जिल्ह्यात बाधितांचे शतक | पुढारी | पुढारी

जिल्ह्यात बाधितांचे शतक | पुढारी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात गुरुवारी आणखी तीन व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील बाधित मुलीची सव्वीस वर्षीय आई, मुंबईहून गोरेवाडी (ता. खानापूर) येथे आलेली पंचेचाळीस वर्षीय व्यक्ती व नवी मुंबईहून नेर्ली (ता. कडेगाव) येथे आलेली 57 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यातील बाधित सहा व्यक्ती गुरुवारी कोरोनामुक्त झाल्या. गुरुवारअखेर एकूण कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येचे शतक, तर कोरोनामुक्त व्यक्तींच्या संख्येचे अर्धशतक झाले आहे. 

जिल्ह्यात गुरुवारअखेर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 101 झाली आहे. बाधित रुग्णांपैकी चार व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी सहा रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. गुरूवारअखेर कोरोनामुक्त झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या 54 झाली आहे. सध्या 44 व्यक्ती उपचाराखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

आई पॉझिटिव्ह; भाऊ निगेटिव्ह

नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे मुंबईहून आलेल्या कुटुंबातील आठ वर्षीय मुलीचा चाचणी अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. तिच्या सहा वर्षीय भावाचा स्वॅबही तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल गुरूवारी कोरोना निगेटिव्ह आला. मात्र बाधित मुलीच्या आईचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  

नवीमुंबईहून नेर्ली येथे दि. 18 मे रोजी 57 वर्षीय व्यक्ती आली होती.   लक्षणे दिसून आल्याने त्यांना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा चाचणी अहवाल गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पत्नी, मुलगी, मुलगा यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. 

गोरेवाडी (ता. खानापूर) येथे मुंबईहून दि. 16 मे रोजी आलेल्या व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील 6 व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. 

सहा व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त

कोरोबाधित सहा व्यक्तींनी गुरूवारी कोरोनावर मात केली. त्यांचे चाचणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. कर्नाळ (ता. मिरज) येथील 28 वर्षीय व्यक्ती, अंकले (ता. जत) येथील 32 वर्षे व्यक्ती, रेड (ता. शिराळा) येथील 42 वर्षीय महिला व 49 वर्षीय पुरुष, कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील 70 वर्षीय वृद्ध, तर मरगळे वस्ती आटपाडी येथील 60 वर्षीय व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.

कुंडलवाडीतील कोरोनामुक्त व्यक्तीचा मामा कोरोनामुक्त

कुंडलवाडी येथील कोरोनामुक्त व्यक्तीचा मामाही कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईहून कुंडलवाडी येथे आलेल्या 30 वर्षीय व्यक्तीचा चाचणी अहवाल दि. 15 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. संपर्कातील मामाही दि. 18 रोजी पॉझिटिव्ह आले होते. ते दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. गुरूवारी मामाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. 

करगणीतील 4 व्यक्ती निगेटिव्ह

मुंबईहून करगणी येथे आलेल्या 4 व्यक्तींचा तसेच आटपाडी विद्यानगर येथील व्यक्तीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्याला दिलासा मिळाला आहे. 

कचरेवाडीची महिला निगेटिव्ह

कचरेवाडी (ता. तासगाव) येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 7 व्यक्तींचा टेस्ट रिपोर्ट प्रलंबित असून  एका महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शिरगाव येथील बाधिताच्या संपर्कातील 6 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे. तपासणी अहवालाकडे लक्ष लागले आहे. 

पुण्याहून इस्लामपुरात आणि धारावीतून रेठरेधरण येथे आलेली  एकूण दोन संशयित व्यक्तींना मिरजेला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या टेस्ट रिपोर्टकडे लक्ष लागले आहे. 

कोरोनाबाधित चार व्यक्ती चिंताजनक

नेर्ली (ता. कडेगाव) येथील 57 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. किडेबिसरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील 48 वर्षीय व्यक्तीवर ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत. खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय व्यक्तीला नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर लावले आहे. सुलतानगादे (ता. खानापूर) येथील 57 वर्षीय महिलेवर अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

Back to top button