जीईआरडी आणि हायट्स हर्निया म्हणजे काय? | पुढारी

जीईआरडी आणि हायट्स हर्निया म्हणजे काय?

डॉ. अपर्णा गोविल-भास्कर

जीईआरडी यालाच गर्ड म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात आपण खाल्लेले अन्न तोंडातून अन्ननलिकेद्वारे जठरामध्ये जाते. अन्ननलिकेच्या खालील टोकाशी एक झडप असते. ही झडप उघडली की, अन्न जठरामध्ये जाते आणि झडप पूर्ण बंद होते. ही झडप बंद झाल्यामुळे अन्न आणि जठरातील आम्ल पुन्हा उलट मार्गाने अन्ननलिकेत प्रवेश करू शकत नाही. अशारीतीने एकेरी वाहतूक सुरळीत सुरू असते; पण या पद्धतीला बिघाड झाल्यास पोटातील घटक पुन्हा अन्ननलिकेत वर जातात. यामुळे अस्वस्थ वाटू लागते. हृदयात जळजळ होऊ लागते. मुख्यतः गर्भवती महिलांसह बर्‍याच लोकांमध्ये जीईआरडीमुळे छातीत जळजळ किंवा अपचनाची समस्या उद्भवू शकते.

हायट्स हर्निया

हायट्स हर्निया हा हर्नियाचा एक प्रकार आहे. यात उदराचा काही भाग छिद्रपटलातून छातीमध्ये शिरतो. या छिद्रपटलाने उदर आणि छातीतील अवयव वेगळे झालेले असतात. हायट्स हर्निया छिद्रपटलाला चीर पाडतो. हा अनुवांशिक आजार असून जन्मतः असू शकतो. वयोवृद्ध आणि स्थूलपणा हेसुद्धा हर्निया होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. जांघेत किंवा नाभीच्या ठिकाणी गाठ येणे, उदराच्या खालील भागात दुखणे, वजन उचलताना किंवा खोकताना वेदना होणे किंवा अस्वस्थ वाटणे ही याची लक्षणे आहेत. 

पचनासंबंधी समस्या टाळण्यासाठी

* समतोल आहाराचे सेवन करा, मेदयुक्त पदार्थ, तेलकट, खारट, जंकफूडचे सेवन करणे टाळावे.

* झोपताना डोक्याखाली दोन उशा घेऊन झोपावे.

*गरजेपेक्षा जास्त आहाराचे सेवन करणे टाळावे.

* एकाच वेळी भरपेट न जेवता, ठराविक अंतराने थोडे-थोडे खाण्याची सवय लावून घ्यावी.

* औषधोपचार घेऊनही रुग्णाला बरे वाटत नसल्यास डॉक्टर रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देतात.

शस्त्रक्रिया ही लेप्रोस्कोपिकद्वारे केली जाते. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला वेदनाही कमी होते आणि प्रकृती पटकन सुधारते. रुग्णाची प्रकृती उत्तम असल्यास दुसर्‍या दिवशी त्याला घरी सोडले जाते. लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमुळे आठवड्याभरात रुग्ण पुन्हा नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगू शकतो.

 

Back to top button