Stock Market Closing Bell | नवे वर्ष, नवे शिखर! सेन्सेक्स, निफ्टीने तोडले सगळे रेकॉर्ड, गुंतवणूकदार २.७६ लाख कोटींनी श्रीमंत | पुढारी

Stock Market Closing Bell | नवे वर्ष, नवे शिखर! सेन्सेक्स, निफ्टीने तोडले सगळे रेकॉर्ड, गुंतवणूकदार २.७६ लाख कोटींनी श्रीमंत

पुढारी ऑनलाईन : नवीन वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीने मागील सर्वकालीन उच्चांक मोडून काढत नवे शिखर गाठले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ९६५ अंकांनी वाढून ७२,६६८० चा नवीन उच्चांक गाठला तर निफ्टी २१,९०० पार झाला. त्यानंतर सेन्सेक्स ८४७ अंकांनी वाढून ७२,५६८ वर बंद झाला. तर निफ्टी २४७ अंकांच्या वाढीसह २१,८९४ वर बंद झाला. सेन्सेक्स आज १.१८ टक्क्यांनी तर निफ्टी १.१४ टक्क्यांनी वाढला.

ऑटो आणि हेल्थकेअर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. आयटी निर्देशांक ५ टक्क्यांनी वाढला. रियल्टी आणि ऑईल आणि गॅस निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वधारले.

कमकुवत जागतिक संकेत आणि अपेक्षेपेक्षा जास्त अमेरिकेतील महागाईवाढीची आकडेवारी असताना आज भारतीय बाजारातील गुंतवणुकदारांचा मूड कमी झाला नाही. आयटी क्षेत्रातील मोठ्या तेजीमुळे निफ्टीने आज शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात नवीन विक्रमी उच्चांक गाठला. तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस आणि टीसीएस कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे आयटी शेअर्स आज तेजीत राहिले. निफ्टीने आजच्या सत्रात २१,९०० चा टप्पा ओलांडला.

बाजार भांडवल ३७३.२४ लाख कोटींवर

आजच्या रेकॉर्डब्रेक तेजीमुळे BSE वर सूचीबद्ध सर्व स्टॉक्सचे बाजार भांडवल २.७६ लाख कोटी रुपयांनी वाढून ३७३.२४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. डॉलरमध्ये मोजल्यास भारतीय शेअर बाजाराची सध्याची उलाढाल सुमारे ४.४९ ट्रिलियन आहे आणि हाँगकाँगला मागे टाकून भारतीय शेअर बाजार जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार म्हणून पुढे येत आहे.

संबंधित बातम्या 

इन्फोसिस टॉप गेनर

सेन्सेक्स आज ७२,१४८ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७२,७२० च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. सेन्सेक्सवर इन्फोसिसचा शेअर्स टॉप गेनर्स ठरला. हा शेअर्स दुपारच्या सत्रात ७.८७ टक्क्यांनी वाढून १,६१२ रुपयांवर पोहोचला. टेक महिंद्राचा शेअर्स सुमारे ५ टक्क्यांनी वाढून १,३११ रुपयांवर गेला. विप्रो, टीसीएस प्रत्येकी ४ टक्क्यांनी वाढले. एचसीएल टेक ३ टक्क्यांनी वाढला. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एलटी, भारती एअरटेल, कोटक बँक हे १ ते २ टक्क्यांदरम्यान वाढले. बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक, पॉवर ग्रिड या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. (Stock Market Closing Bell)

एनएसई निफ्टी ५० निर्देशांक आज २१,७७३ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २१,९२८ च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. निफ्टीवर इन्फोसिस, ओएनजीसी, टेक महिंद्रा, LTIMINDTREE, टीसीएस हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. तर अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट हे टॉप लूजर्स होते.

लेक्सडेल इंटरनॅशनलने ब्लॉक डीलद्वारे कंपनीचे २.६२ कोटी शेअर्स विकले असल्याच्या वृत्ताने Nykaa चे शेअर्स आज २.५ टक्क्यांनी घसरले.

हाय-टेक तेजीमागे होते ‘हे’ ५ घटक

१. IT शेअर्स तेजीत

क्षेत्रीय आघाडीवर इन्फोसिस आणि टीसीएसच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कमाई निकालानंतर निफ्टी आयटी निर्देशांक ४ टक्क्यांनी वाढला. आयटी शेअर्समध्ये आज मोठ्या प्रमाणात खरेदीचा जोर दिसून आला. आयटीमधील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे शेअर्स (Infosys Share Price) बीएसईवर सुमारे ७ टक्क्यांनी वाढून १,६१२ रुपयांवर पोहोचले. इन्फोसिसच्या शेअर्समधील आजची तेजी ही १६ जुलै २०२० नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी होती.

२. PSU बँक आणि रियल्टीमध्ये खरेदीचा जोर

निफ्टी पीएसयू बँक, मीडिया, मेटल आणि रियल्टीनेदेखील उच्च पातळीवर व्यवहार केला. हे दोन्ही निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी वाढले. PSU बँकांमध्ये बँक ऑफ इंडियाचा शेअर्स ५ टक्क्यांनी टॉप गेनर ठरला. युनियन बँक, महाराष्ट्र बँक आणि पंजाब अँड सिंध बँक शेअर्समध्येही ४ ते ५ टक्क्यांनी वाढ दिसून आली.

३. जागतिक बाजार

अपेक्षेपेक्षा जास्त महागाईमुळे अमेरिकेतील शेअर बाजारात काल थोडासा बदल झाला. तर आज आशियाई बाजारातील निर्देशांक किरकोळ वाढले. चीनचा ब्लू चिप्स आणि हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक दोन्ही ०.१ टक्क्यांनी खाली आले. तर जपानचा Nikkei निर्देशांक ३४ वर्षाच्या नव्या शिखरावर पोहोचला.

४. परदेशी गुंतवणूकदार

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी ८६५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,६०७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

५. कच्चे तेल

अमेरिका आणि ब्रिटनने लाल समुद्रात जहाजांवर इराण समर्थक गटाने केलेल्या हल्ल्यांला प्रत्युत्तर म्हणून येमेनमधील हुथी बंडखोरांच्या लष्करी ठिकाणांवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत. यामुळे शुक्रवारी तेलाच्या किमती २ टक्क्यांहून अधिक वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स २.३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७९.२२ डॉलरवर गेले. तर US वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्यूचर्स २.५ टक्क्यांनी वाढून ७३.८२ डॉलरवर होते.

हे ही वाचा :

Back to top button