आंतरराष्ट्रीय : ‘पार्टीगेट’च्या निमित्ताने…  | पुढारी

आंतरराष्ट्रीय : ‘पार्टीगेट’च्या निमित्ताने... 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान कार्यालयात केलेल्या दारू पार्ट्यांची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या महासंकटाशी झुंजताना अवघा देश गलितगात्र झालेला असताना देशाचे पंतप्रधान आपल्या शंभरेक मित्रांना निमंत्रण देऊन सरकारी कार्यालयात पार्टी करत असतील तर ते निश्चितच आक्षेपार्ह आहे. ब्रिटनच्या महान संसदीय लोकशाही परंपरेला यामुळे एक कलंक लागला आहे.

डॉ. जयदेवी पवार

भारतावर 150 वर्षे जुलमी राजवट गाजवूनही ब्रिटिशांच्या राहणीमानाचे, जीवनशैलीचे गोडवे आपल्याकडे आजही गायिले जातात. ब्रिटनच्या महाराणींविषयी, आपल्या घरच्या आजीविषयीही नसेल इतकी माहिती असणारे अनेक जण आपल्या देशात आहेत. ब्रिटिशांच्या शिष्टाचारांचा पगडा तर भारतीयांच्या विशेषतः बुद्धिजीवी वर्गातील लोकांवर प्रचंड असल्याचे दिसते. अशा परमोच्च आदर्श असणार्‍या ब्रिटनच्या पंतप्रधान महाशयांना दारू पार्टीमुळे पायउतार होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सात दशकांपूर्वी ब्रिटनचे दिवंगत पंतप्रधान विन्स्टन चर्चिल म्हणाले होते. ‘मुळात भारत हा एकसंध देश नाही. हा अनेक देशांचा समूह आहे. ब्रिटिश या देशातून गेल्यानंतर हा देश फुटेल.’ ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर हा देश फुटला नाही, उलट आशिया खंडातील सर्वाधिक काळ अखंडत्व टिकवून राहिलेली लोकशाही म्हणून भारताकडे संपूर्ण जग आज कौतुकाने पाहात आहे. भारतासोबत स्वतंत्र झालेल्या शेजारच्या अन्य देशांमध्ये लोकशाही शासनव्यवस्था आजही प्रस्थापित झालेली नाही. भारतीय लोकशाहीमध्ये अनेक उणिवा असतील, अपरिपक्वता असेल; पण या सर्वांना दूषणे देण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहे, असे मानून चालणार्‍या इंग्लंडच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीबाबत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्या थक्क करणार्‍या आहेत.

‘पार्टीगेट’ म्हणून चर्चिल्या जाणार्‍या या प्रकरणाबाबत इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाचे अध्यक्ष सर कियर स्टॉमर यांनी जेव्हा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची शाळा घेतली, त्यानंतर पंतप्रधानांची अवस्था वर्गामध्ये दंगा करणार्‍या विद्यार्थ्याने शिक्षकांचा ओरडा खाल्ल्यानंतर होतो तसा झाला होता. अर्थातच बोरिस जॉन्सन यांचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे.

संपूर्ण ब्रिटन जेव्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या महासंकटापुढे गुडघे टेकत होता, त्यावेळी देशवासीयांना या संकटातून बाहेर काढण्याची नैतिक जबाबदारी असणारे पंतप्रधान आपल्या कार्यालयात 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या लॉनवर दारू पार्टी करत होते. आपल्या सरकारी निवासस्थानी मित्रांना बोलावून त्यांनी दारू पार्टी आयोजित केली होती. पंतप्रधान जॉन्सन यांच्या खासगी सचिवाने पाठवलेला ई-मेल आता समोर आला आहे. जॉन्सन यांच्या सुमारे 100 मित्र आणि सहकार्‍यांना ई-मेल पाठवण्यात आला होता. या मेलमधून पार्टीमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकाला आपापले मद्य आणण्यास सांगण्यात आले होते. ही पार्टी 2020च्या ख्रिसमसमध्ये झाली.

यानंतर एप्रिल 2021 मध्ये संपूर्ण ब्रिटन प्रिन्स फिलिप यांच्या निधनामुळे शोकाकुल झाला होता. ब्रिटनचा राष्ट्रध्वज अर्धा झुकवण्यात आला होता. त्यांच्या अंत्यविधीवेळी ब्रिटनची राणी एलिझाबेथ एकटीच बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या छायाचित्रामुळे कोरोना महामारीची विदारकता आणि ब्रिटनमधील निर्बंध यावर चर्चा झाली होती. या अंत्यविधीला मोजक्याच लोकांना परवानगी होती. परंतु, या अंत्यविधीच्या आधी काही तास ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या घरी दारू पार्टी सुरू होती आणि डाऊनिंग स्ट्रीटवर मद्याचे एकामागून एक घोट रिचवत आनंद लुटला जात होता.

या पार्टीचा ‘इतिवृत्तांत’ डेली टेलिग्राफ आणि डेली मिरर या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाला असून त्यानुसार रात्री पार्टीचा कैफ जेव्हा सातवे आसमान पर गेला होता तेव्हा मद्य संपल्याचे लक्षात आले. अशा वेळी एका कर्मचार्‍याला रात्री सुटकेस घेऊन जवळच्या सुपर मार्केटमध्ये दारू आणण्यासाठी पाठवण्यात आले. इतकेच नव्हे तर पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांना मद्याची झिंग इतकी चढली होती की, त्यातील एक जण पंतप्रधानांच्या मुलासाठी बनवलेल्या झोपाळ्यावर चढला आणि त्याच्या वजनाने तो तुटलाही ! यावरून पार्टीतील सर्वांनाच थोडी जास्तच झाली होती, असे समजते.

या पार्टीकडे आणखी एका द़ृष्टिकोनातून पाहिले जात आहे, ते म्हणजे लॉकडाऊनच्या दबावाखाली असणार्‍या ब्रिटिश जनतेला घरामध्ये सुद्धा पार्टी करता येणार नाही, केल्याचे आढळल्यास 800 पाऊंडचा दंड आकारला जाईल, असे फर्मान गृहसचिव प्रीती पटेल यांनी काढले होते. सुरुवातीला हा दंड 200 पाऊंड इतका होता. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यावेळी केशकर्तनालय, वाचनालये, रेस्टॉरंट सर्व काही बंद करण्यात आले होते. लोकांना गळाभेट घेण्यासही मज्जाव करण्यात आला होता. पंतप्रधानांचा भारत दौराही रद्द करण्यात आला होता. अशा सर्व निर्बंधांच्या काळात पंतप्रधान कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दारू पार्टी आणि नाचगाण्याची मैफल रंगवली. त्यामुळेच आता चहूबाजूंनी जॉन्सन यांच्यावर टीका होत आहे. मजूर पक्षाचे नेते केर स्टार्मर यांनी देशाचे नेतृत्व करण्याची नैतिकता जॉन्सन यांनी गमावली आहे, असे म्हटले आहे.

बोरिस जॉन्सन यांची मागील काळात चर्चा रंगली ती त्यांच्या विवाहामुळे. 2019 मध्ये माध्यमांनी बोरिस जॉन्सन आणि कॅरी यांचे नाते जगासमोर आणले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये बोरिस यांनी आपण कॅरीसोबत साखरपुडा केला असल्याचे आणि कॅरी गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. बोरिस जॉन्सन हे 56 वर्षांचे आहेत, तर कॅरी या 33 वर्षांच्या आहेत. आता ‘पार्टीगेट’मुळे त्यांची पंतप्रधानपदाची खुर्ची धोक्यात येते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घटनात्मक पदांवर असणार्‍या व्यक्तींचे वर्तन अत्यंत जबाबदारीपूर्ण असले पाहिजे, असे संकेतच नाहीत, तर तसा दंडक आहे. इथे तर प्रश्न पंतप्रधान पदावरील व्यक्तीचा आहे. 2019 मध्ये जॉन्सन यांनी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय मिळवून पंतप्रधानपद स्वीकारले आहे. याचाच अर्थ जनतेने बहुमताने राज्यकारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. अशा वेळी परिस्थितीचे तारतम्य बाळगण्याची किमान अपेक्षा त्यांच्याकडून असणे यात गैर काहीच नाही. खरे पाहता ही बाब अत्यंत गंभीर आहे. हे गांभीर्य देशासमोर आल्यानंतर जॉन्सन यांनी आपली चूक मान्य करत माफीही मागितली आहे. पण सुरुवातीला त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. तथापि या पार्ट्यांचे व्हिडीओच समोर येऊ लागल्यामुळे आता पळवाटा बंद झाल्या आहेत हे लक्षात आल्याने कदाचित जॉन्सन यांना उपरती झाली असावी.

असो, घडला तो प्रकार अत्यंत निषेधार्हच होता, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता, याची आठवण जॉन्सन यांच्या या कृत्याने झाल्यावाचून राहात नाही. संसदीय लोकशाही ही इंग्लंडने जगाला दिलेली एक महान देणगी आहे. इंग्लंडच्या संसदीय लोकशाहीला प्रमाण मानून जगातील अन्य अनेक देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला आहे. इंग्लंडमधील संसदीय व्यवस्था ही सर्वांत जुनी व्यवस्था मानली जाते. अशी महान परंपरा असलेल्या देशाच्या मुख्य पदावरील व्यक्तीकडून बेजबाबदार वर्तणूक घडणे हा त्या परंपरेचा अपमान आहे. भारतासारख्या देशाला स्वातंत्र्य बहाल करताना आणि ते दिल्यानंतरही इथल्या लोकांना सदैव हीन लेखणार्‍या ब्रिटिशांनी ही बाब सदैव लक्षात ठेवावी की, गेल्या सात दशकांमध्ये इथल्या राज्यकर्त्यांच्या असंख्य चुका झाल्या असतील, निर्णयक्षमता कमी पडली असेल, द़ृष्टिकोन चुकले असतील; परंतु त्यांनी कधीच ही पातळी गाठली नाही.

Back to top button