लोकरीचे कपडे वापरताय? | पुढारी | पुढारी

लोकरीचे कपडे वापरताय? | पुढारी

विजयालक्ष्मी साळवी

हिवाळा आला की थंडी आलीच; मग उबदार कपड्यांना बॅगेतून बाहेर काढायची वेळ येते. जसजसी थंडी वाढते तसे बाजारही नव्या नव्या उबदार कपड्यांनी सजलेला असतो. खूप थंडी वाजत असते तेव्हा लोकरीचा स्वेटर, शाल, कानटोप्या यांना हवा लागतेच; पण लोकरीचे कपडे किंवा स्वेटर घातल्यानंतर थंडीची उब मिळण्याऐवजी जर त्वचेवर पुरळ किंवा खाज येत असेल, तर काय करायचे, असा प्रश्न पडतो. थंडीमध्ये उबदार राहण्यासाठी लोकरीशिवाय पर्याय नसतो; मात्र असे का होते, याचा विचार केला, तर ही लोकरीची अ‍ॅलर्जी असू शकते. त्यावर काही उपायही करता येतात.

हिवाळा आला की गरम गरम आल्याचा चहा, शेकोटी याबरोबरच लोकरीचे उबदार शाली आणि स्वेटर्सची आठवणही येऊ लागते. कारण, जसा थंडीचा कडाका वाढतो तसे बॅगेतील हे उबदार कपडे बाहेर पडू लागतात आणि बाजारातही नवनवीन प्रकारचे स्वेटर्स, शाली दिसू लागतात. मात्र लोकरीचे स्वेटर्स, कपडे घातल्यानंतर अंगाला खाज येते किंवा शरीरावर पुरळ येते. आपणही अशाच लोकांमध्ये सामील असू, तर याविषयी अधिक जाणून घेऊया! 

थंडीच्या दिवसात लोकरीच्या कपड्यांमुळे अंगावर रॅशेस येण्याची समस्या काही जणांना जाणवते. ती आपल्यालासुद्धा जाणवत आहे; पण उबदार कपडेच घातल्यानंतर अशी पुरळ किंवा खाज का येते, हे समजून घ्यायला हवे. 

उबदार कपड्यांमुळे येणारी अ‍ॅलर्जी म्हणजे टेक्स्टाईल डर्मेटायटिस. ज्यांना ही अ‍ॅलर्जी कमी अधिक प्रमाणात आहे त्यांना उबदार किंवा लोकरीचे कपडे घालता येत नाहीत. लोकरीच्या उबदार कपड्यांच्या अ‍ॅलर्जीची लक्षणे कशी ओळखायची आणि बचाव कसा करायचा पाहूया! 

अ‍ॅलर्जीची लक्षणे : हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे घातल्यानंतर काही लक्षणे दिसून येतात. 

त्वचेला खूप खाज येणे.

चेहरा आणि शरीरावर विविध ठिकाणी चेहरा, हात, डोके आदींवर लाल चट्टे येणे. 

लोकरीच्या संपर्कात येणार्‍या जागी सूज येणे

शरीरावर बारीक पुरळ येणे किंवा त्वचेचे पापुद्रे निघणे

लोकरीच्या कपड्यांच्या अ‍ॅलर्जीचे कारण : ज्या व्यक्तींना लोकरीच्या कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे किंवा ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशा व्यक्तींच्या शरीरावर ही लक्षणे दिसून येतात. लोकरीच्या कपड्यांवर लहान लहान गोळे येतात ते त्वचेवरील केसावर रगडले जातात तेव्हा ते खेचले जातात. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ लागते. त्वचा संवेदनशील असेल, तर त्वचेला ही उष्णता सहन होत नाही. त्यामुळेच त्वचेवर पुरळ, चट्टे, फोड येऊ लागतात. त्याव्यतिरिक्त हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळेही ही अ‍ॅलर्जी होऊ शकते, तसेच त्वचेला खाजही येऊ शकते. त्वचेवरील केसावर लोकरीच्या लहान गोळ्यांचे घर्षण होऊ नये, यासाठी हिवाळा सुरू झाला, की पूर्ण शरीरावर चांगल्या दर्जाचे बॉडी लोशन लावण्यास सुरुवात करावी. त्यामुळे अशा प्रकारची अ‍ॅलर्जी येण्याची शक्यता कमी होते. 

अ‍ॅलर्जीची समस्या दूर करण्यासाठीचे उपाय 

अ‍ॅलर्जी दूर करण्यासाठी थंडीची चाहूल लागताच त्वचेला बॉडी लोशन लावण्यास सुरूवात करावी. 

लोकरीचे कपडे थेट न वापरता, आधी सुती कपडे घालून अ‍ॅलर्जी होणे टाळू शकतो. 

त्याव्यतिरिक्त अ‍ॅलर्जीसाठी औषधेही घेऊन ही समस्या सोडवू शकतो. 

अ‍ॅलर्जीवर या सोप्या उपायांच्या मदतीने आपण अ‍ॅलर्जीला दूर ठेवून, हिवाळ्यात घरातले किंवा नवीन आणून तर्‍हतर्‍हेचे उबदार स्वेटर्स, शाली, कार्डिगन बिनदिक्कत घालू शकतो.

Back to top button