Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ७२७ अंकांनी वाढला, निफ्टी २०,१०० जवळ, गुंतवणूकदार ४.५ लाख कोटींनी श्रीमंत | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ७२७ अंकांनी वाढला, निफ्टी २०,१०० जवळ, गुंतवणूकदार ४.५ लाख कोटींनी श्रीमंत

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातील तेजीचा मागोवा घेत आणि यूएस फेडरल रिझर्व्हने आगामी वर्षात व्याजदर कपातीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी (दि.२९) शेअर बाजाराने मोठी झेप घेतली. सेन्सेक्स आज ७२७ अंकांनी वाढून ६६,९०१ वर बंद झाला. तर निफ्टीने २० हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टी २०६ अंकांनी वाढून २०,०९६ वर बंद झाला. आजच्या ट्रेडिंग सत्रातील सेन्सेक्सची वाढ ही १.१० टक्क्यांची तर निफ्टी १.०४ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Closing Bell)

आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी राहिली. यामुळे दोन दिवसांत गुंतवणूकदारांना ४.५ लाख कोटींचा फायदा झाला आहे. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३३३.२० लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या २४ नोव्हेंबर बाजार बंद झाल्यानंतर बाजार भांडवल ३२८.७१ लाख कोटी होते.

संबंधित बातम्या 

रियल्टी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. ऑटो, बँक, आयटी, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला.

निफ्टी २० हजार पार

NSE निफ्टी ५० ने २० सप्टेंबर २०२३ नंतर पहिल्यांदाच आज २० हजारांचा टप्पा ओलांडला. आज बहुतांश व्यापक आणि क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. बँक निफ्टी ६०० अंकांनी वाढून ४४,४८१ वर पोहोचला. जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आणि एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि रिलायन्स या हेवीवेट शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.

ॲक्सिस बँक टॉप गेनर

सेन्सेक्सवर ॲक्सिस बँकेचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ४ टक्के वाढून १,०६१ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर एम अँड एमचा शेअर ३.४४ टक्के वाढून १,६१९ रुपयांवर गेला. विप्रो, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक इन्फोसिस, कोटक बँक हे शेअर्स १ ते २.४० टक्क्यांदरम्यान वाढले. दरम्यान, नेस्ले इंडिया, टायटन, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स किरकोळ घसरले.

जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने काउंटरवर प्रत्येकी २,८१० रुपयांच्या टार्गेट किंमतीसह ‘ओव्हरवेट’ रेटिंग दिल्यानंतर रिलायन्सचे शेअर्स वाढले.

टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअर्सने १२ वर्षानंतर ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला. या शेअर्सने आज १.८८ टक्के वाढीसह ७१० रुपयांवर व्यवहार केला.

‘हे’ घटक ठरले बाजारातील तेजीसाठी महत्त्वाचे

जागतिक बाजारातील उत्साही वातावरणामुळे आशियाई बाजारातील निर्देशांकांनी एक आठवड्याचा उच्चांक गाठला. अमेरिकेच्या १० वर्षांच्या बाँड यिल्डमध्ये ४.३ टक्क्यांची घसरण आणि डॉलर निर्देशांक १०३ च्या खाली घसरणे हे देशांतर्गत बाजारांच्या वाढीसाठी महत्त्वाचे घटक ठरले. (Stock Market Closing Bell)

BSE बाजार भांडवलाने ओलांडला ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा

दरम्यान, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने पहिल्यांदाच विक्रमी ४ ट्रिलियन डॉलरचा ($4 trillion) टप्पा पार केला. २९ नोव्हेंबरपर्यंत सर्व बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (market capitalisation) ४.०१ ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ३३३ ट्रिलियन रुपयांवर गेले. जे वर्षाच्या सुरूवातीपासून सुमारे ६०० अब्ज डॉलरने वाढले आहे. जागतिक बाजारांवर नजर टाकल्यास भारतीय शेअर बाजार मूल्याच्या दृष्टीने पाचव्या स्थानी आहे. सर्वाधिक बाजार भांडवलात अमेरिका (४७ ट्रिलियन डॉलर), चीन (९.७ ट्रिलियन डॉलर), जपान (५.९ ट्रिलियन डॉलर) आणि हाँगकाँग (४.८ ट्रिलियन डॉलर) नंतर भारतीय शेअर बाजाराचा नंबर लागतो.

हे ही वाचा :

 

Back to top button