

Petrol, Diesel and LPG Supply: जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेदरम्यान केंद्र सरकारने नागरिकांना महत्त्वाची सूचना केली आहे. सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, देशात इंधनाचा पुरवठा पुरेसा असून घाबरून खरेदी (पॅनिक बायिंग) करण्याची कोणतीही गरज नाही.
अमेरिका-ईरान तणावामुळे होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी भारतात पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा व्यवस्थित सुरू आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
सरकारने स्पष्ट केले की, घरगुती एलपीजी आणि पाइप्ड नॅचरल गॅस (PNG) पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
घरगुती वापर
रुग्णालये
अत्यावश्यक सेवा
या सर्व क्षेत्रांना पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
इंधन आणि गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई केली जात आहे.
3,700 हून अधिक छापे
सुमारे 1,000 नोटिसा
27 डीलर निलंबित
या कारवाईमुळे बाजारातील अनियमितता रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात सुमारे 51 लाख एलपीजी सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी 95% बुकिंग ऑनलाइन माध्यमातून झाल्या आहेत.
सरकारने नागरिकांना आश्वस्त करताना सांगितले की, देशभरातील पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. रिफायनऱ्या देखील पुरेशा कच्च्या तेलाच्या साठ्यासह कार्यरत आहेत.
जागतिक स्तरावर तणाव असला तरी भारतात इंधनाचा पुरवठा स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून खरेदी टाळावी आणि अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन सरकारने केले आहे.