

World Lung Cancer Day 2025
1 ऑगस्ट जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन, या गंभीर आजाराविषयी आणि त्याच्या धोक्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. फुफ्फुसाचा कर्करोग म्हटले की तो केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो, असा एक मोठा गैरसमज आहे. मात्र, धक्कादायक वास्तव हे आहे की, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत असून, हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर, या विशेष दिनानिमित्त आपण कोल्हापूरचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. नचिकेत कुलकर्णी (एम.डी. मेडिसिन) यांच्याकडून जाणून घेणार आहोत की, धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग का होतो आणि त्यामागे कोणती प्रमुख कारणे आहेत.
फक्त सिगरेट-बीडी न ओढणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. त्याची काही मुख्य कारणे अशी आहेत:
पॅसिव्ह स्मोकिंग (दुसऱ्यांच्या धूराचा संपर्क)
रेडॉन वायूचा प्रदूषण
व्यवसायिक धोकादायक द्रव्यांचा संपर्क (जसे की एस्बेस्टॉस, सिलिका)
वंशपरंपरागत किंवा अनुवांशिक घटक
वातावरणातील इतर प्रदूषक
कोल्हापूर (महाराष्ट्र) मध्ये फुफ्फुसाचा कर्करोग हा पुरुषांमध्ये प्रमुख कॅन्सर प्रकारांपैकी एक आहे.
एका अभ्यासानुसार, 2019 मध्ये कोल्हापूर कॅन्सर सेन्टरमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण पुरुषांमध्ये सुमारे 5.1% आणि महिलांमध्ये अंदाजे 3.1% होते
हे प्रमाण महाराष्ट्र व जवळील जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी असले तरी प्रकाशित डेटानुसार फुफ्फुसाचा कर्करोग हा महत्त्वाचा आरोग्यविषय आहे, विशेषतः तंबाखू/धूम्रपान व औद्योगिक प्रदूषणाच्या संपर्कामुळे झाल्याचे समोर येते
पॅसिव्ह स्मोकिंग (Second-hand Smoke) तुम्ही स्वतः धूम्रपान करत नसाल, पण तुमच्या आजूबाजूला, घरात किंवा कार्यालयात कोणी धूम्रपान करत असेल, तर तो धूर तुमच्या श्वासावाटे फुफ्फुसात जातो. याला 'पॅसिव्ह स्मोकिंग' म्हणतात. सिगारेटच्या धुरातील ७० पेक्षा जास्त विषारी घटक धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या फुफ्फुसांनाही तितकेच नुकसान पोहोचवतात आणि यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका २०-३०% ने वाढतो.
वायू प्रदूषण वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली आहे. वाहनांमधून आणि कारखान्यांमधून निघणारा विषारी धूर, धुळीचे सूक्ष्म कण (PM2.5) श्वासावाटे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. धूरामध्ये 5,000 पेक्षा जास्त घातक रसायने आणि 70 हून अधिक कॅन्सरकारक घटक असतात. हे विषारी कण फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहोचवून कर्करोगाला निमंत्रण देऊ शकतात.
रेडॉन वायूचा संपर्क रेडॉन हा एक नैसर्गिकरित्या आढळणारा अदृश्य आणि गंधहीन किरणोत्सर्गी वायू आहे. तो जमिनीतून, खडकांमधून आणि बांधकाम साहित्यातून घरात प्रवेश करू शकतो, विशेषतः तळमजल्यावर किंवा बेसमेंटमध्ये. या वायूच्या सतत संपर्कात राहिल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. धूम्रपानानंतर हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दुसरे सर्वात मोठे कारण मानले जाते. दीर्घकाळ रेडॉनच्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो काही अभ्यासात मृत्यूंपैकी 6%-14% कारण रेडॉन असे दिसते
कामाच्या ठिकाणचे धोके (Occupational Hazards) काही विशिष्ट उद्योग आणि व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या लोकांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. बांधकाम, खाणकाम, वेल्डिंग किंवा काही कारखान्यांमध्ये एस्बेस्टोस (Asbestos), आर्सेनिक, सिलिका, डिझेलचा धूर आणि इतर रसायनांच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसांना गंभीर इजा होऊ शकते, जी पुढे कर्करोगात बदलू शकते.
अनुवंशिकता आणि कौटुंबिक इतिहास जर तुमच्या कुटुंबात, विशेषतः जवळच्या नातेवाईकांना (आई, वडील, भाऊ, बहीण) फुफ्फुसाचा कर्करोग झाला असेल, तर तुम्हालाही त्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असू शकतो. काही विशिष्ट जनुकीय बदल (Genetic Mutations) कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. अशा व्यक्तींनी अधिक सावध राहणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
थोडक्यात, फुफ्फुसाचा कर्करोग केवळ धूम्रपानाशी संबंधित नाही, तर आपली जीवनशैली, पर्यावरण आणि अनुवंशिकता यावरही अवलंबून आहे. त्यामुळे, छातीत दुखणे, दीर्घकाळ चालणारा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा वजनात अचानक घट यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे, हाच या गंभीर आजारापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
फुफ्फुसाच्या कर्करोगाची काही मुख्य लक्षणे:
तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा (किंवा वाढत जाणारा) खोकला
खोकताना रक्त येणे
छातीत वेदना/श्वास घेताना किंवा खोकताना दुखणे
श्वास लागणे (शॉर्टनेस ऑफ ब्रीथ)
वजनात अचानक घट, भूक मंदावणे, थकवा
निमोनिया किंवा फुफ्फुसाचे इन्फेक्शन वारंवार होणे
आवाज बसणे, छातीत/खांद्यावर किंवा पाठीत सतत वेदना
फिंगर क्लबिंग ( बोटांच्या टोकाचा आकार बदलणे )
वरीलपैकी कुठलीही लक्षणे असतील, तर त्वरीत श्वसनविकार/कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
"फुफ्फुसांच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हा आजार आता केवळ वैयक्तिक सवयींपुरता मर्यादित राहिलेला नाही. जर तुमच्या घरात कोणी धूम्रपान करत असेल किंवा कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असेल, तर तुमचा धोका नकळतपणे वाढतो. त्यामुळे, केवळ धूम्रपान टाळून आपण सुरक्षित आहोत, या भ्रमात न राहता आपल्या आजूबाजूच्या प्रदूषित वातावरणाबद्दलही तितकेच जागरूक राहणे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे."
- डॉ. नचिकेत कुलकर्णी, एम.डी. मेडिसिन, कोल्हापूर