श्वसनाच्या समस्येकडे नको दुर्लक्ष | पुढारी | पुढारी

श्वसनाच्या समस्येकडे नको दुर्लक्ष | पुढारी

अनियमित श्वसनाच्या समस्येने अनेक लोक पीडित आहेत. श्वास घेण्यास अडचणी जाणवत असल्यास बरेच आजार उद्भवू शकतात. श्वसनाशी संबंधित समस्येकडे दुर्लक्ष करणे आरोग्यावर बेतू शकते म्हणून या समस्येवर त्वरित उपचार होणे आवश्यक आहे.

धाप लागणे किंवा श्वासोच्छवास अतिशय वेगाने होणे ही समस्या हल्ली अगदी सर्वसामान्य बनली आहे. वयस्कर लोकच नाही, तर तरुण मुलेसुद्धा या समस्येमुळे त्रस्त झालेली पाहायला मिळतात. घरात किंवा कार्यालयात काम करताना, प्रवासात, पायर्‍या चढ-उतार करताना, थोडी शारीरिक हालचाल केली किंवा काम केले तरी श्वासोच्छवास तीव्र गतीने सुरू होणे, ही श्वसनविकाराची एक समस्या आहे. याशिवाय जेवणात बाहेरील एखादी वस्तू पोटात गेल्यास अस्वस्थपणा जाणवून श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागतो. अशावेळी काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. 

• ब्राँकायटिस अस्थमा ः श्वास घेताना त्रास उद्भवण्याची अनेक कारणे आहेत. यात ब्राँकायटिस अस्थमा (दमा) असल्यास रुग्णाला वारंवार धाप लागू शकते. फुफ्फुसातील वायू नलिकांमध्ये सूज येण्यामुळे दम्याची समस्या जाणवते. हवा श्वसनमार्गात अडकून पडते. त्यामुळे श्वास घेताना त्रास होऊ लागतो. अशावेळी रुग्णाला दम लागतो, खोकला येऊ लागतो आणि छाती भरून आल्यासारखी वाटते. दम्याने पीडित असणार्‍या रुग्णांनी इन्हेलरचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्यांना दम्यापासून आराम मिळू शकतो.

• फुफ्फुसाचा आजार ः ‘क्रॉर्निक ऑब्स्ट्रक्विव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) हा एक फुफ्फुसाचा आजार आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन आणि प्रदूषणामुळे होणारी ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे श्वास घेण्यास अडचण जाणवते. धुरामुळेही हा आजार होऊ शकतो. म्हणून सिगारेटचे सेवन करणार्‍या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास निरोगी व्यक्तीलासुद्धा या आजाराचा सामना करावा लागू शकतो. सीओपीडी या फुफ्फुसाच्या विकाराने त्रस्त असणार्‍या रुग्णांवर अँटिबायोटिक औषधांद्वारे उपचार दिले जातात. याशिवाय शरीरात ऑक्सिजनची कमतरता असणार्‍या रुग्णाला ऑक्सिजन दिल्याने मदत होऊ शकते.

• न्युमोनिया – या आजारातही तीव्र श्वसनाची समस्या दिसून येते. यात काही दिवस ताप येणे आणि खोकला जाणवतो.

• कोरोनरी आर्टरी डिसीज ः हृदयाशी संबंधित हा आजार असल्यास किंवा अँजिओप्लास्टी झाली असेल, तर श्वसनाची तीव्र समस्या होऊ शकते.

• कर्करोग ः कर्करोग हा शरीरातील कुठल्याही भागात होऊ शकतो. कर्करोगाने पीडित असणार्‍या रुग्णाचा आजार फुफ्फुसापर्यंत पसरल्यास श्वास घेण्यास अडचण जाणवू शकते. कर्करुग्णांमध्ये श्वसनाची समस्या उद्भवल्यास ती त्वरित ओळखणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच निदान व उपचार झाल्यास रुग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.

डॉ. श्याम थम्पी

Back to top button