Gautam Adani | मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती | पुढारी

Gautam Adani | मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : अब्जाधीश गौतम अदानी (Billionaire Gautam Adani) हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तसेच जगातील अब्जाधीशांच्या यादीत अदानींनी १२ व्या स्थानांवर झेप घेतली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या ताज्या अपडेटमधून ही माहिती मिळाली आहे. हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका दिवसात ७.६७ अब्ज डॉलर्सची कमाई करून गौतम अदानींची संपत्ती ९७.६ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर मुकेश अंबांनींची संपत्ती ९७ अब्ज डॉलर एवढी आहे.

६१ वर्षीय गौतम अदानी यांच्या संपत्तीत २०२४ मध्ये आतापर्यंत १३.३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या वर्षातील काही सत्रांमध्ये ६६५ दशलक्ष डॉलर इतकी माफक वाढ झाली आहे. मुकेश अंबानी जगातील अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या स्थानांवरून १३ व्या स्थानी गेले आहेत.

अदानी समूहाचे मालक गौतम अदानी एकेकाळी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत होते. त्यांची संपत्ती सप्टेंबर २०२२ च्या मध्यावधीत सुमारे १४९ अब्ज डॉलर्सच्या उच्चांकावर पोहोचली होती. पण जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकेची शॉर्ट सेलिंग संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने एक धक्कादायक अहवाल समोर आणला. हिंडेनबर्गने २४ जानेवारी २०२३ रोजी अदानी उद्योग समुहावर शेअर्समध्ये फेरफार केल्याचा तसेच कंपन्यांच्या ताळेबंदात गडबड असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे अदानी समूहाच्या बाजार भांडवलात १५० अब्ज डॉलरची घसरण झाली. ब्लूमबर्गच्या मते, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अदानींची वैयक्तिक संपत्ती ३७.७ अब्ज डॉलरने इतकी कमी झाली होती. हिंडेनबर्ग अहवालाच्या एक दिवस आधी ते जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती होते.

त्यानंतर अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळले. सर्वोच्च न्यायालयाने नंतर मार्च २०२२ मध्ये सेबीला या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले. नंतर हिंडेनबर्गच्या निष्कर्षांच्या बाजूने काही इतर अहवाल समोर आले. ज्यात OCCRP चा समावेश आहे. सेबीने नंतर तपशील मिळविण्यासाठी ओसीसीआरपीशी संपर्क साधला. पण त्याला नकार देण्यात आला.

हे ही वाचा :

Back to top button