सिकलसेल अ‍ॅनिमियाविषयी… | पुढारी | पुढारी

सिकलसेल अ‍ॅनिमियाविषयी... | पुढारी

भारतापुरता विचार केला तर सामान्यत: इथल्या आदिवासी पट्ट्यामध्ये सिकलसेल अ‍ॅनिमिया हा आजार आढळतो. हा आजार आनुवंशिक आहे. या आजारात लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबीन सदोष असते. त्याला ‘हिमोग्लोबीन एस’ म्हणतात. यात रक्तपेशी कडक बनून वाकड्यातिकड्या होतात. त्यामुळे त्यांच्या गुठळ्या बनून त्या रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात. या कडक झालेल्या रक्तपेशी ऑक्सिजन वहनाचे कामही नीट करू शकत नाहीत. त्यामुळे सिकलसेल अ‍ॅनिमिया असलेल्या व्यक्तींमध्ये रक्ताभिसरणाच्या अडचणी तयार होतात. याची लक्षणे रक्तप्रवाह अडखळल्यामुळे निर्माण होतात. वेगवेगळ्या अवयवात वेदना, रक्तपांढरी, हातपाय आखडणे, पोट, छाती आवळल्याप्रमाणे वाटणे, सांध्याजवळ वेदना होणे ही या आजाराची साधारण लक्षणे असतात.

या आजारात पाणथरी सूज हे प्रमुख चिन्ह असते. प्रतिकार शक्ती कमी झाल्याने वारंवार संसर्ग होतो. ताप येतो. न्युमोनिया होण्याची शक्यता वाढते. रक्तपांढरीच्या सर्व लक्षणांबरोबरच सिकल अ‍ॅनिमियाची काही विशेष तीव्र लक्षणे अचानक उद्भवू शकतात. उदाहरणार्थ तीव्र पोटदुखी, वारंवार पाणथरी सुजणे व दुखणे, पाणथरीचे काम बंद पडल्याने जंतुदोष होणे इत्यादी. सिकलसेल अ‍ॅनिमिया या रक्तदोषाचा दुष्परिणाम शरीरातल्या सर्व अवयव संस्थांवर होतो. 

सिकल अ‍ॅनिमिया असलेल्या व्यक्ती 40 ते 50 वर्षांपर्यंत जगतात. बालमृत्यू व मातामृत्यूंचे प्रमाण यात जास्त आहे. 1 ते 10 या वयोगटात सुमारे 10 टक्के मुले या आजाराने मरण पावतात, असे आकडेवारी सांगते. वेदनाशामक औषधे, जंतुसंसर्गावर उपचार आणि वारंवार अंगात रक्त भरणे हे या आजारावरील उपचाराचे तीन प्रमुख घटक आहेत. याचबरोबर वेळोवेळी शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता भरून काढावी लागते. संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी वेळीच लसीकरण करणे हाही एक महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे. हा आजार संपूर्णपणे बरा होत नाही; पण या आजारावरील औषधांबाबत आणि उपचारांबाबत प्रचंड संशोधन सुरू आहे आणि तीच मुख्य आशेची बाब म्हणायला हवी.

– डॉ. संतोष काळे\

Back to top button