

डॉ. सम्यक पंचोली
खांद्याच्या स्नायूंना हाडांशी जोडणार्या कंडरांमध्ये (टेंडन्स) जेव्हा कॅल्शियमचे साठे जमा होतात, तेव्हा त्याला ‘कॅल्सिफिक टेंडोनाइटिस’ असे म्हणतात. ही स्थिती फारशी सामान्य नसली, तरी जेव्हा या भागात दाह किंवा सूज निर्माण होते, तेव्हा रुग्णाला तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते.
मानवी शरीरातील सांध्यांच्या हालचालीत स्नायूंना हाडांशी जोडणार्या ‘टेंडन्स’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, जेव्हा या कंडरांमध्ये कॅल्शियमचे साठे जमा होऊ लागतात, तेव्हा त्या स्थितीला ‘कॅल्सिफिकटेंडोनाइटिस’ असे संबोधले जाते. ही व्याधी प्रामुख्याने खांद्याच्या सांध्यामध्ये, विशेषतः ‘रोटेटर कफ’ या स्नायूंच्या समूहात अधिक प्रमाणात दिसून येते. जरी ही समस्या कोणत्याही वयोगटात उद्भवू शकत असली, तरी 40 ते 60 वयोगटातील व्यक्तींमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते.
हा आजार प्रामुख्याने सुप्रास्पिनाटस टेंडन (खांद्याचा एक महत्त्वाचा स्नायू) मध्ये होतो. वैद्यकीय संशोधनानुसार, याचे दोन मुख्य सिद्धांत मांडले जातात. एक म्हणजे वयोमानानुसार रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पेशी मृत पावतात आणि तिथे कॅल्शियम साचते. दुसरा म्हणजे यामध्ये पेशींचे स्वरूप बदलून तिथे जाणीवपूर्वक कॅल्शियमचे थर साचतात.
कॅल्सिफिक टेंडोनाइटिस ही प्रक्रिया अचानक घडणारी नसून ती तीन प्रमुख टप्प्यांतून जाते.
पहिल्या टप्प्याला ‘प्री-कॅल्सिफिक’ अवस्था म्हणतात, ज्यामध्ये पेशींच्या पातळीवर बदल होऊन सांध्याची हालचाल मर्यादित होऊ लागते.
दुसर्या टप्प्यात, ज्याला ‘कॅल्सिफिकस्टेज’ म्हटले जाते, प्रत्यक्षात कॅल्शियमचे कण साचून साठे तयार होतात. या टप्प्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनादायक काळ म्हणजे जेव्हा शरीर या साठ्यांचे पुन्हा शोषण (रीअॅबसॉर्प्शन) करू लागते.
तिसर्या आणि अंतिम ‘पोस्ट-कॅल्सिफिक’ टप्प्यात, कॅल्शियमचे साठे निघून जाऊन त्या जागी निरोगी उतींची निर्मिती होते आणि खांद्याची हालचाल पूर्ववत होण्यास सुरुवात होते.
निदानासाठी तज्ज्ञ डॉक्टर शारीरिक तपासणीसोबतच क्ष-किरण (एक्स-रे) चाचणीचा आधार घेतात, ज्यामध्ये कॅल्शियमचे साठे पांढर्या ठिपक्यांच्या स्वरूपात स्पष्टपणे दिसतात. अधिक सखोल निदानासाठी अल्ट्रासाऊंड किंवा एम.आर.आय. चाचण्यांचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, हा आजार कोणत्याही विशिष्ट दुखापतीमुळे किंवा खांद्याच्या अतिवापरामुळे होत नाही. तरीही, काही महत्त्वाचे घटक या व्याधीशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे:
मधुमेह (डायबिटीज) किंवा थायरॉईडच्या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
काही अहवालांनुसार, या व्याधीमध्ये अनुवांशिक घटकांचा वाटा असू शकतो. अनेक रुग्णांमध्ये ही समस्या दोन्ही खांद्यांमध्ये एकाच वेळी दिसून येते, ज्यामुळे अनुवांशिकतेचा तर्क मांडला जातो.
सुरुवातीच्या काळात रुग्णाला अगदी सौम्य त्रास होतो. मात्र, स्थिती बिघडल्यास खालील लक्षणे दिसून येतात
खांद्यात अचानक तीव्र वेदना किंवा जडपणा जाणवणे.
हात हलवताना प्रचंड वेदना होणे.
रात्रीच्या वेळी वेदना वाढल्यामुळे झोपेत अडथळा येणे.
खांद्याच्या हालचालींवर मर्यादा येणे.
अनेक रुग्णांना रात्रीच्या वेळी झोपेत असताना वेदनांचा प्रचंड त्रास होतो, ज्यामुळे दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
जेव्हा पारंपरिक उपचार निकामी ठरतात, तेव्हा ’आर्थ्रोस्कोपिक’ शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. ही एक सूक्ष्म छिद्राद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया असून यात कॅल्शियमचे साठे काढले जातात आणि फाटलेले टेंडन्स शिवले जातात. शस्त्रक्रियेनंतर पूर्ण बरे होण्यासाठी सुमारे 6 आठवड्यांचा कालावधी लागतो. काही काळ खांद्याला आधार देण्यासाठी ’स्लिंग’ वापरावे लागते.
ही जरी वेदनादायक स्थिती असली, तरी योग्य वेळी केलेले निदान आणि शिस्तबद्ध उपचार यांमुळे ती पूर्णपणे बरी होऊ शकते. खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास ’फ्रोजन शोल्डर’सारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, खांद्यात अचानक जडपणा किंवा हालचालीत अडथळा जाणवल्यास त्वरित अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरते. नियमित व्यायाम आणि सांध्यांची योग्य निगा राखल्यास या व्याधीचा धोका कमी करता येतो.