

Investment Strategy: सोन्या-चांदीच्या भावात गेल्या काही महिन्यांपासून वाढ होत होती. आता त्या तेजीला ब्रेक लागला आहे. दुसरीकडे शेअर बाजारातील अस्थिरता काही केल्या कमी होताना दिसत नाही. शुक्रवारी तर बाजारात मोठी घसरण झाली. अशा वातावरणात सामान्य गुंतवणूकदार गोंधळलेला आहे, पैसा कुठे गुंतवायचा? असा प्रश्न पडलेला आहे. सोनं-चांदी घ्यायचे की शेअर्स? की म्युच्युअल फंडच सुरक्षित? याच प्रश्नांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोत. याबद्दल DSP Mutual Fund चे एमडी आणि सीईओ कल्पेन पारेख काय म्हणाले आहेत ते पाहूया.
कल्पेन पारेख सांगतात, गुंतवणुकीचे निर्णय बातम्या पाहून घेणं ही सर्वात मोठी चूक असते. बाजारात एखादी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचते, तोपर्यंत बाजाराने आधीच त्यावर प्रतिक्रिया दिलेली असते. त्यामुळे रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःचं कौशल्य वाढवणं, नोकरी स्थिर ठेवणं आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्त्वाचं आहे.
त्यांच्या मते, खऱ्या अर्थाने मोठा परतावा हवा असेल तर शांत राहून शिस्तबद्ध गुंतवणूक करावी लागते. सोनं वाढलं म्हणून खरेदी आणि घसरलं म्हणून विक्री करायची, असा व्यवहार केल्यास फारसा फायदा होत नाही. उलट, जिथे सध्या कोणी जात नाही अशा ठिकाणी गुंतवणूक केल्यावरच दीर्घकाळात चांगले रिटर्न मिळतात.
भारतीय शेअर बाजाराबद्दल बोलताना ते सांगतात की, गेल्या पाच वर्षांत बाजाराने मोठी झेप घेतली होती. मात्र मागील एका वर्षात बाजार थोडा थंडावला आहे. आजही अनेक शेअर्स महागच आहेत. त्यामुळे पुढील काही काळात शेअर बाजारातून फार मोठे रिटर्न मिळतील अशी अपेक्षा ठेवू नये.
सोन्या-चांदीबाबतही त्यांनी स्पष्ट इशारा दिला. त्यांच्या मते, या धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम काळ दोन-तीन वर्षांपूर्वी होता. आज सोनं-चांदी सर्वत्र चर्चेत आहेत आणि जेव्हा एखादा गुंतवणूक पर्याय प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असतो, तेव्हा त्यात प्रचंड चढ-उतार होण्याची शक्यता वाढते.
ते म्हणतात, सोनं-चांदी अशी गुंतवणूक आहे जी दहा वर्षे काहीच परतावा देऊ शकत नाही आणि ती अचानक 60–70 टक्क्यांनी घसरूही शकते. त्यामुळे ज्यांनी अजिबात गुंतवणूक केली नाही त्यांनी एकूण पोर्टफोलिओपैकी फक्त 3 ते 5 टक्के रक्कम SIP द्वारे गोल्ड किंवा सिल्व्हरमध्ये लावावी. बाजार घसरला म्हणून थेट 10 टक्के पैसा सोन्यात टाकणं योग्य नाही. ज्यांना हे सगळं क्लिष्ट वाटतं त्यांनी मल्टी-अॅसेट फंडाचा पर्याय निवडावा, असंही ते सुचवतात.
यावर ते सांगतात बाजार जेव्हा घसरलेला असतो, तेव्हाच चांगल्या संधी तयार होतात. 2008 ते 2013 या काळात बाजार फारसा वाढला नव्हता, पण तरीही SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 9 ते 10 टक्के परतावा कमावला आहे. आज बॉन्ड यिल्ड सुमारे 7 टक्के आहे आणि महागाई 4 टक्क्यांच्या आसपास म्हणजेच प्रत्यक्ष फायदा अजूनही मिळतोय.
त्यांच्या मते, सध्या भारतीय आणि परदेशी कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स, मौल्यवान धातू अशा विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. बँकिंग शेअर्सही गेल्या काही वर्षांत फार चमकले नाहीत, पण आता त्यांचे मूल्यांकन सुधारत आहे. चांगला फंड मॅनेजर इथे संधी शोधू शकतो.
स्वतःच्या पोर्टफोलिओबद्दल बोलताना कल्पेन पारेख सांगतात की ते वारंवार बदल करत नाहीत. एखादा भाग खूपच वाढला तरच ते कमी करतात. सध्या त्यांच्या पोर्टफोलिओपैकी सुमारे 65 टक्के शेअर्समध्ये, 25 टक्के बॉन्ड्समध्ये आणि जवळपास 12 टक्के सोन्यात गुंतवलेले आहेत.
एकूणच, तज्ज्ञांचा सल्ला आहे की, गोंधळ असताना निर्णय घेऊ नका. बातम्यांपेक्षा शिस्त, संयम आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर भर द्या. बाजार वर-खाली होत राहतो, पण शांतपणे आणि योग्य पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्यालाच शेवटी फायदा होतो.
(नोंद - गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या)