स्थूलपणा : आजारांचे मूळ | पुढारी | पुढारी

स्थूलपणा : आजारांचे मूळ | पुढारी

डॉ. संतोष काळे

स्थूलपणा ही एक जागतिक समस्या झाली आहे. स्थूलता ही व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वावरही परिणाम करते. शिवाय अनेक आजारांना आमंत्रणही देत असते. स्थूल व्यक्‍ती अनेक आजारांना चटकन बळी पडू शकतात. जागतिक निरीक्षणांमध्ये तर शाळकरी मुलांमधील वाढती स्थूलता ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे. लहानग्यांनाही स्थूलतेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एकुणातच जीवनशैलीतील बदल हे स्थूलतेचे कारण ठरत आहे आणि ही स्थूलता अनेक आजारांचे मूळ बनत आहे. 

स्थूलता आता मेटाबोलिक सिंड्रोमचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. मेटाबोलिक सिंड्रोम हा काही आजार नव्हे, तर ती एक अवस्था आहे. स्थूल व्यक्‍तींमध्ये ही अवस्था निर्माण झाल्यानंतर त्यांना मधुमेह, हृदयरोग आदी आजार जडतात. 

मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजे काय? : मेटाबोलिक सिंड्रोम हा काही कोणता आजार नाही. परंतु, शरीराची ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये शरीरात आजार होण्यासाठी अनेक कारके निर्माण होतात. ही कारके शरीराचे नुकसान करतात. उच्च रक्‍तदाब, उच्च मधुमेह, अनियंत्रित कोलेस्ट्रॉल आणि स्थूलता या सर्वांना एकत्रितपणे मेटाबोलिक सिंड्रोम म्हटले जाते. मेटाबोलिक सिंड्रोम हा सिंड्रोम एक्स या नावाने ओळखला जातो. शरीरात हा घटक किंवा हे कारण निर्माण झाले की हृदयरोग, लकवा आणि मधुमेह याचबरोबर अनेक प्रकारचे आजारांनी शरीर ग्रासू शकते. यापैकी कोणताही एक घटक किंवा एक कारण मिळाले म्हणजे ती व्यक्‍ती मेटाबोलिक सिंड्रोमने ग्रस्त आहे, असे नाही. परंतु, एकापेक्षा अधिक कारणे किंवा घटक आढळून आल्यास ही व्यक्‍ती मेटाबोलिक सिंड्रोमने ग्रस्त असल्याचे मानले जाऊ शकते. अर्थात, जीवनशैलीमध्ये बदल करून मेटाबोलिक सिंड्रोमच्या सुरुवातीच्या कारणांवर किंवा घटकांना लगाम घालता येऊ शकतो.

मेटाबोलिक सिंड्रोम होण्याची कारणे : सर्वसाधारणपणे मेटाबोलिक सिंड्रोम होण्याचे कारण आहे स्थूलता आणि शारीरिक निष्क्रियता. म्हणजे आपण जितके जास्त निष्क्रिय राहू तितका मेटाबोलिक सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो. वैद्यकीय शास्त्रानुसार मेटाबोलिक सिंड्रोम हा इन्शुलिन रेझिस्टन्स किंवा प्रतिरोधाशी जोडून पाहिले जाते. शरीरात जेवणात असणारी साखर किंवा ग्लुकोज यांचे अणू पचनसंस्थेत गेल्यावर विभाजित होतात. शरीरातील स्वादुपिंड किंवा पॅनक्रिया इन्शुलिन नावाच्या हार्मोन्सची निर्मिती करते. त्यामुळे रक्‍तातील साखर पेशी किंवा कोशिकांपर्यंत पोहोचते आणि त्यासाठी ऊर्जेचे काम करतात. निष्क्रिय असणारे लोक इन्शुलिन रेझिस्टंटने ग्रस्त असतात. इन्सुलिन रेझिस्टन्सने ग्रस्त लोकांच्या पेशींमध्ये ग्लुकोज किंवा शर्करा सहजपणे पोहोचू शकत नाही. त्यामुळे रक्‍तातील साखरेची पातळी खूप जास्त वाढते. त्यामुळेच व्यक्‍तीला मधुमेह होतो. हळूहळू मेटाबोलिक सिंड्रोमची इतर कारणेही याच परिस्थितीत निर्माण होतात. 

स्थूलतेच्या समस्येची कारके– दिवसभरात व्यक्‍ती गरजेपेक्षा अधिक कॅलरी सेवन करत असेल; परंतु वाढलेल्या कॅलरी शरीराकडून वापरल्या जात नसतील तेव्हा त्या अतिरिक्‍त मेद किंवा चरबीच्या रूपात शरीरात साठून राहातात. शरीरातील ही अतिरिक्‍त चरबी किंवा मेद स्थूलतेला जन्म देते. त्या व्यतिरिक्त हार्मोनल बदल होत असतील, तरीही शरीरात अतिरिक्‍त चरबी जमा होते; पण ते शरीराकडून वापरले जात नाही. काही वेळा स्थूलतेमुळे शरीराचा आकारही बदलू शकतो, तर काही वेळा तो बदलत नाही. याचा अर्थ जाड असणे म्हणजे स्थूलता, असे नाही, तर शरीरात अतिरिक्‍त चरबी किंवा मेद जमा होणे या स्थितीला स्थूलता म्हटले जाते. अतिरिक्‍त मेद जमा झाल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास किंवा विकार जडू शकतात. जसे रक्‍तदाब वाढणे किंवा कमी होण्याची समस्या निर्माण होते. 

मेटाबोलिक सिंड्रोमवरचे उपाय– सुरुवातीला मेटाबोलिक सिंड्रोमवर उपाय सुरू करावेतच; पण त्याचबरोबर महत्त्वाचे आहे ते आपल्या जीवनशैलीत बदल करणे. जीवनशैलीतील बदलांनी या सिंड्रोमवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. 

नियमित व्यायाम : दिवसभरात काहीही काम करा; पण 30 मिनिटांचा वेळ हा केवळ व्यायामच करावा. दिनचर्येचा एक भाग म्हणूनच व्यायामाकडे पाहिले पाहिजे. नियमित व्यायामाने आपल्या शरीरात होत असलेले सकारात्मक बदल हळूहळू नजरेत येतील. 

वजन कमी करणे : वजन कमी झाले, की इन्श्ाुलिन रेझिस्टन्स आणि रक्‍तदाब कमी करता येतो. त्यामुळेच मेटाबोलिक सिंड्रोम होण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांवर नियंत्रण मिळवता येते. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी, सुपाच्य आहार सेवन करू शकता. त्यासाठी योग्य आहाराचे नियोजन करावे. हिरव्या पालेभाज्या, फळे यांचे सेवन करावे. 

धूम्रपान नको – धूम्रपान करणे सोडून द्यावे. त्यामुळे मेटाबोलिक सिंड्रोमवर नियंत्रण मिळवता येते. धूम्रपान करणार्‍या व्यक्‍ती या सिंड्रोमच्या विळख्यात लवकर सापडू शकतात. 

पुरेशी शांत झोप : झोप ही फारच महत्त्वाची आहे. 24 तासांच्या दिवसात शरीराला कमीत कमी 7-8 तासांची झोप मिळणे गरजेचे आहे. तणावापासून दूर राहावे. या दोन्ही गोष्टींचे पालन केल्यास शरीरातील मेटाबोलिक सिंड्रोम नियंत्रित ठेवता येते. 

कोलेस्ट्रॉल, स्थूलता आणि आजार : कोलेस्ट्रॉल हे पेशींमध्ये आढळते. कोलेस्ट्रॉल हे वास्तविक मानवी शरीराचा मित्रही आहे आणि शत्रूही आहे. कोलेस्ट्रॉल शरीरात निर्माणही होते आणि आहारातूनही शरीरात कोलेस्ट्रॉल जाते. शरीराच्या सर्वसाधारण क्रिया होण्यासाठी कोलेस्ट्रॉल अत्यंत गरजेचे असते. परंतु, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणेही शरीरासाठी नुकसानदायक असते. सर्वसाधारणपणे कोलेस्ट्रॉल लिपीडमध्ये मिळते. पेशींच्या निर्मितीमध्ये कोलेस्ट्रॉल खूप महत्त्वाचे असते. त्याची पातळी वाढल्यास चरबी रक्‍तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजनयुक्‍त रक्‍ताचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही आणि हृदयाकडून शरीराच्या इतर अवयवांनी ऑक्सिजनयुक्‍त रक्‍ताचा पुरवठा होत नाही. याच सर्व कारणांमुळे हृदयरोग आणि लकवा यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. 

स्थूलतेपासून बचाव : स्थूलतेपासून बचाव करायचा असेल, तर जीवनशैलीवर नियंत्रण ठेवावे. त्याचबरोबर पौष्टिक आणि संतुलित आहार योग्य प्रमाणात सेवन करावा. फास्ट फूड, तेल-तूप, मिठायांचे सेवन अधिक प्रमाणात करू नये. कार्बोहायड्रेटयुक्‍त आहार जसे तांदूळ, राजमा, बटाटा, मटार, अंडे आदींचे सेवन ठराविक कालावधीनंतर करावे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. आहारात हिरव्या पालेभाज्या सेवन केल्यास त्याचा जास्त फायदा होतो. तळण्याऐवजी उकडून, भाजून केलेले पदार्थ सेवन करावेत. असे पदार्थ आरोग्याच्या द‍ृष्टीने अधिक चांगले असतात. फळांचा रस पिण्याऐवजी आख्खी फळे सेवन करावीत. त्यामुळे शरीरात तंतुमय घटक जातात. 

या सर्व गोष्टींचे पालन केले, तर मेटाबोलिक सिंड्रोम दूर ठेवण्यास मदत होईल.

 

Back to top button