डेंग्यूपासून सावधान | पुढारी | पुढारी

डेंग्यूपासून सावधान | पुढारी

राज्यात आणि जगभरात कोरोनाची चर्चा ऐरणीवर असली तरी अन्य आजारांचा धोका टळलेला नाही. गेल्या काही वर्षांत आपल्याकडे कॉलरा, चिकुनगुनिया, मलेरिया यांबरोबरीने डेंग्यू या आजारानेही थैमान घातले होते. डेंग्यूचा ताप आलेल्या रुग्णाच्या रक्तात डेंग्यूचा विषाणू मोठ्या प्रमाणावर असतो. जेव्हा एखादा एडीज डास एखाद्या रुग्णाला चावतो तेव्हा त्याचे रक्त शोषतो आणि त्या रक्ताबरोबर डेंग्यूचा विषाणूही डासाच्या शरीरात जातो. जेव्हा डेंग्यू विषाणूवाला तो डास दुसर्‍या माणसाला चावतो तेव्हा तो विषाणू त्या माणसाच्या शरीरात जातो आणि त्यामुळे तो माणूस डेंग्यूच्या विळख्यात सापडतो. याविषयी…

डेंग्यू हा आजार एडीज इजिप्टी नावाच्या डासाच्या मादीने चावल्यामुळे होतो, हे आता आपल्याला माहीत आहे. हा डास फार उंच उडू शकत नाही, त्यामुळे तो पायाला चावतो. शिवाय हा डास दिवसा, विशेषत: सकाळच्या वेळी चावतो. डेंग्यूचा आजार पावसाळ्याच्या दिवसांत आणि त्याच्यानंतर लगेचच्या महिन्यांत म्हणजे जुलै ते ऑक्टोबर या काळात जास्त पसरतो. कारण, या काळात डासांची पैदास होण्यासाठी अनुकूल वातावरण असते. 

डेंग्यूचा फैलाव कसा होतो?

डेंग्यूचा ताप आलेल्या रुग्णाच्या रक्तात डेंग्यूचा विषाणू मोठ्या प्रमाणावर असतो. जेव्हा एखादा एडीज डास एखाद्या रुग्णाला चावतो तेव्हा त्याचे रक्त शोषतो आणि त्या रक्ताबरोबर डेंग्यूचा विषाणूही डासाच्या शरीरात जातो. जेव्हा डेंग्यू विषाणूवाला तो डास दुसर्‍या माणसाला चावतो तेव्हा तो विषाणू त्या माणसाच्या शरीरात जातो आणि त्यामुळे तो माणूस डेंग्यूच्या विळख्यात सापडतो. 

हा डास चावल्यानंतर साधारण 3 ते 5 दिवसांनी रुग्णामध्ये डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसू लागतात. हा आजार शरीरात भिनण्याची प्रक्रिया 3 ते 10 दिवसांचीही असू शकते. 

डेंग्यूचे प्रकार 

डेंग्यूचे तीन प्रकार आहेत, एक म्हणजे क्लासिकल (सामान्य) डेंग्यू, दुसरा डेंग्यू हॅमरेजिक ताप (डीएचएफ) आणि तिसरा डेंग्यू शॉक सिंड्रोम (डीएसएस). या तीनपैकी दुसर्‍या आणि तिसर्‍या प्रकारचे डेंग्यू जास्त धोकादायक असतात. साधारण डेंग्यू ताप आपोआप बरा होतो आणि त्यामुळे जीवाला काही धोका नसतो; पण डीएफएफ किंवा डीएसएसची लागण कुणाला झाली आणि त्यावर लगेच उपचार सुरू केले नाहीत तर ते जीवावर बेतू शकते. म्हणूनच रुग्णाला झालेला डेंग्यूू कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखणे गरजेचे असते. 

डेंग्यूची लक्षणे 

सामान्य डेंग्यू ताप

– थंडी वाजून अचानक तीव्र ताप चढणे

– डोके, स्नायू आणि सांधे दुखणे

– डोळ्यांच्या मागच्या भागात वेदना होणे, डोळ्यांवर दाब दिल्याने किंवा डोळे चोळल्याने वेदना वाढते

– खूप अशक्तपणा वाटणे, भूक न लागणे, मळमळणे आणि तोंडाची चव जाणे

– घशात बारीक दुखणे

– शरीरावर विशेषत: चेहरा, मान आणि छातीवर निळ्या-काळ्या रंगाचे चट्टे उठणे. 

सामान्य किंवा क्लासिकल डेंग्यू पाच ते सात दिवस राहतो आणि मग रुग्ण बरा होतो. बहुतांशवेळा याच प्रकारचा डेंग्यू आढळून येतो. 

डेंग्यू हॅमरेजिक ताप (डीएचएफ)

– नाक आणि हिरड्यांतून रक्त येणे

– शौचावाटे किंवा उलटीतून रक्त पडणे

– त्वचेवर गडद निळ्या-काळ्या रंगाचे लहान किंवा मोठे चट्टे पडणे

जर सामान्य डेंग्यूबरोबर हीदेखील लक्षणे दिसत असतील तर हा आजार डीएफएफ असू शकतो. रक्तचाचणीतून याचे निदान करता येते. 

डेंग्यू शॉक सिंड्रोम (डीएसएस)

यामधील तापात डीएचएफच्या लक्षणांसोबत शॉकप्रमाणे अवस्थेचीही लक्षणे दिसून येतात. म्हणजे 

– रुग्ण खूप अस्वस्थ असतो. त्याला तीव्र ताप असूनही शरीर थंड लागते. 

– रुग्णाची शुद्ध हळूहळू हरपत जाते. 

– रुग्णाची नाडी कधी जोरात तर कधी मंद चालते. त्याचा रक्तदाब एकदम कमी होतो. 

डेंग्यूमुळे खूप वेळा मल्टी ऑर्गन फेल्युअरही होते. यामध्ये पेशींमधील द्रवपदार्थ बाहेर पडतो. पोटात पाणी होते. फुफ्फुसे आणि यकृतावर खूप वाईट परिणाम होतो आणि त्यांचे काम करणे बंद होते. 

प्लेटलेटस्ची भूमिका 

निरोगी माणसाच्या शरीरात साधारणपणे दीड ते दोन लाख प्लेटलेटस् (पांढर्‍या पेशी)असतात. या पेशी शरीराचा रक्तस्राव रोखण्याचे काम करतात. जर प्लेटलेटस्ची संख्या एक लाखाहून कमी झाली तर त्यामुळे डेंग्यू होऊ शकतो. अर्थात, ज्याला डेंग्यू झाला आहे, त्याच्या प्लेटलेटस् कमी होतातच असे काही नाही. प्लेटलेटस् जर एक लाखाहून कमी झाल्या असतील तर अशा रुग्णाला ताबडतोब इस्पितळात दाखल करावे. प्लेटलेटस् वीस हजार किंवा त्याहूनही कमी झाल्या तर त्या चढवण्याची गरज भासते. डेंग्यूचा विषाणू सर्वसाधारणपणे प्लेटलेटस् कमी करतो, त्यामुळे शरीरात रक्तस्राव सुरू होतो. प्लेटलेटस् वेगाने कमी होत असतील तर डॉक्टर प्लेटलेटस् रुग्णात चढवण्याचा पर्याय अवलंबतात. 

उपचार

डीएफएफ किंवा डीएसएस या प्रकारच्या डेंग्यूमध्ये प्लेटलेटस् कमी होतात. वेळेवर उपचार केले तर यातून रुग्ण वाचू शकतो. 

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये?

काय करावे 

– घरात मॉस्किटो रिपेलन्टचा वापर करा. 

– शक्यतो फुल स्लीव्हज कपडे परिधान करा, पायही पूर्ण झाकले जातील असे कपडे परिधान करा. 

– घराच्या खिडक्यांना जाळी लावा आणि दरवाजाही बंद ठेवा 

– झोपताना मच्छरदाणी लावा किंवा कॉईल लावा. 

– ताप आला तर लगेच डॉक्टरांकडे जा. अंगावर काढू नका. 

– योग्य आहार घ्या जेणेकरून तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहील. 

काय करू नये 

– घरातील कोणत्याही सामानात पाणी साठू देऊ नका. 

– जिथे अनेक दिवसांपासून पाणी साचले आहे अशा ठिकाणी लहान मुलांना खेळायला पाठवू नका. 

– डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णाला भेटायला जाताना मास्क लावून जा आणि त्याला स्पर्श करू नका. 

– कूलरची स्वच्छता केल्याशिवाय त्यात पाणी घालू नका. कूलर पूर्णपणे रिकामा करून स्वच्छ करा आणि मग ताजे पाणी भरा. 

Back to top button