

डॉ. नानासाहेब थोरात
हंता व्हायरस हा विषाणूंचा एक वंश आहे, जो मानवांमध्ये रोग निर्माण करू शकतो. हे विषाणू संक्रमित उंदरांच्या उत्सर्जनातून तयार होणार्या सूक्ष्म कणांच्या श्वसनाद्वारे पसरतात आणि रक्तस्रावजन्य तसेच फुफ्फुसांशी संबंधित विविध लक्षणे निर्माण करतात. एप्रिल 2026 मध्ये, डच क्रूझ जहाज एमव्ही हौंडीजवर अँडीज व्हायरसमुळे झालेल्या हंता व्हायरस संसर्गाचा उद्रेक ओळखण्यात आला आणि जगाचे लक्ष पुन्हा या विषाणूकडे गेले.
जगाला हंता व्हायरसचा इतिहास 1950 च्या कोरियन युद्धादरम्यान ओळखल्या गेलेल्या साथीच्या उद्रेकांपासून माहीत झाला. 1978 मध्ये कोरियन हेमोरॅजिक फिव्हरला कारणीभूत विषाणू दक्षिण कोरियातील हंतान नदीजवळ आढळलेल्या अॅपोडिमस अॅग्रारियस या संक्रमित लहान शेतउंदरामधून वेगळा करण्यात आला. त्या नदीच्या नावावरून या विषाणूला हंता म्हणजेच हंतान व्हायरस असे नाव देण्यात आले. या विषाणूचा शोध कोरियन युद्धानंतर (1951-1953) सुरू झालेल्या वैज्ञानिक संशोधनांमधून लागला. कारण, त्या काळात संयुक्त राष्ट्राच्या सैन्यात कोरियन हेमोरॅजिक फिव्हरची 3000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली होती.
पुढे जाऊन 1993 मध्ये अमेरिकेतील युटा, कोलोरॅडो, अॅरिझोना आणि न्यू मेक्सिको यांच्या सीमेवरील नेटिव्ह अमेरिकन प्रदेशात एका गूढ साथीच्या रोगाच्या उद्रेकामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. न्यू मेक्सिको राज्यामधील एका तरुण दाम्पत्याच्या रहस्यमय मृत्यूनंतर तेथील आरोग्य कर्मचार्यांना त्याचे कारण ओळखण्यात अडचणी आल्या. त्याचदरम्यान त्यांना या प्रदेशातील आणखी डझनभर रुग्णांमध्ये समान लक्षणे आढळल्याचे लक्षात आले. नंतर असे आढळून आले की, हंता व्हायरसची एक नवीन प्रजाती उदयास आली होती. तिला सिन नोम्ब्रे व्हायरस (स्पॅनिश भाषेत नाव नसलेला) असे नाव देण्यात आले आणि यामुळे अखेरीस 13 लोकांचा मृत्यू झाला. हा उद्रेक आता 1993 फोर कॉर्नर्स उद्रेक म्हणून ओळखला जातो आणि आणि तिथूनच हंता व्हायरसच्या उत्क्रांतीबद्दल जागतिक तज्ज्ञांना चिंता वाढली.
हंता व्हायरस हा विषाणूंचा एक वंश आहे, जो मानवांमध्ये रोग निर्माण करू शकतो. हे विषाणू संक्रमित उंदरांच्या उत्सर्जनातून तयार होणार्या सूक्ष्म कणांच्या श्वसनाद्वारे पसरतात आणि रक्तस्रावजन्य तसेच फुफ्फुसांशी संबंधित विविध लक्षणे निर्माण करतात. हंतान ऑर्थोहंता व्हायरस आणि डोब्रावा-बेलग्रेड ऑर्थो हंता व्हायरस यांसारख्या काही प्रजाती जगातील विविध भागांत अनेक शतकांपासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे, तर सिन नोम्ब्रे व्हायरस आणि अँडीज व्हायरस या प्रजाती 1990 च्या दशकात वेगळ्या ओळखल्या गेल्या. 1996 मध्ये, पहिल्यांदाच अर्जेंटिनामध्ये झालेल्या उद्रेकाने व्यक्तीकडून व्यक्तीकडे होणार्या संक्रमणाची पहिली घटना नोंदवली. जुन्या आणि नव्या जगातील विषाणूंमधील हा फरक आजारपण, मृत्यूदर आणि महामारी बनण्याच्या शक्यतेच्या द़ृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. हंता व्हायरसचा मानवाकडून मानवाकडे प्रसार फारच दुर्मीळ असला, तरीही साथीचे उद्रेक सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय राहतात. विशेषतः घरगुती संसर्ग आणि रुग्णालयांमधील प्रसाराच्या धोक्यामुळे, जिथे संक्रमण रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये पसरते.
एप्रिल 2026 मध्ये डच क्रूझ जहाज एमव्ही हौंडीजवर अँडीज व्हायरसमुळे झालेल्या हंता व्हायरस संसर्गाचा उद्रेक ओळखण्यात आला आणि जगाचे लक्ष पुन्हा या विषाणूकडे गेले. 13 मेपर्यंत या उद्रेकाशी थेट संबंधित आठ प्रकरणे, एक निष्कर्ष न लागलेले प्रकरण आणि दोन संशयित प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे जहाज 1 एप्रिल रोजी अर्जेंटिनातील उशुआया येथून निघाले होते. 11 एप्रिल रोजी एका प्रवाशाचा या विषाणूमुळे जहाजावर मृत्यू झाला. त्याचा मृतदेह 24 एप्रिल रोजी सेंट हेलेना येथे किनार्यावर नेण्यात आला. तिथे 30 प्रवासी उतरले होते. त्यामध्ये त्यांची पत्नीही होती, जिचा दोन दिवसांनी जोहान्सबर्गमधील रुग्णालयात मृत्यू झाला. जहाजावर आणखी दोन प्रवाशांचा अनुक्रमे 26 आणि 28 एप्रिल रोजी मृत्यू झाला. एका ब्रिटिश प्रवाशाला 2 मे रोजी गंभीर पण स्थिर अवस्थेत उपचारासाठी जोहान्सबर्ग येथे पाठविण्यात आले. जागतिक आरोग्यअधिकार्यांच्या माहितीनुसार, यावर्षी अर्जेंटिनामध्ये हंता व्हायरसची 100 हून अधिक प्रकरणे आणि 30 पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले आहेत.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनांनुसार, ज्यांच्या शरीरात विषाणूचे प्रमाण जास्त होते, अशा रुग्णांकडून इतर लोकांमध्ये विषाणू पसरण्याची शक्यता अधिक होती. तसेच, मोठ्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये किंवा संक्रमित व्यक्तीशी दीर्घकाळ आणि जवळचा संपर्क आल्यास संक्रमण होण्याची शक्यता जास्त असल्याचे आढळले.
1993 ते 2023 पर्यंत या विषाणूची काही प्रकरणे जगभरात वाढली होती.
अमेरिका : अंदाजे 890 एकूण प्रकरणे. हा अत्यंत दुर्मीळ आजार असून देशभरात दरवर्षी सुमारे 20-30 प्रकरणे नोंदवली जातात.
कॅनडा ः अंदाजे 150 एकूण प्रकरणे. मुख्यतः पश्चिमेकडील प्रांतांमध्ये आढळतात.
दक्षिण अमेरिका : दरवर्षी 200-300 प्रकरणे. ब्राझील आणि अर्जेंटिना यांसारख्या प्रदेशांमध्ये हा आजार स्थानिक आहे. येथे मृत्यूदर तुलनेने जास्त असतो.
चीन आणि पूर्व आशिया : दरवर्षी 100,000 हून अधिक प्रकरणे. जगातील सर्वाधिक भार या प्रदेशावर आहे आणि जागतिक संसर्गांचा बहुतांश भाग येथे आढळतो.
युरोप : दरवर्षी दोन ते चार हजार प्रकरणे आढळतात. मध्य आणि उत्तर युरोपमध्ये लहान उद्रेकांचे समूह दिसतात, जे उंदरांच्या लोकसंख्येच्या चक्रांनुसार बदलतात.
दक्षिण-पूर्व आशिया आणि भारत : अधूनमधून आढळणारी प्रकरणे. उंदरांच्या लोकसंख्येमध्ये विषाणू उपस्थित असला, तरी मानवांमध्ये नोंदवलेली प्रकरणे पूर्व आशियाच्या तुलनेत फारच कमी आहेत.
या विषाणूमुळे होणार्या आजाराची लक्षणे इतर विषाणूजन्य आजारांसारखीच असतात: ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आणि अतिसार. संसर्ग पुढे वाढला, तर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि फुफ्फुसांमध्ये द्रव साचू शकतो.
या विषाणूमुळे होणार्या संसर्गाचे निदान करणे कठीण ठरते. कारण, त्यासाठी विशिष्ट अशी चाचणी उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर सामान्यतः रुग्णाचा उंदरांशी संपर्काचा इतिहास, त्यासोबत ताप आणि थकवा यांसारखी लक्षणे यांचा आधार घेऊन निदान करतात. लक्षणांची इतर आजारांशी साधर्म्यता आणि विशिष्ट चाचणीचा अभाव यामुळे हा आजार ओळखणे अवघड होते. तसेच, तो एखादा रुग्ण अशी काही लक्षणे घेऊन आला, तर डॉक्टरांच्या मनात सर्वप्रथम येणार्या शक्यतांपैकी नसतो. बहुतेक सौम्य आजाराची प्रकरणे आणि ज्यांची रोगप्रतिक्रार शक्ती चांगली आहे, असे रुग्ण स्वतःहून बरे होऊ शकतात; परंतु सामान्यतः सहायक उपचार आवश्यक असतात आणि ते रुग्णाच्या बरे होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये द्रव साचू लागला, तर त्याला श्वसनयंत्राची मदत लागू शकते किंवा अतिदक्षता विभागात ठेवून सहायक उपचार दिले जाऊ शकतात. सध्या या आजारासाठी कोणताही ठरावीक विशिष्ट उपचार प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले नाहीत; पण यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून तातडीचे प्रयत्न चालू आहेत.
हा विषाणू सर्वाधिक वेळा हवेमार्फत पसरतो. त्यामुळे संसर्ग रोखताना ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती उंदरांच्या विष्ठा असलेल्या भागात असेल, तर तो भाग ओला करणे ज्यामुळे हवेत उडणारे सूक्ष्म कण कमी होतात. विशेषतः जेव्हा साफसफाईदरम्यान विषाणू जास्त पसरण्याची शक्यता जास्त असते. हे काम घरगुती निर्जंतुकीकरण द्रव्ये, ब्लीच किंवा अल्कोहोल वापरून करता येते. तसेच त्या भागात हवा खेळती ठेवणेही महत्त्वाचे आहे. खिडक्या आणि दरवाजे उघडून ताजी हवा फिरू देणे उपयुक्त ठरते. हंता व्हायरस हा अनेक विषाणूंमध्ये एक आहे, जो प्राण्यांच्या मलमूत्र असलेल्या भागांमध्ये आढळू शकतो. म्हणूनच जिथे जंगली प्राण्यांची विष्ठा किंवा मृत प्राणी हाताळावे लागतात, अशा ठिकाणी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. अशा भागांची साफसफाई करताना व्यवस्थित बसणारा एन 95 मास्क वापरणे आवश्यक आहे; जेणेकरून विषाणू वाहून नेणारे सूक्ष्म कण फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नयेत.
हंता व्हायरस संसर्गाचा मृत्यूदर आशिया आणि युरोपमध्ये साधारणपणे एक ते दीड टक्का इतका असून, अमेरिकेत तो 50 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. हंता व्हायरससाठी सध्या कोणतेही उपचार किंवा लस उपलब्ध नाही; मात्र लवकर दिली जाणारी सहायक काळजी आणि संपूर्ण आयसीयू सुविधा असलेल्या रुग्णालयात त्वरित उपचारासाठी हलवणे यामुळे रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. पर्यावरणीय आणि पर्यावरणशास्त्रीय घटक उंदरांच्या लोकसंख्येवर परिणाम करत असल्यामुळे या रोगाचे हंगामी स्वरूप बदलू शकते. कारण, हंता व्हायरसचे नैसर्गिक साठे आणि उगमस्थान वन्य उंदीर असल्यामुळे त्यांच्या अधिवासाशी संपर्क येतो तेव्हाच लोकांना संसर्ग होऊ शकतो.
सध्यातरी यावर कोणतेही अधिकृत उपचार नसल्यामुळे सार्वजनिक आरोग्य जागरूकता मोहिमा, लवकर निदान, वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यावर आणि संसर्गाच्या संपर्काचा धोका कमी करण्यावर केंद्रित असाव्यात असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये कामाशी संबंधित तसेच इकोटुरिझमशी संबंधित जोखमींचा विचार केला पाहिजे. संक्रमण प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांवर भर देणे तसेच उंदरांवर नियंत्रण ठेवण्याच्या रणनीतींचा समावेश करणे आवश्यक आहे.