरी त्याच्या आहारात येनकेनप्रकारे दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा सिंहाचा वाटा असतोच! त्यातून दूध उत्पादन आणि दुधाची विक्री हा व्यवसाय जन्माला आलेला आहे. अर्थात, हा व्यवसाय आजकाल नव्हे, तर अनादिकाळापासूनच चालत आलेला आहे.

हा दुग्ध व्यवसाय मानव समाजाचा एक अविभाज्य भाग असून, तो पुराणकाळापासून चालत आलेला आहे. तरीही गेल्या शंभरएक वर्षांत या व्यवसायाचं स्वरूप आणि व्याप्ती यामध्ये लक्षणीय बदल झालेला असून, अलीकडच्या तीस-चाळीस वर्षांत हा दुग्ध व्यवसाय हळूहळू सहकारी तत्त्वावर सुरू झाल्याचं दिसून येतं. आपल्या महाराष्ट्रात तर सहकारी दूध संघांनी आपलं बस्तान चांगलंच बसवलेलं असून, ते सर्वसामान्यांचं आणि शेतकरी, कामकरी आणि कष्टकरी वर्गाचं एक उदरनिर्वाहाचंही साधन झालं आहे. महाराष्ट्रात दुधाचं पेव फुटलं असलं, तरीही या धवलक्रांतीचा पाया वर्गीस कुरियन यांनी घातला, असं मानण्यात येतं आणि तोही गुजरातमधून. देशात दुधाचा ब्रँड सर्वप्रथम त्यांनीच निर्माण केला आणि सर्वसामान्यांच्या ओठांवर ‘अमूल’चं नाव आणि दूधही प्रचलित झालं.

त्यामुळे वर्गीस कुरियन यांना ‘मिल्क मॅन’ म्हणूनही ओळखलं जातं. अर्थात, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं ते जिद्द, चिकाटी, कष्ट, कल्पकता, ध्येय, धैर्य आणि प्रामाणिकता या सप्तसूत्रीच्या बळावरच! आणि या सर्वांबरोबरच त्यांनी आपल्या आयुष्यात वेळेलाही फारच महत्त्व दिलेेलं आहे. ‘Times is money’ ही उक्ती तर प्रचलित आहेच; पण त्याही पुढे जाऊन ते म्हणतात, ‘A person who does not have respect for time, and does not have a sense of timing, can achive little.’

‘जी व्यक्ती वेळेची कदर करीत नाही आणि ज्याला वेळेचं भान कधीच नसतं, ती व्यक्ती जीवनात कधीच फारसी यशस्वी होत नाही.’ कुरियन यांचं हे विधान लाखमोलाचं आहे, यात वादच नाही. अचूक वेळ साधणं ही गोष्ट कोणतंही काम शंभर टक्के यशस्वी करण्यामध्ये मोलाचा हातभार लावीत असते.

कुरियन यांनी गुजरातमधून काम केलं. त्यांच्याच प्रेरणेतून महाराष्ट्रातही धवलक्रांती झाली. परंतु, महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय हा सहकारी तत्त्वावर दूध संघ चालवणार्‍यांसाठी किफायतशीर जरूर होता; पण दूध उत्पादक असलेल्या तळागाळातील घटकांसाठी, शेतकर्‍यांसाठी नि कष्टकर्‍यांसाठी अजिबात फायद्याचा नव्हता. उलट त्यांचं रक्तशोषण करणाराच होता. ही विदारक अवस्था जेव्हा माझ्या लक्षात आली, तेव्हा माझ्यातला ‘जागल्या’ पुन्हा एकदा दक्ष झाला आणि महाराष्ट्रातील दूध उत्पादकांच्या दराला किफायतशीर भाव मिळावा म्हणून मी लढ्याला सज्ज झालो.

‘उसाला लागला कोल्हा’ या मालिकेमुळे ऊस उत्पादक खडबडून जागा झाला. त्यानंतर झालेली आंदोलनं आणि त्यातून उसाला वेळोवेळी मिळालेला वाढीव दर, या सार्‍या बाबींवर मी पाठीमागच्या प्रकरणात प्रकाशझोत टाकलेला आहेच. आता वेळ आली होती, दूध संघाबरोबर लढा देण्याची आणि दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची. कारण मी एक संपादक असलो, तरी मी एक वकीलही आहे आणि त्यातूनही मी जन्मजात एक शेतकरीही आहे, हे मी विसरू शकत नव्हतो.

जसा मी लहानपणापासूनच तालमीतल्या तांबड्या मातीत लोळलेलो आहे, तसाच शेतातल्या काळ्या मातीतही माझा घाम सांडलेला आहे. मी लहानपणापासूनच शेतावर जात असे. काळ्या आईची सेवा करण्यात मला मोठा मानसिक आनंद आणि समाधानही मिळत असे. लागवडीपासून तोडणीपर्यंतच्या ऊस आणि भाजीपाल्याच्या सगळ्या प्रक्रियेतून मी गेलेलो आहे. साहजिकच, शेतकरी म्हटला की बैल आणि गायीगुरं आलीच. गोठे आणि खोपा आल्याच. आमच्याकडे दुभत्या गायी-म्हशींचा राबता तेव्हाही होता आणि आजही आहे.

त्यामुळे दुग्ध व्यवसायाची आणि त्यातील व्यवहाराची मला चांगली जाण बालपणापासूनच होती आणि आहे. तसेच बालपणापासूनच माझा दुधाशी जवळचा संबंध. मी तालमीत जात होतो. मेहनत करीत होतो. अधूनमधून छोट्यामोठ्या कुस्त्या करून मैदानंही मारीत होतो. आता पैलवान म्हटलं की, त्याचं महत्त्वाचं खुराक म्हणजे दूधच! आणि मग कोल्हापूरच्या पैलवानाला गंगावेसमधला दुधाचा कट्टा काही चुकलेला नाही. तिथलं नुकतंच पिळलेलं धारोष्ण दूध पिताना स्वर्गसुखाचा आनंद मिळत असे.

परंतु या सहज, सोप्या दूध विक्रीचा कधी एवढ्या व्यापक प्रमाणात धंदा होईल आणि सहकारातून महाराष्ट्रभर दूध संघ उभे राहतील, असं तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं; पण ते झालं. महाराष्ट्रात धवलक्रांतीनं जन्म घेतला, ही आनंदाची बाजू. परंतु, या धवलक्रांतीला एक काळी बाजूही होतीच. वरून सुंदर, गोंडस आणि गुटगुटीत दिसणार्‍या या धवलक्रांतीच्या पोटात एक कॅन्सरची गाठ वाढत होती आणि तिकडे कुणाचं लक्षच नव्हतं. परंतु, आयुष्यभर ‘जागल्या’ची भूमिका पार पाडल्यामुळे धवलक्रांतीला लागलेली ही असाध्य व्याधी माझ्या लक्षात आली आणि वेळीच शस्त्रक्रिया करून ही कॅन्सरची गाठ काढून टाकली नाही, तर ही धवलक्रांती मृत्युमुखी पडायला फारसा वेळ लागणार नाही, हेही माझ्या ध्यानी आलं.

राज्यातील शेतकरी जरी नगदी पिकं घेत असला, तरी ती पारंपरिक पद्धतीनंच घेतली जात होती. त्यामुळे मुळातच उत्पन्न कमी. त्यात पीक हातात आल्यानंतरच त्याचा सौदा होतो आणि मगच शेतकर्‍याच्या पदरात चार पैसे पडतात. त्यातून मग बहुतांशी रक्कम ही सावकारांची आणि बँकांची कर्जं फेडण्यातच जाते. उरलेल्या पैशांतून बी-बियाणं, मशागत यासाठी झालेला खर्च बाजूला काढावा लागतो. कारण तीच रक्कम पुढच्या लागवडीसाठी वापरायची असते. या सर्वांतून शेतकर्‍याच्या हाती काय राहातं, या प्रश्नाचं उत्तर यक्षालासुद्धा देता येणार नाही.

अशा वेळी राज्यात शेतकर्‍यांना हुकमी पैसे मिळवून देणारा आणि त्यांच्या दैनंदिन गरजा भागवून मुला-बाळांच्या शिक्षणाला उपयोगी पडणारा जोडधंदा म्हणजे दूध व्यवसाय होय! मात्र, याच व्यवसायात दुधातलं लोणी खाणारे बोके मोकाट सुटलेले होते. ते शेतकर्‍याला त्यांच्या लाभापासून वंचित ठेवून स्वतः गब्बर झाले होते.

दूध उत्पादक शेतकरी हा मुळातच असंघटित. शेती उत्पन्नावर पोट भरत नाही म्हणूनच अनेकांनी हा जोडधंदा सुरू केलेला. त्यातही शिवारात ज्यांची एक गुंठाही जमीन नाही, अशा तळागाळातील शेतकरी आणि शेतमजुरांचाच यात अधिक भरणा. दुधाच्या व्यवसायावरच त्यांचं कुटुंब चाललेलं. प्रामुख्यानं दूध व्यवसायातील कष्टाची सारी जबाबदारी ही आया-बहिणींचीच. यातला पैसा ताजा दिसत असला तरी हा धंदा तसा सोपा नाही. शेणात हात घातल्याशिवाय आणि शेणाच्या पाट्या डोक्यावरून वाहिल्याशिवाय यातला पैसा दिसत नाही. दुर्दैवानं ही शेणाची पाटी माय-भगिनींच्याच डोक्यावर असते. त्यांनी दिलेल्या दुधावर आपली ढेरी भरणार्‍या लबाड बोक्यांना या आया-बहिणींचा गळणारा घाम कधीच दिसत नव्हता!

2005 सालापर्यंत या व्यवसायाचं त्रैराशिक अत्यंत व्यस्त होतं. तेव्हा म्हशीच्या दुधाला 10 रुपये 50 पैसे, तर गायीच्या दुधाला 10 रुपये 20 पैसे इतका दर मिळत होता. त्यापूर्वीच्या सुमारे सात वर्षांत दूध संघाच्या सुहृदयी संचालकांनी किती वाढ दिली होती, तर आधी पाच पैसे! ही तर दूध उत्पादक शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच होती आणि घाम गाळणार्‍या आया-बहिणींचा घोर अपमान होता. मार्केटमध्ये औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तू जेव्हा विक्रीसाठी येतात, तेव्हा आज खरेदी केलेलं औषध महिन्याभरानं त्याच किमतीला मिळेल, याची कधीच खात्री नसते. हीच परिस्थिती इतर जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीतही घडताना दिसत असते. या पार्श्वभूमीवर दुधाच्या दरात मात्र सात वर्षांत अवघी पाच पैसे दरवाढ! ही दूध उत्पादकांची केलेली क्रूर थट्टाच नव्हे, तर काय?

याउलट गायी-म्हशींना देण्यात येणारं खाद्य मुलखाचं महाग. दिवसागणिक त्याच्यात वाढच होत गेलेली आणि मग असलं मोला-महागाचं खाद्य जनावरांना देऊन त्यापासून काढलेल्या दुधाच्या दरात मात्र वाढ नाही. झालीच तर किती? सात वर्षांत पाच पैसे! शेतकर्‍यांच्या घामा-कष्टाची किंमत अवघी पाच पैसे!

हाच तो दूध उत्पादन व्यवसायाला लागलेला मोठा कॅन्सर होता आणि या कॅन्सरनं ग्रामीण जीवनाला ग्रासून टाकलं होतं. हे जेव्हा माझ्या ध्यानी आलं, तेव्हा मी अस्वस्थ झालो. त्यांच्या घामाचं योग्य मोल त्यांना मिळत नव्हतं. अत्यल्प किमतीमध्ये हे दूध त्यांच्याकडून खरेदी केलं जात होतं. एक प्रकारची ही आर्थिक आणि सामाजिक पिळवणूकच होती. त्या पिळवणुकीनं ग्रामीण भागातला एक मोठा वर्ग पार पिचून निघत होता.

आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सरकारचं या समस्येकडे अजिबात लक्ष नव्हतं. राज्य सरकारच्या पातळीवरही इतकी सापत्नभावाची वागणूक आपल्याच जनतेला देणं शोभादायक नव्हतं. खरं तर, सत्तेत बसलेले सर्वजणच आम्ही शेतकर्‍यांची मुलं म्हणून मिरवणारे! मग शेतकर्‍यांची मुलं खुर्चीवर बसलेली असतानाही, शेतकर्‍यांच्या पदरात मात्र सात वर्षांत दुधाच्या दरात अवघी पाच पैसे वाढ पडते, हे कोणत्या गणितात बसतं? ही बाब भल्याभल्या अर्थतज्ज्ञांनाही चक्रावून टाकणारी होती.

बरं, अन्याय इथंच थांबला होता का? तर तसंही नाही. उलट गायीच्या दुधात 50 पैशांनी घट करण्यात आली होती! राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर असं एखादं तरी प्रॉडक्ट असेल का, की ज्याची किंमत कमी झाली आहे? राज्यातील दूध उत्पादकांना कसं वार्‍यावर सोडून दिलं होतं, हेच यावरून सिद्ध होत नाही का? सत्ताधारी नेहमीच धोशा लावतात की, शेतकरी जगला पाहिजे! परंतु, शेतकर्‍यांच्या मालाचा निर्मिती खर्चच जर निघत नसेल, तर तो कसा जगेल, याचं उत्तर मात्र कुणीच देत नाही. मतपेटीवर डोळा ठेवून शहरवासीयांचं भलं करणार्‍यांना ज्या काळ्या मातीत ते जन्मले, त्या काळ्या आईच्या लेकरांकडे पर्यायानं त्यांच्याच भावंडांकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

शेतकरी असोत किंवा दूध उत्पादक असोत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक कायमचा आपलेपणा भिनलेला आहे. मला ती माझीच भावंडे वाटत आलेली आहेत. त्यामुळेच ‘पुढारी’ची सूत्रं घेतल्यानंतर मी जाणीवपूर्वक शेतकर्‍यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं. मला ‘पुढारी’ला केवळ बातमीपत्र करायचं नव्हतं, तर ‘पुढारी’ हे एक सामाजिक व्यासपीठ झालं पाहिजे, ही माझी तळमळ होती. म्हणूनच मी इतर संपादकांसारखं केवळ बातम्या छापत किंवा अग्रलेख लिहीत बसलो नाही, तर प्रत्येक सामाजिक समस्येला स्वतः जाऊन भिडलो.

त्यामुळेच आजपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात जे जे सामाजिक लढे उभे राहिले, त्यात माझा सक्रिय सहभाग होता. किंबहुना त्या लढ्यांची धुराही मी वाहिलेली आहे. ‘पुढारी’ नावाचं ब्रह्मास्त्र हाती घेऊनच मी प्रत्येक लढ्यात उडी घेतलेली आहे. त्यामुळेच दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाचं योग्य मूल्य मिळत नाही म्हटल्यावर, शेतकर्‍यांचे सर्वच प्रश्न हातात घेऊन मी शेतकरी संघटना उभी केली. मग ‘पुढारी’च्या माध्यमातून त्यांच्या सर्वच प्रश्नांना वाचा फोडली. त्यावर खरपूस लिखाण केलं आणि त्यातून आंदोलनं उभी केली. एवढंच नव्हे, तर त्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन किंबहुना नेतृत्व करून सर्व प्रश्न धसास लावले आणि शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिला.

त्याचप्रमाणे दूध उत्पादकांनाही न्याय मिळवून द्यायची खूणगाठ मी मनाशी बांधली आणि कामाला लागलो. याबाबत मी सर्वप्रथम राजू शेट्टींशी चर्चा केली. त्यांना हे आंदोलन हाती घेण्याची मी सूचना केली. यावर मग माझ्या आणि राजू शेट्टींच्या ‘पुढारी’भवनात अनेक बैठका झाल्या. सांगोपांग चर्चा झाली आणि मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा प्रश्न हाती घेतला आणि पहिला मोर्चा काढला. ‘पुढारी’तून मी त्याचा सविस्तर वृत्तांत दिला. त्यासरशी दूध उत्पादक खडबडून जागे झाले. तोपर्यंत मी अग्रलेखाचा बॉम्बच फोडला आणि दूधसम्राटांच्या तोंडाचं पाणी पळालं!

2006 मधल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ‘पुढारी’नं दूध व्यवसायाचा सारा लेखाजोखाच मांडला. ‘पांढर्‍या दुधातील काळे बोके’ ही दहा भागांची मालिका प्रसिद्ध करून, संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. या मालिकेनं धवलक्रांतीच्या दिव्याखालचा अंधार उजेडात आला आणि या व्यवसायातलं उघडंवाघडं सत्य जनतेसमोर आलं. त्यावेळी दूध संघ हा भ्रष्टाचाराचं आगार झाला होता. दूध उत्पादकांची पिळवणूक करून आपल्या पोळीवर तूप कसं ओढता येईल, यासाठी जणू पदाधिकार्‍यांची चढाओढच लागली होती.

मात्र, ‘पुढारी’नं दूध संघातील भ्रष्टाचाराचं भांडं फोडलं आणि त्यांच्या भ्रष्टाचाराचं लोणी चव्हाट्यावर सांडलं. दूध उत्पादकांची पिळवणूक कशी होते, ते रोखठोकपणे मांडण्यात आलं. फॅटमध्ये कसं गोलमाल होतं, त्यावर झणझणीत प्रकाश टाकला. दूध व्यवसायात काबाडकष्ट करणार्‍या माय-भगिनींच्या डोक्यावर शेणाची पाटी आणि दूध संघाच्या संचालकांना मात्र तूप-रोटी! या विरोधाभासाचं जळजळीत वास्तव वेशीवर टांगलं. दुधावरची मलई कोण आणि कशी फस्त करतो, याचाही उलगडा केला. आतापर्यंत दूध व्यवसायातील अनिष्ट प्रथा उघड्यावर आणणारे सडेतोड आणि निर्भीड लिखाण कधी प्रसिद्ध झालंच नव्हतं. मुळात या व्यवसायाचा कधी गांभीर्यानं विचारच झाला नव्हता. हा एक जोडधंदा आहे आणि तो तसाच चालणार, अशीच जणू सार्‍यांची मनोवृत्ती बनली होती.

या मालिकेनं दूध उत्पादकाला आपल्यावर होणार्‍या अन्यायाची तीव्रतेनं जाणीव झाली. त्यांचा स्वाभिमान जागृत झाला. आपल्या न्याय्य-हक्कांसाठी आपल्याला लढा दिलाच पाहिजे, याची प्रथमच जाणीव झाली आणि – ‘पांढर्‍या दुधातील काळे बोके’ या मालिकेनं बोक्यांचं पितळ उघडं पडलं. जनमताचा रेटा निर्माण झाला आणि आंदोलनाला तोंड फुटलं. बघता बघता कोल्हापूर, सांगली आणि सातार्‍यात या तिन्ही जिल्ह्यात आंदोलनाचं लोण पसरलं. चक्काजाम झाला. 25 लाख लिटर दूध संकलन ठप्प झालं. दूध वाहतूक वाहनं जागच्या जागीच रोखण्यात आली, तसेच खासगी दूध वाहतूकही बंद पाडण्यात आली.

दूध दरात त्वरित वाढ व्हावी, तसेच फरकाची रक्कमही लगेच मिळावी, या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली. आंदोलकांच्या तोंडी नाव होतं ते ‘पुढारी’चंच! ‘पुढारी’नं मालिका छापून अन्यायाला वाचा फोडली. उसानंतर आता दुधालाही भाव मिळवून देण्याची भूमिका ‘पुढारी’नं घेतल्याबद्दल आंदोलक कृतज्ञता व्यक्त करीत होते. आता पांढर्‍या दुधातील काळ्या बोक्यांच्या पाठीत बडगा हाणल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, अशी दूध उत्पादकांनी प्रतिज्ञाच केली होती. हाच त्यांचा ‘एल्गार’ होता.
आंदोलन पाहता पाहता चांगलंच उग्र बनलं! त्याबरोबर आंदोलकांची पाठराखण करताना ‘पुढारी’ही अधिकाधिक उग्र होत गेला. ‘पुढारी’नं आंदोलनाच्या बातम्या अगदी ठळकपणे छापल्या. परंतु, फक्त बातम्या छापून थांबेल, तो ‘पुढारी’ कसला? मीच या आंदोलनाची सुरुवात केली होती. मग त्यात सक्रिय सहभाग घेणं माझं कर्तव्यच होतं. मी शेतकरी नेते आणि संघटनांचे पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं.

लढा पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पसरला. लढ्याची व्याप्ती वाढली, तशी खोली आणि उंचीही वाढली. केवळ दूध संघांचंच नव्हे, तर सरकारचंही धाबं दणाणलं. निषेधाचा सूर सरकारच्या नि दूध सम्राटांच्या कानापर्यंत जावा, यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर दुधाचे कॅन उपडे करण्यात आले. टँकरचे कॉक सोडून देण्यात आले. गायींचं दूध तर चक्क नदीतच सोडून देण्यात आलं. नदी दुधानं दुथडी भरून वाहू लागली! कोल्हापूर आणि सांगलीतून तर मुंबईलाही दूध पुरवठा केला जातो. तो बंद पाडला. मुंबईची रसद तोडली. श्रमजीवी दूध उत्पादकांनी मंत्रालयाची हवा तंग केली!

अखेर राज्य सरकारला दूध दरवाढीचा निर्णय घ्यावाच लागला. पाच पैशांऐवजी आता एक रुपयानं दरवाढ करण्यात आली. त्यावेळी राज्यात सुमारे एक कोटी लिटर इतके वार्षिक दूध संकलित होत असे. या निर्णयानं दूध उत्पादकांच्या खिशात वार्षिक 360 कोटी रुपये पडले. शिवाय आणखी एक महत्त्वाचा निर्णय चर्चेतून घेण्यात आला. कृश काळ म्हणजे म्हशीचं दूध कमी येण्याचा काळ असतो, तर पुष्ठ काळ म्हणजे दूध अधिक मिळण्याचा काळ मानला जातो. निसर्ग नियमानुसार प्रत्येक म्हैस या दोन्ही अवस्थेतून कधी ना कधी जातच असते. मात्र, या दोन्ही काळांसाठी पूर्वी स्वतंत्र दूध दर देण्याची प्रथा होती. म्हणजेच पुष्ठ काळात म्हशीनं दिलेल्या दुधाच्या दरापेक्षा कृश काळात दिलेल्या दुधाचा दर कमी असे.

ते या आंदोलनानंतर सरकारनं रद्द केलं. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, कामकरी, कष्टकरी आणि माय-भगिनी अत्यंत आनंदी झाल्या. ‘पुढारी’नं सातत्यानं या प्रश्नावर आवाज उठवला. तसेच मी स्वतः जातीनिशी या बातम्यांवर बारकाईनं लक्ष ठेवलं. प्रसंगी दूध सम्राटांशी कटुता घेऊनही मी या आंदोलनात उडी घेतली आणि दूध उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. कोणत्याही दबावाला बळी न पडता आणि अपप्रवृत्तींना मुळीच दयामाया न दाखवता, ‘पुढारी’नं सत्ताधार्‍यांविरोधात आणि दुधाच्या कारखानदारीविरोधात लढा सुरू ठेवला. म्हणूनच आंदोलन यशस्वी झालं, हीच दूध उत्पादकांची प्रामाणिक प्रतिक्रिया होती.

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतूनच त्यावेळी 40 लाख लिटरपेक्षा अधिक दूध संकलित होत होतं. या धंद्यामध्ये जवळजवळ 20 लाख कुटुंबं गुंतलेली! ही जवळजवळ सर्वच कुटुंबं दुधाच्या जोडधंद्यावर अवलंबून. त्यांना या निर्णयानं दिलासा न मिळेल तरच नवल! त्यावेळी दसरा-दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. परंतु, दूध उत्पादकांची मात्र ‘आजच दसरा आजच दिवाळी’ अशी अमोदावस्था झाली.

खरं तर ‘पुढारी’ कार्यालयातच या आंदोलनाचा विचार जन्माला आला. त्याच्यावर चर्चाही इथंच घडल्या आणि या आंदोलनाला मूर्त स्वरूप आलं तेही ‘पुढारी’भवनातच. एकीकडे आंदोलन पेट घेत असतानाच मुख्यमंत्री विलासराव देशमुख माझ्याशी फोनवरून संपर्क साधून होते. चर्चेसाठी त्यांनी मला मुंबईलाही पाचारण केलं होतं. एका अर्थी मी इथंही मध्यस्थाचीच भूमिका पार पाडीत होतो, यात शंका नाही.
प्रश्न ऊस दराचा असो वा दूध दराचा, शेतकर्‍यांच्या हितासाठी आवाज तर ‘पुढारी’नंच उठवला. दूध दराचा प्रश्न तर ऊस दराच्या प्रश्नापेक्षा अधिक किचकट होता. कारण विखुरलेल्या दूध उत्पादकांना संघटित करून त्यांची मोट बांधणं अत्यंत अवघड गोष्ट होती. मग आंदोलन उभं करणं तरी दूरच! परंतु, ‘पुढारी’नं ही अशक्य गोष्टही शक्य करून दाखवली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ताकद देऊन त्यांना आंदोलनासाठी उभं केलं, ते ‘पुढारी’नंच! ‘पुढारी’ हाच खरा शेतकर्‍यांचा कैवारी आहे, हे या आंदोलनानं सिद्ध केलं.

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, ‘पुढारी’नं दूध दरवाढीची लढाई रस्त्यावर आणली. त्यांच्या पाठीशी ‘पुढारी’ पूर्णपणे उभा केला. त्यांना योग्य वेळी योग्य ती रसद पुरवली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. याबद्दल धन्यवाद देताना, या आंदोलनातील महत्त्वाचे नेते राजू शेट्टी म्हणाले होते, “‘पुढारी’शिवाय हा लढा उभा राहिलाच नसता आणि यशस्वीही झाला नसता. ‘पुढारी’नं शेतकर्‍यांना यापुढेही असंच बळ द्यावं.”

राज्यातील दररोजची दुधाची उपलब्धता ही 2 कोटी 91 लाख आणि 60 हजार लिटर इतकी आहे. यापैकी जवळपास 1 कोटी 4 लाख आणि 2 हजार लिटर दूध हे वेगवेगळ्या प्रकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांच्या म्हणजेच घरगुती रतीब, गवळी, दूध विक्री केंद्र आणि दूध संघासारख्या माध्यमातून बाजारात येत असते. या रोजच्या रोज बाजारात येत असलेल्या दुधापैकी तब्बल 45 लाख लिटर दूध हे वेगवेगळ्या खासगी आणि सहकारी दूध संघांच्या माध्यमातून येतं.

आज हे दूध संघ दूध उत्पादकांना गाय आणि म्हशीच्या दुधानुसार प्रती लिटर 40 रुपयांपासून ते 52 रुपयांपर्यंत दर देत आहेत. राज्यातील गायींच्या आणि म्हशींच्या दुधाची उपलब्धता ही थोड्याफार फरकानं समसमान असल्याचं दिसून येतं. आता ही खर्‍या अर्थानं ‘धवलक्रांती’ झाली, असं म्हणता येईल आणि त्यामागे ‘पुढारी’चं मोलाचं योगदान आहे, हे नम्रपणे सांगावंस वाटतं.

या आंदोलनामुळे राज्यातील दूध उत्पादकांना फार नाही, पण अवघी तीन रुपयांची दरवाढ मिळाली असं जरी गृहीत धरलं, तरी गेल्या बारा वर्षांत या माध्यमातून त्यांच्या पदरात तब्बल 12 ते 13 हजार कोटी रुपये पडलेले आहेत. गोरगरीब आणि तळागाळातील दूध उत्पादकांना ‘पुढारी’नं मिळवून दिलेला हा एक सामाजिक न्यायच म्हणावा लागेल.

वर्गीस कुरियन यांनी गुजरातला दूध उत्पादनामध्ये अव्वल क्रमांकावर आणून ठेवलं, ही वस्तुस्थिती आहे. मात्र जेव्हा एखादा व्यवसाय अशा तर्‍हेनं भरभराटीला येतो, तेव्हा त्यामध्ये सरकारी हस्तक्षेप ठरलेलाच असतो. कुरियननाही या अग्निदिव्यातून जावं लागलं. त्यांच्या कामामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि सरकारीबाबूंनी अनेकदा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. या सर्व अनुभवातून गेल्यानंतर कुरियन म्हणतात, ‘I began to see then that when the government enters business, the citizens of india get cheated. The greatest repercussion of the government entering into business is that insted of safeguarding people from vested interests, the themselves become the vested interest.’

‘जेव्हा सरकारच एखाद्या उद्योगधंद्यात प्रवेश करतं, तेव्हा भारतीय नागरिकांची शुद्ध फसवणूक होत असते. सरकारनं उद्योगधंदे आपल्या हाती घेतल्यामुळे जनतेचं सर्वात मोठं नुकसान जर कुठलं होत असेल, तर लोकांच्या हिताचं सरकार रक्षण करीत नाही, तर ते स्वतःच्या हिताचं रक्षण करतं.’

महाराष्ट्रातही काही वेगळी परिस्थिती दिसून येत नाही. सरकार कोणतंही असो, ते कुठल्याही पक्षाचं असो, सहकारात सरकारी हस्तक्षेप हा ठरलेलाच असतो. यामध्ये सामान्य माणूस मात्र नागवला जातो. ते पाहून मन सैरभैर झाल्याशिवाय राहात नाही. आपल्याच हाडामांसाची माणसं जेव्हा आपल्याच अनमोल मतांवर सत्ताधारी होतात, तेव्हा ते आपल्यालाच वार्‍यावर सोडून देतात, हे कटूसत्य आहे. साहजिकच, अशा मदमस्त सत्ताधीशांना जर जमालगोटा द्यायचा असेल, तर त्यांच्या अपप्रवृत्तीवर नेहमीच आवाज उठवला पाहिजे.

‘पुढारी’ फक्त आंदोलनापुरताच आवाज उठवून थांबत नाही, तर तो नेहमीच जनसामान्यांच्या न्याय्य-हक्काकरता आपली लेखणी परजून सज्ज असतो. प्रामुख्यानं शेती आणि शेतकरी वर्गाच्या सर्वच समस्यांकडे त्याचं बारीक लक्ष असतं. काही चुकीचं वाटलं, तर त्याचा वेळीच समाचार घेण्यासही ‘पुढारी’ मागेपुढे पाहत नाही. असं करीत असताना कितीही राजकीय दबाव आला, तरी त्याला मी मुळीच भीक घालीत नाही. आपल्यामुळे सर्वसामान्यांना जर दिलासा मिळत असेल, तर आपण हातावर हात बांधून गप्प का बसायचं? हा प्रश्न मला अस्वस्थ करतो आणि मग मी एखाद्या योद्ध्याप्रमाणे रणांगणात उडी घेतो. आता असे लढे लढणे हे माझ्या अंगवळणीच पडलेलं आहे. कुठल्याही प्रश्नाची तड लागेपर्यंत मला मुळीच चैन पडत नाही.

अर्थात, या पाठीमागे माझ्या आबांचीही पुण्याई आहेच. आबांनीच तर मला समाजसेवेचं बाळकडू पाजलं. ‘बाळ, पत्रकार हा समाजसेवकच असतो. किंबहुना तो समाजसुधारक असतो,’ हा गुरुमंत्रच आबांनीच मला दिला. तो देत असताना, “ज्या दिवशी आपली सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ तुटेल, त्या दिवशी आपल्यात आणि एखाद्या धंदेवाईकात फरक राहणार नाही! आणि मग ती आपण उचललेल्या शिवधनुष्याशी प्रतारणा ठरेल,” असंही मला ठणकावून सांगितलं.

आबांनी माझ्यावर केलेले हे संस्कार मला गप्प बसू देत नाहीत. ते मला नेहमीच माझ्या कर्तव्याची जाणीव करून देत असतात. त्यामुळेच मी कायम सतर्क असतो आणि माझी ‘जागल्या’ची भूमिका निष्ठेनं पार पाडीत असतो. म्हणूनच ऊस दरवाढ असो, वा दूध उत्पादकांचा प्रश्न असो. शेतकरी-कष्टकरी वर्गाशी माझी बांधिलकी कायम असून, ती अतूट राहणार आहे, यात शंकाच नाही.

कारण शेतात राबराब राबून आपल्या तोंडात दोन घास घालणार्‍या शेतकरी बांधवांचं ऋण आणि गायीगुरांचं शेणमूत काढून, त्याच्या पाट्या उन्हापावसातून आपल्या माथ्यावरून वाहणार्‍या आमच्या आया-बहिणींच्या, ‘दुधाचे उपकार’ आपल्याला कधीच फेडता येणार नाहीत, याची जाण आणि भान मला कायम आहे आणि ते सदैव राहील.

‘अंधार्‍या रात्रीत कुणाच्या
हाती दीपक व्हावे,
उजळुनी त्यांची वाट सुखाने
हसत विझुनी जावे॥’
हेच माझं जीवनाविषयीचं तत्त्वज्ञान आहे.

Back to top button