

Gold Price Crash India: गेल्या दोन वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 2025 मध्ये तर सोन्याने विक्रमी झेप घेत अनेकांना आश्चर्यचकित केले. जानेवारी 2026 मध्ये मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल ₹1,80,779 या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र त्यानंतर चित्र बदलायला सुरुवात झाली. गेल्या आठवड्यात MCX वर सोन्याचा भाव ₹1,56,200 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला म्हणजेच उच्चांकापेक्षा सुमारे 13.5 टक्के घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारातही अशीच स्थिती आहे. COMEX वर सोन्याचा भाव डॉलर 5,626.80 प्रति औंस या उच्चांकावरून घसरून सध्या डॉलर 5,046 वर आला आहे. म्हणजेच जागतिक पातळीवरही सोन्याच्या तेजीला ब्रेक लागल्याचे संकेत मिळत आहेत.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या भावात प्रचंड वाढ होण्यामागे काही प्रमुख कारणं होती. यामध्ये जागतिक अनिश्चितता, अमेरिका-रशिया तणाव, टॅरिफ युद्ध आणि BRICS देशांची डॉलरविरोधी भूमिका. विशेषतः BRICS देशांनी अमेरिकन डॉलरवर अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. त्यामुळे मागणी वाढली आणि दर गगनाला भिडले. मात्र आता परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, रशिया पुन्हा अमेरिकेसोबत डॉलरमध्ये व्यापार करण्याचा विचार करत आहे. रशियाच्या अंतर्गत दस्तावेजांचा हवाला देत सांगण्यात आलं आहे की, मॉस्को अमेरिका–रशिया आर्थिक भागीदारीच्या शक्यतांचा विचार करत आहे. विशेष म्हणजे या व्यापार व्यवहारांची सेटलमेंट पुन्हा अमेरिकन डॉलरमध्ये करण्याचा विचार केला जात आहे. जर हे खरं ठरलं, तर BRICS देशांच्या ‘डी-डॉलरायझेशन’ प्लॅनला मोठा धक्का बसू शकतो.
BRICS गटात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश आहेत. या देशांनी गेल्या काही वर्षांत अमेरिकन डॉलरऐवजी सोनं किंवा स्थानिक चलनात व्यापार करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं.
2020 ते 2024 दरम्यान BRICS देशांच्या केंद्रीय बँकांनी जागतिक सोन्याच्या खरेदीत 50% पेक्षा जास्त वाटा होता. चीनने 2024 मध्ये 380 टन सोनं खरेदी केलं, तर रशियाने 340 टन. ब्राझीलने 2025 मध्ये 16 टन सोनं खरेदी केलं. या खरेदीमुळे सोन्याच्या पुरवठ्यावर ताण आला आणि दर वाढले.
जर रशिया पुन्हा डॉलरमध्ये व्यापार करू लागला, तर सोन्याची मोठ्या प्रमाणावर होणारी खरेदी थांबू शकते. काही केंद्रीय बँका सोनं विकायलाही सुरुवात करू शकतात. त्यामुळे मागणी-पुरवठ्याचं समीकरण बदलू शकतं.
PACE 360 चे तज्ज्ञ अमित गोयल यांच्या मते, सोन्याचा दर आधीच उच्चांकावर पोहोचला आहे आणि सध्या दिसणारी वाढ ही ‘डेड कॅट बाउन्स’ म्हणजेच तात्पुरती वाढ आहे. दीर्घकालीन घसरणीची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या मते, 2027 पर्यंत भारतात सोन्याचा भाव ₹90,000 ते ₹1,00,000 प्रति 10 ग्रॅम दरम्यान स्थिरावू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात COMEX दर डॉलर 3,000 प्रति औंसपर्यंत घसरू शकतो.
जानेवारी 2026 मधील अमेरिकेच्या महागाई आकडेवारीनंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे डॉलरला आधार मिळू शकतो. डॉलर मजबूत झाला तर सोन्यावर दबाव वाढतो.
सामान्यतः आर्थिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. पण 2008 च्या मंदीप्रमाणे काहीवेळा दीर्घकालीन सरकारी रोखे (Government Bonds) हे सोन्यापेक्षा अधिक सुरक्षित पर्याय मानले जात आहेत. त्यामुळे काही तज्ज्ञ दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 30–40 वर्षांच्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत.
सध्या सोन्याच्या दरात सुमारे 15% घसरण झाली आहे. ही घसरण आणखी वाढू शकते, पण ती एकदम होणार नाही. कधी कधी यात वाढ होईल, पण एकूण ट्रेंड घसरणीचा राहू शकतो. ज्यांनी उच्चांकावर सोनं खरेदी केलं आहे, त्यांनी घाबरून विक्री करण्यापेक्षा संयम बाळगणं महत्त्वाचं आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओच्या विविधीकरणावर भर द्यावा.
सोन्याच्या तेजीचं मुख्य कारण होतं, BRICS देशांची डॉलरविरोधी रणनीती आणि जागतिक अस्थिरता. जर रशिया पुन्हा डॉलरमध्ये व्यापार सुरू करत असेल, तर सोन्याच्या मागणीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आगामी काळात सोन्याचे दर 1 लाखांच्या खाली जाऊ शकतात, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र ही घसरण जागतिक राजकारण, अमेरिकेची अर्थनीती आणि BRICS देशांची पुढील भूमिका यावर अवलंबून राहील. सध्या मात्र सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ सुरू आहे आणि गुंतवणूकदारांनी सावध राहून निर्णय घ्यावा.