डोळ्यांचा थकवा कसा घालवायचा? | पुढारी

डोळ्यांचा थकवा कसा घालवायचा?

सध्याच्या काळात डोळ्यांवरील ताण वाढलेला दिसतो. ही समस्या सामान्य बनली आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये पुरेशी झोप नसणे, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेटसमोर अधिक काळ घालवणे, कमी प्रकाशात दीर्घकाळ वाचणे, अ‍ॅलर्जी, तीव्र प्रकाश आणि काही डोळ्यांच्या समस्या इत्यादी कारणांचा समावेश आहे. डोळ्यांवर ताण येत असल्यास बर्‍याच गोष्टींचा त्रास होतो. त्यातील काही लक्षणे म्हणजे डोळे लाल होतात, ते चुरचुरतात, बघण्यास अडचण येते,

कोरडे होतात किंवा डोळ्यातून पाणी येते, डोळ्यांना अंधुकसे दिसते किंवा दुहेरी दिसते, प्रकाशाबाबत डोळे अधिक संवेदनशील होतात, डोकेदुखी, मानेमध्ये वेदना होणे तसेच खांदे व पाठ दुखणे इत्यादी होय. सामान्यपणे ही लक्षणे दिवसा दिसत नाहीत. परंतु डोळ्यांवर ताण येईल अशी कामे केल्यानंतर ती दिसू लागतात. डोळ्यांच्या या समस्यांसाठी बरीचशी औषधे आणि आयड्रॉप्स उपलब्ध आहेत. परंतु आपण नैसर्गिकरित्या डोळ्यांवरील ताण नक्कीच घालवू शकतो.

आय मसाज ः डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अत्यंत हळूवारपणे डोळ्यांच्या पापण्यांवर मसाज करावा. यांमुळे डोळ्यांचा रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूही मोकळे होतात. त्याचबरोबर अश्रूग्रंथीसुद्दा सक्रिय होतात आणि डोळे कोरडे पडण्यापासून संरक्षण होते. त्यासाठी आपले बोट हळूवारपणे पापण्यांवर ठेवून भुवयांच्या खालच्या भागांमध्ये 10 ते 20 सेकंद हळूवारपणे फिरवावे. खालच्या पापणीलासुद्धा 10 ते 20 सेकंद अशा प्रकारे मसाज करावा. तसेच अप्पर चिकबोन आणि टेम्पल बोन यालाही मसाज करावा. दिवसातून ही कृती एक ते दोन वेळा करावी. मसाज सहज होण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब किंवा आयक्रीमचा वापर करता येऊ शकतो.

पामिंग ः डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. खास करून संगणकासमोर सतत बसल्यानंतर किंवा सतत टीव्ही पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. अशा वेळी पामिंगचा खूप उपयोग होतो. यासाठी आरामदायी आणि सरळ स्थितीत बसावे. हाताचे पंजे एकमेकांवर घासून ते थोडेसे गरम करावेत. नंतर डोळे बंद करून त्यावर हाताचे पंजे दाब न देता बोट बंद करून ठेवावेत. डोळ्यांसमोर दिसणारा अंधार शांतपणे अनुभवावा. ही कृती 30 सेकंद करावी. तीन ते पाच वेळा ही कृती पुन्हा करावी. दिवसातून तीन-चार वेळा हे तंत्र वापरावे.

सनिंग ः ही क्रिया सकाळी 7 ते 8 या वेळेत करावी. त्यासाठी ऊन येत असलेल्या ठिकाणी सकाळी उभे राहावे. डोळे बंद करावेत आणि सूर्यप्रकाश पापण्यांवर येऊ द्यावा. डोळे गरम होताहेत ही जाणीव होऊ द्यावी आणि हळूवारपणे डोळे वर खाली, उजवीकडे-डावीकडे अशा प्रकारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि पुन्हा विरुद्ध दिशेने फिरवावेत. ही कृती पाच मिनिटे करावी. पामिंग करत असल्यास दिवसातून एकदा ही कृती करावी. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सनिंग ही क्रिया करताना चष्मा किंवा काँटॅक्ट लेन्सेस घालू नयेत. अधिक प्रभावी परिणामासाठी सनिंग नंतर पामिंग करावे.

डोळ्यांचे व्यायाम ः नियमितपणे केलेले डोळ्यांचे व्यायाम डोळ्यांची क्षमता वाढवतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. डोळ्यांचे स्नायू अधिक लवचिक होतात. द़ृष्टी सुधारते आणि एकाग्रता वाढते. त्यासाठी एखादे पेन किंवा पेन्सिल एक हात अंतरावर ठेवावे आणि त्यावर नजर केंद्रित करावी. हळूच ही वस्तू डोळ्याजवळ आणावी. शक्य तेवढी त्यावर नजर केंद्रित करावी. पुन्हा ती वस्तू नजरेपासून दूर न्यावी. असे 10-15 वेळा करावे. याबरोबरच डोळे फिरवणे, पापण्यांची उघडझाप करणे यासारखे व्यायामही करावेत.

गार पाणी ः डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी गार पाणी खूप परिणामकारक असते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. डोळ्यांचे थकलेले स्नायू पुन्हा उत्तेजित होतात. डोळ्यांवरची सूज कमी होते. त्यासाठी तोंडावर थोडे गार पाणी शिंपडावे. डोळे बंद करून ही कृती करावी. यामुळे थकलेल्या डोळ्यांना ताबडतोब आराम मिळतो. अधिक चांगल्या परिणामांसाठी एखादे मऊ कापड गार पाण्यात भिजवून ते डोळ्यांवर ठेवावे. एक मिनीट ही पट्टी डोळ्यांवर ठेवावी. गरज वाटल्यास ही कृती पुन्हा करावी. डोळे सुजल्यासारखे वाटत असल्यास किंवा डोळ्यांना जडपणा वाटत असल्यास बर्फाचे काही तुकडे स्वच्छ कापडामध्ये गुंडाळावेत आणि बंद डोळ्यांवर ते फिरवावेत. पाच ते दहा मिनिटांनंतर डोळ्यांना खूप आरामदायी वाटेल.

डॉ. भारत लुणावत

Back to top button