रोगप्रतिकारक क्षमता आणि आरोग्य | पुढारी | पुढारी

रोगप्रतिकारक क्षमता आणि आरोग्य | पुढारी

डॉ. मनोज शिंगाडे

काही व्यक्ती सातत्याने आजारी पडतात किंवा काही ना काही संसर्ग त्यांना होतो. काय कारण कुणास ठाऊक, असे म्हणून सोडून दिले जाते; पण त्याचे कारण असते, शरीराची रोगाशी लढण्याची क्षमता. प्रत्येकाच्या शरीरात पांढर्‍या पेशी असतात. त्या रोगांना पळवून लावायचे काम करतात. म्हणजेच, त्या आपल्या शरीराच्या रक्षक असतात. हे सर्व आपण शाळेत शिकतो; मात्र नंतर प्रतिकार क्षमता मजबूत राखली पाहिजे, याचा विसरच पडतो. अगदी वर वर धट्टाकट्टा असलेल्या मनुष्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी असू शकते. काही बाळांची जन्मतःच प्रतिकार क्षमता कमी असते; तर सध्याच्या काळात पर्यावरण, प्रदूषण हेदेखील याचे कारक आहेत.

ज्या व्यक्तींची रोगांशी दोन हात करण्याची क्षमता कमी असते, त्यांना विविध आजारांना बळी पडावे लागते, हे तर डॉक्टरही सांगतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर शरीराची रोगप्रतिकारक क्षमता असणे किंवा इम्युन सिस्टीम कमजोर असेल, तर वरून धडधाकट, ताकदवान दिसणार्‍या व्यक्तीलाही अनेक आजार आपल्या कवेत घेतात. त्या उलट, बारीक असणार्‍या व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता खूप मजबूत असते. 

शरीराच्या प्रत्येक भागाला रक्तपुरवठा करणार्‍या पेशी इतर अवयवांबरोबर मिळून आजारांशी लढण्यास सक्षम होतात. म्हणजेच, रोगप्रतिकारक क्षमता मिळवतात. अर्थात, शरीरातील विविध अवस्था म्हणजे आजार, विकार तसेच काही बाह्यकारके यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊ शकते, ती कमजोर होऊ शकते. काही वेळा बाळांमध्ये जन्मापासूनच ती प्रतिकार क्षमता अशक्त असू शकते किंवा ज्या वातावरणात म्हणजे पर्यावरणात ते वाढते त्याचा वाईट परिणाम शरीरावर होऊनही त्याची प्रतिकार क्षमता कमजोर होऊ  शकते. 

ज्या लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमजोर असते किंवा ज्यांची रोगांशी लढण्याची शक्ती कमी असते, त्यांना सतत संसर्गजन्य विकारांची बाधा होतो. अशा मुलांना संसर्ग होतो. शिवाय, असा संसर्ग लवकर कमी होत नाही. काही मुलांमध्ये असलेली रोगप्रतिकारक क्षमता उच्च पातळीवरील असल्याने अशा मुलांना होणारे सर्दी, खोकला इ. आजार लवकर बरे होतात. काही मुलांमध्ये, अगदी काही मोठ्या माणसांमध्येही रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास साधे सर्दी, खोकल्यासारखे संसर्ग खूप काळ टिकतात. 

शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमजोर असल्याचे संकेत ः शरीर त्याच्या शक्तीमध्ये झालेले बदल काही मार्गांनी सुचवत असतेच. रोगप्रतिकारक क्षमता अशक्त असल्यास काही लक्षणे दिसतात; जसे 

– भूक न लागणे, पोटदुखी होणे 

– आखडणे, सतत जुलाब होणे

– मुलांचा खुंटलेला शारीरिक विकास

– डोक्याचा, बुद्धीचा वापर न करणे

– शरीरांतर्गत सूज येणे

– अ‍ॅनिमिया अर्थात रक्ताची कमतरता होणे 

रोगांशी लढण्याची ताकद अर्थात प्रतिकार क्षमता घटण्याची कारणे

– एचआयव्ही संसर्ग – ज्या विषाणूमुळे एडस् होतो 

– कर्करोगाचे काही प्रकार

– कुपोषण किंवा जेवणात पोषण तत्त्वांची कमतरता

– विषाणूजन्य कावीळ किंवा व्हायरल हेपेटायटिस

– काही औषधांचा दुष्परिणाम म्हणूनही ताकद कमी होणे

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपाय

सर्दी तसेच हिवतापासाठी कारणीभूत ठरणार्‍या विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रतिकार क्षमता खूप आवश्यक आहे. शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी खालील 8 गोष्टी आपल्याला मदत करतील. या सर्व विषाणूंशी लढण्यासाठी प्रतिकार क्षमता सशक्त होईल. 

– फळे, भाज्या आणि आख्खे धान्य सेवन करावे 

– आठवड्यातून शक्य तितके दिवस कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम जरूर करावा

– पुरेशी झोप घ्यावी 

– गरज असेल तेव्हा हात साबणाने स्वच्छ धुवावेत 

– लहान मुलांचे लसीकरण नियमित, न चुकता करावे                                                                                                                                                                                                        – लहान मुलांना दर वर्षी फ्लूचे इंजेक्शन दिले पाहिजे 

– वजन नियंत्रित ठेवावे.

– धूम्रपान, मद्यपान पूर्ण टाळावे 

– प्रतिकारक्षमता मजबूत करण्यासाठी काही गोष्टी टाळाव्यात तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात 

चांगल्या आरोग्यासाठी उत्तम भोजन

प्रतिकार क्षमता अर्थात शरीराची रोगांशी लढण्याची ताकद वाढवण्यासाठी सर्वात चांगला आणि नैसर्गिक स्रोत म्हणजे आहार. रोजच्या जेवणाच्या थाळीतील आरोग्यदायी पदार्थांचे सेवन नैसर्गिकरीत्याच प्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते. आहारात भाज्या आणि फळे यांचा अधिकाधिक समावेश असला पाहिजे. जेवणाची आदर्श थाळी कशी असावी, यासाठी आता भारत सरकारने ‘माय प्लेट’ नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत काही दिशा निर्देशही दिले आहेत. 

एखाद्या व्यक्तीला शारीरिक अशक्तपणा किंवा अस्वस्थता वाटत असेल, तर डॉक्टरांशी सल्लामसलत करावी. त्याचबरोबर डॉक्टरांशी सल्लामसलत करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे आवश्यक विटामिन आणि खनिजे पुरेशा प्रमाणात असणारे पदार्थ आहारात जरूर असावेत. आहार माफक आणि पुरेसा असावा. अतिझोप ही हानिकारक ठरू शकते. 

तणाव कमी करण्याचे प्रयत्न : ताणतणाव हा नव्या पिढीमध्ये अगदी रुळलेला शब्द आहे. ऑफिस, घरीदारी प्रत्येकाला काही ना काही तणावाला तोंड द्यावे लागत आहे. शरीराची तंदुरुस्त प्रतिकार क्षमता हा तणाव दूर करण्यास मदत करते. त्यामुळे व्यक्तीने कमीत कमी ताण घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःलाच समजून घेत ताकदवान राखावे. 

यासाठी स्वतःला स्वयंसूचना देऊन मन प्रफुल्लित ठेवा. सतत तणावात राहू नका. अधूनमधून आपल्या आवडीचे एखादे काम करत राहा. त्यामुळे आराम वाटेल. एखादी शॉर्ट फिल्म पाहणे किंवा संगीत ऐकणे. याखेरीज व्यायाम करावा. स्वतःसाठी थोडा वेळ जरूर काढावा. स्वतःची समस्या सांगता येईल, त्यांच्याकडून आपल्याला योग्य मार्ग दिसू शकतो, अशा लोकांना भेटा. तणाव खूप जास्त वाढला तर चिंताग्रस्त होण्यापेक्षा डॉक्टरांशी जरूर सल्लामसलत करा. समुपदेशनाने अनेक प्रकारचे तणाव दूर होऊ शकतात. 

ज्या लहान बाळांना स्तनपान दिलेले असते, त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता अधिक असते. तसेच घरात लहान बाळ असेल तर घराच्या दैनंदिन स्वच्छतेकडे जरूर लक्ष द्यावे. लहान मुलांना बाहेरील पदार्थ खायला देण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ जरूर खावेत. 

रोगांशी लढण्याची क्षमता मजबूत असल्यास रोगांचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. त्यामुळे अधिकाधिक तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

Back to top button